प्रयाण....
आताच तर इथे वसंतोत्सव सुरु झालाय,
हे फ़ुलांचे बहर डोळ्यात मावत नाहीयेत....
मग हे घुबडाचे करुण कण्हणं
कुठून असं ऐकू येतंय........?
दूजेचा हा चंद्र दूर
किरणांची सतार छेडीत आहे शांततेच्या सीमेवर,
मग चितेतल्या उडणाऱ्या ठिणग्यांचा तडतड आवाज
कुठुन बरं ऐकू येतोय............?
क्षितिजावरचा सूर्य बघ प्रेमभरे अलविदा करतोय
आपल्या पूर्वप्रियेला,
मग ही टिट्वी इतकी आरपार
कर्कशतेय का बरे...................?
ही तुळशीवृंदावनाची पणती
इतकी सुंदर संथ तेवतेय,
मग वणवा पेटल्यागत अंतःकरणाची
होऱपळ का होतेय रे......................?
ही मंदिरातली आरती किती छान अंगाई गातेय,
पण ही पालखी अनोळखी मलाच उचलून
कुठे निघालीय आत्ता बघ..............?
शीला.