चकवा.......
पहाटेच्या गार वाऱ्यानं
डोळ्यांवर फ़ुंकर मारली
अन
पहाता पहाता
पूर्वेची खुलती कळी,गडद अबोली झाली
तूझ्या हळुवार चाहुलीने......
मिट्ट रात्रीतल्या या लुकलुकत्या तारका
आपल्याकडे पाहून एकमेकींशी खुदखुदत
इथेच तर होत्या नं
माझ्या उशीपाशी
तुझ्या स्वप्नांच्या साक्षीला......
क्षितिजरेषेवरल्या पुसट होणाऱ्या रांगोळीच
पाण्यावरलं प्रतिबिंब
आताच तर खाली सरकलं होतं
अन
तुझ्या डोळ्यातली उबदार कातरवेळ
अंगभर पांघरुन घेतली मी नुकतीच........
या मुलायम वाळूची दुलई तू जेंव्हा
माझ्या पायावरुन सरकवीत होतास
तेंव्हा चंद्रही हसत होता तुझ्याचसारखा,
माझ्या डोळ्यात पहात.....
किनाऱ्याशी कुजबुजणारी फ़ेसाळ लाटांची
ही उत्कट गाज
भैरवी च गात होती का रे..........?
तिच्या तालावर डोलणारी एकुलती एक नाव
आपल्याला कशी खुणावत होती
जवळ जवळ येतांना.......
अजून ती तशीच झूलतेय बघ
हिंदोळ्यावर डुलणाऱ्या हिरव्या राव्यागत......
त्याची शीळ
जशी तुझी खुळावणारी साद
अजुनही माझ्या कानांत किणकिणतेय ना रे.......
मग
कधी सरली ही चकव्याची रात...........?
शीला.