पैचिंगचे 'स्वर्गमंदिर'

चीनमध्ये फिरताना,तिथल्या लोकांशी बोलताना व तिथल्या वास्तू पाहताना मला त्यांच्या आणि आपल्या संस्कृतीत बरेच साम्य प्रकर्षाने जाणवते. अनेक कल्पना, रिती-रिवाज, श्रद्धा - अंधश्रद्धा वगरे अगदी आपल्यासारख्याच वाटतात. चीन ची राजधानी व प्राचीन संस्कृतीचा वारसा सांगणारे पैचिंग शहर अजूनही अनेक जुन्या वास्तू व परंपरांची चिन्हे बाळगून आहे. प्रत्येक वास्तूमागे काही ना काही हकिगत आहे, इतिहास आहे, संस्कृती आहे. अशीच एक वास्तू म्हणजे स्वर्ग मंदिर - टेंपल ऑफ हेवन. राजा आपले पीक-पाणी, संपती, धनधान्य, आरोग्य या सर्वाबाबत दरवर्षी आपल्या पूर्वजांना (आता राजाचे पूर्वज म्हणजे ते 'स्वर्गस्थ'च असणार) वार्षिक अहवाल सादर करायचा. मग परकीय आक्रमण, रोगराई, पूर, दुष्काळ वगरे अरिष्ट येऊ नये म्हणून देवाची प्रार्थना करायचा आणि देवतांचे आशीर्वाद घ्यायचा. तो दिवस पितरांचा. म्हणजे एकूण प्रकार आपल्या कडच्या पितृपक्षासारखाच. हा सर्व सोहळा स्वर्गमंदिरात चालायचा. साधारण २५ डिसेंबरच्या आसपास हा दिवस असायचा, कारण स्वर्ग या दिवशी पृथ्वीला सर्वात जवळ असतो अशी समजूत. त्या दिवसात राजेसाहेब या मंदिराच्या परिसरातील प्रासादात मुक्कामाला यायचे.


'सुस्वागतम्'


 Copy of P4010361


मंदिर असो वा प्रासाद, कमानीचे प्रवेशद्वार हवेच.


भव्यदिव्य


P4010365


प्राचीन काळी माणसे, वेळ व साधन-संपत्ती मुबलक असावी आणि राजेलोकांची हौसही दांडगी असावी. सर्व वास्तू आकाराने अवाढव्य आहेत, अनेक एकर व्यापतील अश्या. समोर दिसते ते प्रवेशद्वार. डाव्या व उजव्या अंगाला उद्याने, प्रासाद व बलिदानगृह अश्या वास्तू आहेत.


'स्वर्गद्वार'


P4010367


उभे दगडी खांब व त्यावर विसावलेली आडवी दगडी तुळई, त्यावर नक्षी व स्तंभांवर दगडी कळस हे दृश्य अगदी उत्तरे पासून ते दक्षिणे पर्यंत सर्व मंदिरांत दिसून येते.


स्वर्गाला गवसणी


P4010371


मधल्या गोल चकतीसारख्या दिसणाऱ्या दगडावर उभे राहून बोलले तर आपले बोलणे स्वर्गात ऐकू जाते व व्यक्त केलेली इच्छा पूर्ण होते असे म्हणतात. अर्थातच प्रत्येक पर्यटक इथे हजेरी लावतोच. पृथ्वी चौरस असून स्वर्ग गोल आहे असा समज रूढ असल्याने वाडा, मंदिराचे कुंपण चौरस तर स्वर्ग मानलेली वास्तू मात्र वर्तुळाकार बांधली आहे. इथे राहायला आल्यावर विधींच्या चार दिवस आधी राजा अत्यंत सात्त्विक जीवन जगायचा. मद्यपान, मांसाहार, स्त्रीसुख, तामसी पदार्थ वर्ज्य, साधे कपडे परिधान करायचे, अलंकार घालायचे नाहीत. पुन्हा हे आपल्यासारखेच.


  स्वर्गमंदिराचे प्रवेशद्वार.


P4010372


प्रत्येक कमानदार प्रवेशद्वाराचे तीन प्रवेशमार्ग दिसतात. मधला राजाचा तर डावे व उजवे मानकऱ्यांचे. आंत दिसणारा कळस स्वर्गमंदिराचा. आजूबाजूला पारंपरिक लाकडी कंदील दिवे आहेत.


 स्वर्गमंदिर


P4010380


हेच ते सुप्रसिद्ध स्वर्गमंदिर. मंदिर उंचावर असून चार दिशांना चार जीने आहेत.


 


P4010379


मंदिराला फरसबंद जमीन असून मंदिरच्या आजूबाजूला विश्रामगृहे आहेत. विश्रामगृहाच्या कौले तोलणाऱ्या तुलईच्या टोकाला खास त्या काळची प्राणी, यक्ष वगरे आकृतीची सजावट आहे.


 गोलाई


P4010375


मंदिराच्या छपराचा आकार गोल व पौर्वात्य शेतकरी घालतात त्या गवती टोपीच्या आकाराचा आहे. संपूर्ण बांधकाम लाकडी आहे.


 कळसाचा ओघ


P4010377


खालच्या आकाराने निमुळता होणारा गोलाकार कळस आकाराने वेगळाच आहे. लाकडी नळीदार छप्पर कळसाचे सौंदर्य खुलवते.


'ॐ ड्रॅगनाय नमः'


kaLas


देवळाचा कळस असो की प्रासाद असो. रक्षणार्थ ड्रॅगन महाशय हवेतच!


क्षणभर विश्रांती


P4010381


मंदिर पाहून बाहेर पडल्यावर मागच्या अंगास विश्रांतीसाठी टेकायला पुरातन वृक्षांच्या सावलीत पथिक विसावलेले दिसतात.


ऊन सावल्यांचा खेळ


 


P4010382


प्रचंड वृक्षांना भेदून येणारा प्रकाश व वृक्षांच्या सावल्या यामुळे हिरवळीवर ऊन सावल्यांचा मोहक आलेख मंदिराच्या परिसरात दिसत होता. बाहेर पडायचा मार्ग इथूनच जातो. दोन तास कसे गेले ते समजलेच नाही.


 बलिदान ध्वजस्तंभ


P4010384


जाता जाता एक उंच लाकडी खांब लक्ष वेधून घेत होता. जेव्हा राजा बळीचा विधी पार पाडत असायचा तेंव्हा नागरिकांनी शांत राहावे यासाठी या उंच खांबावर ध्वज उभारला जायचा जो दूरवरूनही दिसत असे.