शब्दांची क्लिष्टता|कोबिल्ड|मराठी

१.

मिलिंद भांडारकरांनी सुरू केलल्या 'शब्दांची क्लिष्टता' ह्या चर्चेत शब्दांची क्लिष्टता  ठरवण्यासाठी अजित ओकांनी सुचवलेली पद्धत वाचली आणि कॉलिन्ज़ कोबिल्ड ह्या शब्दकोशाने शब्दांची क्लिष्टता किंवा महत्त्व ठरवण्यासाठी वापरलेली चांगली
कॢप्ती आठवली.

 ह्या शब्दकोशात नेहमीच्या संभाषणात
वारंवारिता(फ़्रीक्वेन्सी) किती आहे हे बघून त्यांचे पाच वारंवारिता
पट्ट्यांत (फ्रीक्वेन्सी बँड) मध्ये वर्गीकरण केले आहे. शब्दकोशात एखाद्या
शब्दाच्या अर्थासोबत त्या शब्दाचा वारंवारिता पट्टा वेगळ्या स्तंभात दिला
आहे. ह्या पट्ट्यांत असलेले शब्द भाषेसाठी, संभाषणासाठी महत्त्वाचे आहेत.



ह्या वर्गीकरणाची कल्पना येण्यासाठी खाली छोट्या तांबड्या अक्षरांत त्या शब्दकोशातला
वारंवारिता पट्ट्यांसंबधीचा महत्त्वाचा मजकूर माझ्यापरीने अनुवादित करून दिला आहे.


नेहमीच्या
संभाषणात नेहमी वापरले जाणारे,  वाक्य तयार करण्याच्या दृष्टीने
महत्त्वाचे असणारे शब्द पंचहीरकांकित वारंवारिता पट्ट्यात येतात. असे शब्द
सर्वात महत्त्वाचे.

उदा. सेंटर, ऑफ़, टू, दी, फ़्रॉम सारखे शब्द. किंवा लाइक, गो, पेपर असे नेहमीच्या शब्दसंपदेतले शब्द. शब्दकोशात असे एकूण ७०० शब्द दिलेले आहेत.

चतुर्हीरकांकित वारंवारितेच्या पट्ट्यात आर्ग्यू, ब्रिज, डेंजर, फ़ीमेल, ऑब्वियस आणि सी सारखे शब्द आहेत.
असे जवळपास १२०० शब्द आहेत.

ह्या दोन पट्ट्यांत वापरातले ७५ टक्के शब्द आहेत.

त्रिहीरकांकित पट्ट्यात अग्रेसिव, मेडिसिन आणि टॅक्टिक ह्या शब्दांसारखे शब्द आहेत. ह्या पट्ट्यांत एकूण १५०० शब्द आहेत.
आपल्याला ह्या पट्ट्यातले किती शब्द माहीत आहेत ह्यावरून आपला विषय आणि संभाषणाचा आवाका लक्षात येतो.

द्विहीरकांकित पट्ट्यात ऍक्युरसी,  ड्युरेशन, मिज़रेबल, पज़ल आणि रोप सारखे शब्द आहेत. असे जवळपास ३२०० शब्द आहेत.

एकतारांकित पट्ट्यात अबंडंट, क्रॉसरोड्ज़, फ़िअरलेस आणि मिशनरी सारखे शब्द आहेत. असे जवळपास ८१०० शब्द दिलेले आहेत.


बिगरहीरकांकित शब्द बहुधा आपल्या वाचनात येणारे किंवा कानी पडणारे असे शब्द आहेत. उदा. स्वेंगाली,  पराया आणि अरज़ॅट्स सारखे शब्द.


२.
मराठी शब्दकोश ह्या बाबतीत बरेच मागासलेले आहेत. व्याकरणासहित शब्दांचा वापर, समृद्ध परिशिष्टे, अवांतर माहिती, सूक्ष्म आणि ढोबळ शब्दछटा आदी गोष्टी वाक्यात उपयोगासहित दिलेल्या मला तरी फारश्या आढळल्या1 नाहीत.

एवढेच काय, मराठी भाषेच्या व्याकरणावर एकही चांगले पुस्तक नाही, असे मला पुण्याच्या डेक्कन इन्स्टिट्यूटमध्ये भाषाशास्त्र हा विषय शिकवणाऱ्या एका विदुषीने सांगितले. मो. रा. वाळंब्याचे पुस्तक पुरेसे नाही आणि आता जुने झाले आहे. डॉ. कल्याण काळे ह्यांनी परदेशी विद्यार्थ्यांना मराठी शिकण्यासाठी एक पुस्तक इंग्रजीतून लिहिलेले आहे. त्यांतला व्याकरणावरील भाग वाचावा असेही मला सांगण्यात आले.

मराठी भाषेला, मराठी माणसाला ऑक्सफ़र्डच्या इंग्रजी शब्दकोशासारखा परिपूर्ण मिळालेला नाही, त्या दिशेन प्रयत्नही होताना दिसत नाहीत, हे बघून वाईट वाटते.

तुम्हाला काय वाटते?


चित्तरंजन भट



१. मोल्ज़वर्थच्या शब्दकोशात बऱ्यापैकी वाक्यात उपयोग दिलले आहेत.