लग्नः एक अभ्यास


लग्न ठरल्यावर दोघांनी एका गावात असणं यात काही औरच मजा असते!! तुम्ही फ्रिक्वेण्ट्ली भेटू शकता आणि एकमेकांना चांगल्या रितीने समजून घेऊ शकता. त्यामुळे लग्नानंतरचा जो एकमेकांना ओळखण्याचा, एकमेकांच्या वृत्ती, आवड, निवड, स्वभाव, विचार करण्याच्या पद्धती, आणि कुठल्याही गोष्टीवर रीऍक्ट होण्याच्या पद्धती या गोष्टी जाणून घेण्याचा काळ कमी होतो आणि तुम्ही डोक्यावर अक्षता पडल्यावर ताबडतोब एका मॅच्युअर आणि १००% परस्पर सामंजस्य असलेल्या, एकमेकांविषयी खूप ओढ आणि आपुलकी निर्माण झालेल्या नात्यामध्ये प्रवेश करता. आणि शिवाय लग्न ठरल्यावर होणाऱ्या बायकोसोबत मनमुराद फिरण्याचा, सिनेमा बघण्याचा, तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याचा, तिला स्पर्श करण्याचा, हळूच भुरभुरत्या पावसात तिचे चुंबन घेण्याचा आणि आकंठ तिच्या प्रेमात बुडाल्यावर ती सोबत नसतांना मनाच्या सांदीकोपऱ्यात तिचाच विचार करण्याचा, दिवसभर तिला भेटण्याचा विचार करण्याचा आणि तिच्या फक्त तुमच्यासाठी म्हणून असलेल्या नितळ नजरेचा अनुभव घेण्याचा जो आनंद असतो तो इतर कुठल्याही सुंदर अनुभवांपेक्षा श्रेष्ठ असतो!


फोनवर आपण खूप तोलून-मापून बोलतो, विचार करून बोलतो. प्रत्यक्ष भेटीतला आनंद त्यात नसतो. त्यामुळे फोनवर बोलणे ही एक सोय असली तरी भेटीचं सुख त्यात नाही. हे म्हणजे आषढी एकादशीला पांडुरंगाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा सहन करत असतांना दूरदर्शनवर बघण्यासारख़े आणि त्यात विठोबारायाचे दर्शन मिळाल्याचे समाधान मानण्यासारखे आहे!


शिवाय लग्ना आधी जर तुम्हाला एकमेकांना खूप भेटता, बोलता नाही आले तर लग्न झाल्यावर एकमेकांसाठी पूर्ण झोकून देणे, एकमेकांची सुखे-दुःखे आपली समजून ती वाटून घेणे किंबहुना सुखाचा वाटा तू ठेव आणि दुःखाचा मी ठेवतो अशी ओढ एकमेकांविषयी निर्माण करणे या एका यशस्वी आणि १००% एकरूप अशा लग्नासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी घडायला वेळ लागतो. सुरुवातीचे काही दिवस नवीन नवरी जास्त माहेरचा आणि स्वतःचा विचार करत असते जे की अत्यंत स्वाभाविक आहे. आई-वडिलांना, भावा-बहिणींना, घरा-दाराला आणि जिथे आपण वाढलो, शिकलो, आईच्या कुशीत शिरलो-रडलो, बाबांनी प्रेमाने आणलेला खाऊ खाल्ला, भावासाठी प्रेमाने स्वयंपाक केला, त्यांना राखी बांधली, बहिणींची वेणी घालून दिली, डोळ्यात अश्रू दाटी करून आल्यावर आई-बाबांच्या मायेने पाठीवर फिरणाऱ्या हाताची ऊब अनुभवली अशा घराला सोडून पूर्णपणे अनोळखी लोकांमध्ये मिसळून जायचं, त्यांना आपलं मानायचं, त्यांची सुख-दुःखे आपली जाणायची, सासू-सासरे काही बोलले तर निमूटपणे ऐकून घ्यायचं, त्यांच्यात आपली चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा सदोदित प्रयत्न करत बसायचा या भयंकर अवघड गोष्टी आहेत. त्या समजून घ्यायच्या म्हणजे त्यासाठी स्त्रीजन्मच घ्यायला हवा. तशीच काहीशी अवस्था नवऱ्याची असते. त्याच्या मनात सारखं हे असतं की ही घरात रमेल की नाही, माझ्या आई-बाबांना आवडेल की नाही, माझ्याशी एकरूप होईल की नाही, घर व्यवस्थित सांभाळेल की नाही...एक ना अनेक प्रश्न! मग अचानक वीकएंड येतो आणि अचानक त्याला उमगतं की आता मित्रांसोबत भटकणे बंद, कट्ट्यावर बसून गप्पा मारणे बंद, टोळक्याने सिनेमा नघणे बंद, रात्रभर गप्पा हाणीत हिंडणे बंद.. सगळेच बंद! तो थोडा कावतो पण नंतर त्याला कळतं की हे सारं जरी करता येत नसलं तरी बायकोसोबत घालवलेले मोहक आणि टवटवीत क्षणही तेव्हढाच किंबहुना त्याहीपेक्षा कांकणभर जास्त आनंद देतात! मग स्वारीची कळी खुलते आणि संसार अधिक सुखाचा आणि अर्थवाही होतो.


एव्हढं मात्र खरं की मित्रांसोबत टोळक्याने सिनेमा बघणं, लोणावळा किंवा अशाच कुठल्यातरी ठिकाणी झोडपणाऱ्या पावसात मित्रांसोबत हिंडणं, मोठ्या-मोठ्याने गाणी म्हणणं, सर्व बंधने झुगारून देऊन मनसोक्त आणि बेफाम जगणं, भजी, भेळ खाणं, कुठेही रात्र काढतांना त्यातलं थ्रिल अनुभवणं या गोष्टीतली मजा बायकोसोबत तितकीशी येत नाही आणि खरचं सांगतो, हे मी स्पष्टपणे माझ्या बायकोला सांगून टाकलं आहे.


मित्रांसोबतची मजा वेगळी आणि बायकोसोबतची धुंदी वेगळी! या दोन्ही गोष्टी वेग-वेगळ्या आहेत पण स्वतःचं असं खास सौंदर्य जपणाऱ्या आहेत हे मात्र खरं!!!


--समीर कुळकर्णी