सहज आठवले/झटकन् लिहिले ... कालगणना, संस्कृती, भाषा इ. इ.इ. ...

मनोगतावरील इतर काही चर्चांवरून एकदम काहीसे आठवले.... अन् लिहावेसे वाटले.
खालील लिखाण कालनिर्णयच्या मागच्या पानांवर असणाऱ्या लेखांमध्ये कधीतरी वाचले होते. मूळ लेखक, कालनिर्णय-प्रत (वर्ष) लक्षात नाही. लेखाचे तपशीलही गळाले आहेत, मात्र गाभा अजूनही मनांत ताजातवाना आहे. आपल्याला आवडेल असे वाटते म्हणून येथे मांडतो आहे.


महिना म्हणजे काय हो? सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेस पृथ्वीस लागणाऱ्या कालावधीस वर्ष म्हणतात. या वेळेचे १२ भाग केले आणि त्याला महिना म्हटले. दुसऱ्या अंगाने बघायचे झाल्यास - सूर्याभोवतीच्या आकाशाचे १२ भाग केले. प्रत्येक भागास एकेका महिन्याचे नाव दिले. प्रदक्षिणेच्या काळात पृथ्वी कोणत्या भागात आहे यावरून कोणता महिना आहे हे ठरते. आता इंग्रजी काय किंवा मराठी काय महिने हे १२ च. येथे तरी दोन्ही पद्धतीत एकमत आहे. (अधिक महिना/लीप इअर इ. जुळवाजुळव तूर्तास बाजूस ठेवा.) (तसेच वरील कारणमीमांसा क्लिष्ट वाटल्यास (?) फक्त पुढील भाग वाचला तरी चालेल बरं!) 


पण या कालचक्राच्या अखंड रहाटगाड्याची मोजणी कोठून सुरू करायची यांत मतभेद आहेत. मराठी नववर्ष हे चैत्रामध्ये येते. चैत्र म्हणजे साधारणतः इंग्रजी मार्चचा कालावधी! आता मार्च हा पहिला महिना मानले की



  1. सप्टेंबर = सप्तांबर = सातवे अंबर = ७ वा महिना.
  2. ऑक्टोबर = अष्टांबर = आठवे अंबर = ८ वा महिना.
  3. नोव्हेंबर = नवांबर = नववे अंबर = ९ वा महिना.
  4. डिसेंबर = दशांबर = दहावे अंबर = १० वा महिना. हा पुन्हा झालेच तर X-mas.

आता बोला! ह्याचा काय उलगडा असावा?



  1. फार पूर्वी सारे जग एकच होते?
  2. कालमापनाच्या भारतीय पद्धतीचा जगावर प्रभाव होता?
  3. हा एक योगायोग आहे?
  4. हा भाषेच्या उत्क्रांतीचा/संकराचा काही प्रकार आहे काय?
  5. ... ... आणखी काही... ...

चर्चाप्रवर्तकाची काहीतरी भूमिका असायलाच पाहिजे हा आग्रह मी तसा मानत नाही. तरीही माझी भूमिका सांगायचीच झाली तर ती कुंपणावरच थांबते - वरील मांडणीत काहीतरी तथ्य असावे असे तेंव्हा वाटले... आणि समजा तथ्य नसले तरी त्यामागील तर्कसंगती आवडली...


जाणकारांनी अधिक प्रकाश टाकल्यास आवडेल. इतरांनीही तर्क केल्यास वाचायला आवडेल. वादे वादे जायते तत्त्वबोध...


अवांतर - चैत्र म्हणजे वसंतागमनाचा जणू मुहूर्तच! तेंव्हा नैसर्गिक दृष्टिकोनातून नवीन वर्षाची नांदी गुढीपाडव्यासच अशी सुंदर आणि वैचारिक मांडणी मला माहीत आहे. जानेवारीमध्ये वर्षारंभ करण्यामागील तत्त्व, कथा, परंपरा माहिती असल्यास त्याही जरूर सांगाव्यात.