'पाडस' आणि 'हरीणबालक'

मार्जोरी किनन रॉलिंग्ज या अमेरिकन लेखिकेची 'द इयर्लिंग' ही कादंबरी जागतिक साहीत्यविश्वात महत्वाची मानली जाते. १९३८ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीत अमेरिकेतील फ्लॉरिडा संस्थानाचे एक वेगळेच, अपरिचित रूप रेखाटले आहे. या कादंबरीचा काळ शंभराहून अधिक वर्षांपूर्वीचा. जंगलात एकटे रहाणारे बॅक्स्टर कुटुंब. जवळपास शेजार असा नाहीच. घनदाट आरण्य, हिंस्त्र पशू, आक्राळविक्राळ निसर्ग. या सगळ्याशी टक्कर देत, त्याबरोबर त्याच्याशी थोडीशी मैत्रीही करत जगणे. बॅक्स्टर कुटुंबातला जिगरबाज पण शरीराने थोडासा कमकुवत कुटुंबप्रमुख पेनी, त्याची व्यवहारचतुर पण थोडीशी भांडकुदळ बायको ओरी आणि त्यांचा एकुलता एक छोटा मुलगा ज्योडी. त्या वयात सगळी मुलं असतात तसा खोडकर आणि व्रात्य. आसपास खेळायला कुणी नसल्यामुळे एकटा पडलेला आणि समवयस्क कुणाच्या तरी सोबतीला आसावलेला.
बॅक्स्टर कुटुंबाचे आयुष्य हे खडतरच. थोडीशी जमीन साफसूफ करून जमेल तितके धान्य पिकवणे, एखादी गाय, काही डुकरे, काही शिकारी कुत्री पाळून, मिळेल ती शिकार करून स्वतःला व त्यांना जगवणे, हरणाचे, अस्वलाचे खारीचे, डुकराचे, कासवाचे- जे मिळेल त्याचे ताजे, सुकवलेले, खारवलेले किंवा धुरकटवलेले मांस, रताळ्याची रोटी, मक्याची खिचडी असे काहीबाही खाऊन जगणे,जंगली प्राण्यांपासून त्यांना व स्वतःला वाचवणे...'भक्षक व्हा किंवा भक्ष्य व्हा' हा जंगलचा कायदा. तुम्हाला आवडो किंवा न आवडो!
ज्योडीला एखाद्या प्राण्याचे पिल्लू पाळावे  असे फार वाटत असते. आपल्याच खाण्याची भ्रांत, तेथे त्या पिल्लाला कोण खायला घालणार या विचाराने ओरी त्याला ते करू देत नसते. अपघाताने एक दिवस ज्योडीला हरणाचा एक नुकताच जन्मलेला बच्चा सापडतो. कशीबशी आईची मनधरणी करून ज्योडी त्या बछड्याला घरी आणतो. ज्योडीचे सगळे आयुष्यच त्या पाडसाभोवती गुंतून जाते. त्याच्या बावट्यासारख्या पांढऱ्या शेपटीवरून त्याचे नाव 'फ्लॅग' ठेवले जाते. छोट्या ज्योडीचे छोटे आयुष्य आनंदाने काठोकाठ भरून जाते.
पण गोष्टी इतक्या सरळ सोप्या थोड्याच असतात? ते हरणाचे पाडस मोठे होऊ लागते. बघताबघता त्याचा एक तरणाबांड पाडा होतो. त्याची भूकही वाढते आणि मग तो बॅक्स्टर कुटुंबियांनी लावलेल्या पिकांचाच फन्ना उडवायला लागतो. त्याला कोंडून ठेवण्याचे सगळे प्रयत्न निष्फळ होतात. आता बॅक्स्टर कुटुंबाच्या जीवनमरणाचा प्रश्न उभा रहातो. क्रूर नियती पेनीला दुःखद पण अपरिहार्य निर्णय घ्यायला लावते.
पेनी ज्योडीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्योडीला काहीच समजत नाही. मग नाइलाजाने ओरीच फ्लॅगला गोळी घालते. फ्लॅगची तडफड होते. ज्योडीला ते बघणे अशक्य होते. फ्लॅगच्या मानेवर बंदुकीची नळी ठेवून तो चाप ओढतो. फ्लॅगच्या डोळ्यात क्षणभर अविश्वास तरळतो आणि मग ते डोळे निर्जीव होतात.
ज्योडीचे सगळे जग उलटेपालटे होते. दिशा दिसेल तिकडे तो पळत सुटतो. आपल्या एकमेव सुखाच्या आड येणाऱ्या कुटुंबापासून दूर जाण्याचा तो निर्णय घेतो.  बापाची, आईची, स्वतःची..सगळ्या जगाची त्याला घृणा वाटत असते. सगळ्यापासून दूर दूर दिशाहीन तो दोन दिवस भटकत रहातो. फ्लॅगला विसरण्याचा प्रयत्न करत...फ्लॅगला आठवत..
आणि मग त्याला भूक लागते.
भुकेचे हे भीषण रूप ज्योडीला नवीन असते.त्याला आतापर्यंत माहिती असलेल्या किंचित सुखद भुकेच्या जाणिवेपेक्षा अगदी वेगळे आणि भयानक. 'आपल्या सगळ्याना भुकेनं मरावं लागेल' ओरी म्हणालेली असते. ते जणू पटवून देणारी, आपल्या तीक्ष्ण नखांनी पोटात ओरबाडणारी भूक, कितीही खाल्लं तरी संपणार नाही असे वाटणारी भूक... 
या भुकेच्या नव्या जाणिवेने जणू ज्योडीचे पोरपण संपते. जीवनसंघर्ष म्हणजे काय हे त्याला हा एकच अनुभव शिकवून जातो. स्वप्नाळू, काल्पनिक जगाच्या जागेवर खरेखुरे, जिवंत जग येते. रुक्ष, रंगहीन पण अपरिहार्य. बालीश, पोरकट, अल्लड ज्योडीच्या जागी एक पोक्त, जबाबदार ज्योडी जन्म घेतो.  
हा नवा ज्योडी शांतपणे घरी येतो. बाप आजारी असतो. आई नव्या पेरणीसाठी बियाणे आणायला गेलेली असते. शेतातली कामे खोळांबलेली असतात.
चाचपडत पेनी पोराला जवळ घेतो आणि त्याला चार गोष्टी सांगतो. बाप्याबाप्यांमधल्या गोष्टी.
' जीवन सुंदर आणि सोपं असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं पोरा. जीवन सुंदर आहे, फार सुंदर आहे. पण ते सोपं मात्र नाही.एका फटक्यात ते आपल्याला जमीनदोस्त करतं. आपण उठतो, आणि जीवन आण्खी एक फटका मारतं. काय करायचं? आपल्या वाट्याला येईल तो भोग स्वीकारायचा आणि पुढं चालू लागायचं!'
ज्योडीला हे केंव्हाच कळालेलं असतं. बापाच्या अंगावर तो पांघरूण घालतो. 'झोप आता तू पा.' तो म्हणतो. 'सकाळी मला लवकर उठायचं आहे, दूध काढायचं आहे, लाकडं आणायची आहेत, शेतात काम करायचं आहे - पण तू नको काळजी करु. मी करीन ते सगळं...'
ज्योडी आपल्या खोलीत येतो. कुणाची तरी चाहूल घेण्याचा प्रयत्न करतो. पण ती आता त्याला कधीच येणार नसते. झोपता झोपता रुद्ध कंठानं तो साद घालतो
'फ्लॅग.....!'
पण तो आवाज त्याचा नसतो. तो एका कोवळ्या पोराचा असतो. त्याच्या स्वप्नाच्या दुनियेत एक कोवळा पोरगा आणि त्याचं पाडस पळत पळत येतात आणि झाडामागं दिसेनासे होतात..


मराठीत राम पटवर्धनांनी 'पाडस' या नावानं तर भा.रा. भागवतांनी 'हरीणबालक' या नावानं या कादंबरीचा अनुवाद केला आहे. दोन्ही अनुवाद आवर्जून वाचण्यासारखे. जागेवर खिळवून ठेवणारे आणि पुस्तक संपतासंपता डोळ्याच्या कडा पुसायला लावणारे.....
सन्जोप राव