राजस्थान ५ (डेझर्ट एक्स्पेडिशन) एक संस्मरणिय अनुभव (शेवट)

१ जानेवारी २००६.                                                       नवीन वर्षातील पहिला दिवस.


सकाळी ४.३० वाजता उठून आम्ही स्वतःचे आवरण्यास सुरवात केली. पॅकलंचची तयारी केली. ७.३० वाजेपर्यंत कॅम्प सोडला. आजचा प्रवास टफेस्ट होता . आजची मजल २० कि.मी. ची होती. आज कुणीही त्या उंटवाल्याच्या (गाईडच्या) मागे चालत नव्हते. आम्ही आमचा मार्ग आधीच्या बॅचच्या पाऊल-खुणांवरून शोधायचा ठरवलं होतं. खूप दमल्यामुळे आजच्या प्रवासाला आम्ही जास्तच कंटाळलो होतो. गप्पा मारत चालताना आणखी धाप लागते हे एकंदरीत आमच्या लक्षात आल्याने आज कुणीही गप्पा मारत चालण्याच्या मनःस्थितीत आणि परिस्थितीत ही नव्हते. हे अंतर पार करताना सर्वांचीच अवस्था बिकट होती. ती शब्दांतही वर्णन करता येणार नाही. त्यासाठी सर्व वाचकांनी एकदा तरी जरूर जाऊन या आणि संधीचा फायदा घ्या.


संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत आम्ही 'बरनार' गावी पोहोचलो. तेथील एका शाळेतच आमची सोय केली होती. तिथे पोहोचल्यावर सर्वांनी बिच्छान्यावर स्वतःला झोकून दिले.


रात्री जेवणाच्यावेळी राजस्थानची स्पेशालिटी दाल-भाटी- चुरमा जेवलो आणि कॅम्प फायर उरकून झोपी गेलो.


बरनार गाव (शेवटचा बेस कॅम्प ) सोडताना आम्ही सकाळी ८.०० वाजता सॅक पाठीवर घेऊन तयार होतो. लिडर्सचे शेवटचे आदेश ऐकण्यासाठी आम्ही सज्ज होतो. नेहमी प्रमाणे लिडरने आम्हाला (फॉलिंगने ३) मधे उभे राहण्यास सांगितले. (पुन्हा तोच गोंधळ) रांग तीघांची करायची की सहा जणांच्या तीन रांगा करायच्या. अखेर काउंटिंग घेऊन लिडरने आम्हाला बसमधे बसवले. आज मात्र आम्ही चालणं थांबवलं. कदाचित व्हाय.एच.ए च्या लोकांना आमची दया आली असेल. १०.३० वाजता (अवघ्या २ तासात) आम्ही कॅम्प्वर पोहोचलो. हे अंतर चालत पार करताना आम्हाला ६/७ दिवस लागले तर डांबरी सरळ रस्त्यावरून केवळ २ तासात आम्ही पोहोचलो देखील. 


माझ्या मनात शेवटच्या दिवशीच्या आठवणी पुन्हा पुन्हा येत होत्या.


कॅम्पवर पोहोचल्यावर आम्हाला ट्रेक पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट मिळाले. ट्रेक पूर्ण केल्याने समाधानाची शिदोरीही गाठीशी होती. दुपारी १२.३० वाजता गप्पा मारत सर्वांसोबत अखेरचे जेवलो. आता सर्वांशी ताटातूट होणार म्हणून मन खिन्न झाले होते. प्रत्येकाचा मार्ग वेगळा होता. कोणी अहमदाबादला जाणार होतं, कोणी जोधपूर, जैसलमेर,तर कोणी अजमेर-पुष्कर गाठणार होते.


पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देऊन मी आणि बाबांनी सर्वांचा निरोप घेतला आणि कॅम्प सोडाला. इतक्या दिवसात ही माणसं अनोळखी आहेत असे वाटलेच नव्हते. जणू काही ते एक झाले कुटुंबच होते. सर्वांच्यात युनिटी (एकता) होती. त्यामुळे हा ट्रेक एक सुखद अनुभव झाला.


आमच्या बरोबरचे मापुसकर काका तर बरोबर जादुची पोतडीच घेऊन आले होते. काय नव्हतं त्यांच्या सॅकमधे. दुपारच्या तापलेल्या उन्हात कधी संत्री बाहेर आली तर जेवताना पुरण पोळी, सांजो-या किंवा ढेपल्याचा नमुना मिळायचा. लिमलेट, पेपरमिंट, ड्रायफूट मधे मधे तोंडी लावायला होतेच. तर वालावलकर काकू कोणाला काही होत आहे म्हणताच आलेपाकची ट्रिट्मेंट द्यायच्या. ओक काकू जणू चिवडेवाल्याच होत्या. मी आणि मानसी सर्वात लहान. आमची तर चंगळच होती. आम्हाला खाऊ दिल्याशिवाय तमाम काका-काकूंना चैनच पडत नसे.


हा ट्रेक माझ्या कायम स्मरणात राहील कारण राजस्थानातील वातावरणात अनुभवलेला विरोधा भास . सकाळी कुडकुडती थंडी आणि दुपारी रणरणते ऊन आणि त्यात ते वाळूमधून चालणं. पुन्हा नको रे बाबा!!!


संध्याकाळी ६.०० वाजताची ट्रेन पकडून आम्ही दुस-या दिवशी सकाळी १०.३० वाजता जोधपूरहून मुंबईला पोहोचलो.


परतीच्या प्रवासात आता मी आणि बाबाच शिल्लक राहिलो होतो. मनात सतत ग्रुपच्या आठवणी तरंगत होत्या. त्यावेळी माझ्या मनात आलं ते एकच गाणं,,,


   अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती                           अशी पाखरे येती !!!!!!!!