पुरावा

पुरावा


जातो निघून दूरी रानीवनी गुहेत
रात्रंदिनी पुरावे, धुंडाळतो अनंत

लोकास वाटलो मी वेडा जगी तरीही
वेडातुनी मला या कळते नवेच काही

राहून वर्तमानी मी भूतकाळ पाही
प्रत्येक खूण देते, मजला नवीन ग्वाही

दिसती कितीक अस्थी ,भांडी, घरे विटांची
सांगावयास येती मजला कथाच त्यांची

हाती हळूच येई कोरीव एक नक्षी
प्रीतीस चांद होई दूरंत मूक साक्षी

जे जे जुने पुराणे राहे दडून खोल
खणल्यावरी कळावे त्याचे जगास मोल

मृत्यूस घाबरावे मी का बरे उगीच?
राहीन मी पुरावा होऊनिया इथेच!