आषाढी एकादशीनिमित्त

कालच आषाढी एकादशी साजरी झाली. तिचे सध्याचे स्वरूप आणि महत्त्व ह्या बद्दल माझे काही विचार -


१. वारीमधला तरूणांचा वाढता सहभाग - ही काही फारशी चांगली गोष्ट नाही कारण ह्यातले खूपसे तरूण हे सुशिक्षित बेरोजगार असतात. त्यांना शहरात नोकरी हवी असते. शेतात काम करायला कमीपणा वाटतो.


ह्याला कारणीभूत 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' ही वृत्ती.


संतांच्या वचनाचा चुकीचा संदर्भ आपण घेत आहोत. चांगल्या मार्गाने, कष्ट करून पैसा कमावला आणि गरीबांसाठी खर्च केला तर विठ्ठल नाही थोडेच म्हणणार आहे?


विठ्ठल हा तर कष्टकऱ्यांचा देव. विठ्ठलाचे पूजन हे तर श्रमाचे पूजन.


घाम गाळून काम केले आणि पैसा कमावला तर काय बिघडले? पैसा कमावणे हे वाईट नाही हा विचार समाजात रुजवणे जरुरीचे आहे. त्यासाठी भरपूर कष्ट करायची तयारी हवी.


 २. शहरात ह्या दिवसाचे महत्त्व कमी होताना दिसते. शहरातल्या कामाच्या पद्धतीमुळे त्या लोकांना वारीत सहभागी होता येत नाही. पण ह्या दिवसाच्या निमित्ताने विविध गोष्टींचे स्मरण केले तरी खूप होईल.


ज्ञानेश्वर ज्यांनी मराठीचा पाया रचला, तुकाराम ज्यांनी त्यावर कळस चढवला,


इतर अनेक संत ज्यांनी त्यात मोलाची भर घातली. ते संत, ते अभंग, ती मराठी भाषा.


कष्टाचे महत्त्व सांगणारा विठ्ठल.


आई-वडिलांची सेवा करताना, विठ्ठलाची भेट नाकारणारा पुंडलिक,


आई-वडिलांचेच महत्त्व अधोरेखित करत विटेवर वाट बघणारा विठ्ठल.


(फादर्स डे, मदर्स डे ला हा अस्सल भारतीय पर्याय नाही का?)


ह्या सर्वांचे शहरातल्या लोकांना स्मरण झाले तरी पुरे. त्यासाठी उपास-तापास करायची पण गरज नाही.