सुलताना (भाग - १)

ही कथा आहे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेल्या एका स्वातंत्र्यवीराची.  अर्थात ही कथा म्हणजे स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासाचा भाग किंवा या स्वातंत्र्यवीराच्या शौर्याची कथा नाहीये.  तर ही आहे एक प्रेमकथा.  आणि रुढार्थानं ज्याला प्रेमकथा म्हणतात, तशी पण ही नाहीये.


या कथेच्या नायकाचं नाव आहे राजाराम कऱ्हाडे.  राजाराम कोल्हापूरचा.  स्वातंत्र्य संग्रामात जसा वासुदेव बळवंतांचा किंवा पत्री सरकारचा जहाल गट होता, तसाच कोल्हापूरचाही एक छोटासाच पण फारशी प्रसिद्धी न पावलेला गट होता. राजाराम कऱ्हाडे याच गटाचा सदस्य.  इंग्रज अधिकाऱ्यांवर, पोलिस चौक्यांवर, सरकारी खजीन्यांवर हल्ले चढवायचे आणि पोलिसांना, सरकारला होता होई तो जेरीस आणायचं हेच यांचं काम.  कोयनेच्या खोऱ्यातल्या जंगलात यांचे अड्डे होते.  पळवलेली शस्त्रास्त्रं, दारुगोळा, पै पैका सारं काही कोयनेच्या जंगलातच यांनी लपवून ठेवलं होतं.  आणि तेही अशा ठिकाणी जिथं माणूसच काय पण जंगली श्वापदांनाही पाय घालणं जिकीरीचं होतं.


इतिहासाला या गटाबद्दल फारशी माहिती नाही कारण एकदा पोलिसांना पाठीवर घेऊन हा गट जेव्हा देशावरून महाबळेश्वराकडे पळत होता, त्यावेळेस आयत्या वेळेस निर्णय घेऊन गटातले सगळे सदस्य, पोलिसांना चकवण्यासाठी, वेगवेगळ्या दिशांना पांगले.  पोलिस अर्थातच बाकी सगळ्यांना सोडून यांच्या प्रमुखाच्या मागे लागले.  प्रमुखानं पळून जाण्यासाठी जीवाचा आकांत केला, पण तरीही पोलिसांचा पिच्छा काही तो सोडवू शकला नाही आणि शेवटी एक वेळ अशी आली की त्याच्या समोर दोनच पर्याय उरले पोलिसांच्या तावडीत पडणं किंवा आत्महत्या.  त्यानं दुसरा पर्याय स्वीकारला आणि महाबळेश्वरच्या एका कड्यावरून स्वतःला झोकून देऊन त्यानं प्राणत्याग केला. इतर सदस्य जे पांगले त्यातले कुणी गुऱ्हेघरच्या जंगलात लपलं, कुणी उमरठच्या बाजूनं कोकणात पळालं, तर कुणी जावळीच्या रानात गेलं. 


राजाराम या इतरांच्यातच होता.  तो तापोळ्याच्या दिशेनं गेला आणि तापोळ्याकडून कोयना नदी ओलांडून कोयनेच्या जंगलात शिरला.  राजारामला हे ठावूकच नव्हतं की पोलिसांनी त्याचा पाठलाग सोडून दिलाय आणि यांच्या गटप्रमुखानं स्वतःचं आयुष्य संपवून टाकलंय.  त्यानं ठरवलं होतं की कोयनेतल्या आपल्या मुख्य अड्ड्यावर जाऊन थांबावं, म्हणजे एकतर पोलिस तिथपर्यंत पोहोचू शकणार तर नाहीतच आणि दुसरं म्हणजे आज ना उद्या गटप्रमुख किंवा गटातला दुसरा एखादा सदस्य अड्ड्यावर नक्की येईल.  मग त्यानंतर पुढचा कार्यक्रम ठरवता येईल.  या मुख्य अड्ड्यावर चार पाच लोकांना दहा वीस दिवस पुरेल इतका शिधा कायम ठेवलेला असायचा, त्यामुळे या अड्ड्यावर मुक्काम करण्यात अडचण कोणतीच नव्हती. 


तापोळयाजवळ राजारामानं कोयना ओलांडली त्यावेळी सूर्यास्त होऊनही बराच अवधी होऊन गेला होता.  थोड्याच वेळात मिट्ट काळोख पडला असता आणि मग जंगलात शिरण्यात धोका होता.  नदीकाठी चार झोपड्या होत्या त्यातली लोकं या अनाहूत वाटसरूला बघून बाहेर आली.  राजारामनं तो महाबळेश्वरहून आलाय आणि पालीला त्याच्या पाहुण्याकडे चाललाय अशी थाप ठोकून दिली.  उद्या तो गेल्यावर पोलिस इथे आल्यानंतर त्यांची दिशाभूल होणं आवश्यक होतं.  रात्री त्याच वस्तीवर राहून, भल्या पहाटे उजाडण्यापूर्वीच राजारामनं मंडळींना रामराम ठोकला आणि जंगलाची पाऊलवाट पकडली.


कोयनेचं जंगल महा घनदाट. अगदी भल्या भल्यांनाही तोंडात बोटं घालायला लावणारं.  महाबळेश्वर कडनं येऊन तापोळ्यावरनं दक्षिणेकडे वाहणारी कोयना आणि तिच्या पूर्व-पश्चिम दोन्ही अंगांना दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीच्या अभेद्य रांगा.  आणि या डोंगर रांगाना संपूर्ण आच्छादून टाकणारी निबीड वृक्षराजी...  नजर पोहोचेपर्यंत.  हिरडा, बेहेडा, ऐन, किंजळ, आंबा, फणस, पांगारा, साग, वड , पिंपळ, आवळा, शेवरी असे एक ना अनेक प्रकारचे वृक्ष.  शिकेकाई, करंदं, निरगुडी अशी शेकडो प्रकारची झुडुपं आणि रामेठा, घाणेरा, अश्वगंधा, गुळवेली, नागवेली अशा हजारो जातींच्या वेली.  पक्षी, प्राणी तर किती विविध प्रकारचे.  वाघ, बिबटे, चित्ते, गवे, रानडुकरं, कोल्हे, तरसं, साळिंदरं, हरणं, काळवीटं, माकडं, ससे, साप, नाग, अजगर... किती किती म्हणून सांगू आणि हे सारं कदाचित सृष्टिच्या निर्मितीपासून असंच, कुणाचीही दृष्ट न लागलेलं.  एक स्वतंत्र, भलं प्रचंड, छाती दडपवून टाकणारं विश्वच असल्यासारखं. 


भल्या पहाटे पकडलेली, जंगलातली प्राण्यांच्याच येण्या जाण्यानं पडलेली, पाऊलवाट राजारामनं जवळ जवळ दुपारपर्यंत सोडली नव्हती.  आता तो जंगलाच्या चांगलाच अंतर्भागात पोहोचला होता.  अन एके ठिकाणी विशिष्ट खुणेच्या खडकापासून त्यानं पाउलवाट सोडली अन शिकेकाईच्या जाळीतून आत पाऊल टाकलं.  इथून पुढचा प्रवास अत्यंत कठिण होता.  पाउलवाट वगैरे असं काहीच नव्हतं.  एक एक पाऊल जपून टाकावं लागत होतं.  वरच्या वृक्षराजीनं सूर्यकिरणांना वरच्या वर तोलून धरलं होतं.  त्यामुळे आतमध्ये वातावरण थंडगार होतं.  खाली वाळलेल्या पानांचा थर साठला होता आणि या थरा खालच्या जमिनीनं पावसाळ्यातला ओलावा अजूनही धरून ठेवला होता.  या पानांच्या थरावर चर्रकन पाय पडताच एखादा साप किंवा सरडा सळसळत जायचा आणि अंगावर काटा उभा रहायचा.  कधी करंदाची जाळी हातानं बाजूला करत, तर कधी शिकेकाईच्या काट्यांनी ओरबाडून घेत, तर कधी कुठच्या वेलींच्या खालून रांगत जात राजाराम पुढे सरकत होता.  साधारणपणे तासाभराच्या प्रवासानंतर राजाराम एका छोट्याशा टेकाडावर पोहोचला.  टेकाडाच्या पुढे एक छोटीशी घळ होती आणि त्या नंतर उभा चढत गेलेला काळा डोंगर.  अन या डोंगरातच एका गुहेत राजारामाचा अड्डा होता. 


या ठिकाणाची आणि या गुहेची रचना नैसर्गिकरीत्याच अतीविशिष्ट अशी होती.  राजाराम आता ज्या टेकाडावर उभा होता त्याच्या डाव्या हातालाही असंच एक टेकाड होतं.  या टेकाडाच्या खडका खडकांमधून वहात वहात एक वहाळ राजारामाच्या समोरच्या घळीत उतरला होता आणि तसाच पुढे उड्या मारत दूर लांब खाली कोयनेला मिळायला निघून गेला होता.  घळीत उतरून अन वहाळ पार करून समोर वर चढत गेलेला काळा पहाड होता.  अन याच पहाडामधे ही गुहा होती.  पहाड पूर्वाभिमुखी होता पण गुहा मात्र उत्तरेला तोंड करून होती.  त्यामुळे बाहेरच्याला ही गुहा अगदी जवळ जाई पर्यंत लक्षातच यायची नाही पण गुहेतल्या माणसाला झाडीतून टेकाड चढून येणारा माणूस किंवा प्राणी बराच आधीच लक्षात यायचा.  गुहेचा पहाड गुहेपासूनही वरती पन्नास-शंभर फूट चढत गेला होता.  तिथून वरती पुन्हा थोडं जंगल होतं आणि मग वरचा सडा किंवा भलं प्रचंड पठार होतं.  अन त्या पठाराच्या पश्चिम टोकाला कोकणात उतरणारे सरळ ताशीव काळे कभीन्न कडे...


राजाराम घळीत उतरला.  वहाळातले दगड गोल गुळगुळीत अन निसरडे झाले होते.  काळजीपूर्वक एकेका दगडावर पाय टाकत त्यानं वहाळ पार केला अन हळू हळू समोरचा पहाड चढत गुहेपाशी जाऊन पोहोचला.  गुहेत आत शिरताच त्यानं सभोवार नजर टाकली, सारं काही व्यवस्थित आहे याची खात्री करून घेतली आणि तिथेच असलेल्या सतरंजीची घडी उलगडून त्यावर अंग टाकलं.  मागच्या आठ दहा दिवासात पळापळ फार झाली होती आणि राजारम पुरता थकून गेला होता.  अर्धा पाउण तास चांगली विश्रांती झाल्यावर राजाराम उठला अन खाली ओढ्यावर जाऊन स्वच्छ आंघोळ करून आला. असं एकट्यानं किती दिवस रहायला लागणार होतं कुणास ठाऊक.


उन्हं कलली.  राजारामनं गुहा झाडून स्वच्छ केली.  थोडा फराळ केला, अंथरुण घातलं, एक भरलेली बंदुक अन एक मोठा सुरा जवळ घेतला आणि तो आडवा झाला.  मागच्या दोन महिन्यात पोलिसांनी क्षणाचीही उसंत मिळू दिली नव्हती.  सतत धामधुमी.. राजारामच्या डोळ्यासमोरून सगळी दृश्यं हालत होती आणि यातच डोळा कधी लागला ते कळलं सुध्दा नाही.    


- क्रमशः