सांत्वन......


आज सकाळच्या पेपरच्या
पहिल्या पानावर पसरलीय
काळ्या चौकटीत मोठ्या मथळयासहित बातमी
आणि फोटोत
  काल आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मृत देह
  आणि कोपऱ्यात गुढघ्यात मान घालून बसलेले त्या मृताचे नातेवाईक!
मी ती बातमी वाचायचं टाळतो
नजर टाकतो आजूबाजूच्या मथळ्यांवर...
  एका मोठ्या कंपनीच्या शेअर्सचा भाव खूप चढलाय!
  मिस इंडिया बनलीय विश्वसुंदरी!
  एक देशभक्तिपर सिनेमा कोटीचा धंदा करतोय!
  भारत पुढच्या पाच वर्षात महासत्ता होणार आहे!
माझं उर भरून येतं..
मला वाटतं
  ह्या आश्वासक बातम्या जणू
  फोटोतल्या मृताच्या नातेवाईकांचे
  सांत्वन करायला आलेले सोयरेच आहेत......
  पाठीवर हात फिरवत, ह्या आश्वासक बातम्या पटवून देतील
  त्या मृताच्या नातेवाईकांना
  'ही या शतकातील शेतकऱ्याची शेवटची आत्महत्या!'
  आणि मग ते नातेवाईकही दुःख विसरतील 
  उठून तयार होतील
  (अंत्ययात्रेनंतर) महासत्तेचे नागरिक व्हायला!
माझं उर भरून येतं...


(जयन्ता५२)