उड्या मारण्याचा जागतिक दिन

उड्या मारणे हा म्हटलं तर मनोरंजक, किंवा आरोग्यवर्धक अथवा अपरिहार्य भाग आहे. आता हेच पाहा ना. मेदवृद्धी फार झाली की डॉक्टर दोरीवरच्या उड्या मारण्याचा सल्ला देतात. तर निवडणूकीच्या काळात राजकीय पक्ष कोलांटउड्या मारून मतदारांचे मनोरंजन करतात. बिचारे डोंबारी. त्यांच्या पोटावर याच्यामुळे तर गदा आली ना. असोत बापडे. कालाय तस्मै नमः म्हणायचं अन गप्प बसायचं. पण, आज मला जो किस्सा कळला त्याने खरोखरच तोंडात बोटे घालण्याची पाळी आली. आज चक्क उड्या मारण्याचा जागतिक दिन आहे असे कळले.


आधी त्याची पार्श्वभूमी स्पष्ट करावी लागेल. पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत आहे. त्यामुळे एक दिवस उत्तर धृवावरील हिम वितळायला लागेल अशी भीती व्यक्त करण्यात येते. हा पर्यावरणाला असलेला मोठाच धोका आहे. तो आडवळणाने नाहीसा करण्याचा चंग एका संस्थेने बांधला आहे. त्यांचा एक विलक्षण दावा आहे.


जर उत्तर गोलार्धातील ६० कोटी लोकांनी आज म्हणजे २० जुलै २००६ ला ११ वाजून ३९ मिनिटे १३ सेकंद या वेळेस उडी मारली तर पृथ्वीची कक्षा बदलेल. त्याच्या प्रभावाने हिम वितळण्याचा धोका संपेल. विकिपीडियाच्या स्थळावर याबाबत माहिती दिलेली आहे. अर्थात वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास हे निव्वळ थोतांड आहे असे म्हणतात. एक नक्की की हे जरा मनोरंजक थोतांड आहे. तसंही या उड्या मारण्याच्या वैचारिक कोलांटउडीला काय म्हणायचे हाही एक प्रश्नच नाही का?


या संदर्भात पंचतंत्रातील उंदराची कथा आठवते. एका नगरात एक मंदिर होते. त्या शेजारी उंदरांची प्रजा राहत असे. त्यांच्या राजाचे नाव होते हिरण्यक. तो अचाट उड्या मारायचा आणि मंदिरात आलेल्या धान्याची नासाडी करायचा. त्यामुळे त्या मंदिराचा पुजारी त्रस्त होता. एकदा त्याचा मित्र त्याला भेटायला आल्यावर त्याने आपली व्यथा सांगितली. मित्र म्हणाला, 'धनाची उब असल्याशिवाय अशा उड्या मारणे शक्य नाही!' त्यांनी उंदरांचे वसतिस्थान खणून काढले. धन नेले आणि त्यांची समस्या सुटली. तात्पर्य हेच की एकूणच पाश्चात्य देशात पैसा जरा जास्त झालेला दिसतोय. त्याविना असले चाळे सुचत नाहीत.


ह्यावरून मला एक चांगली कल्पना सुचली आहे. जर पृथ्वीची कक्षा बदलू शकते तर त्याहून (थोड्या) छोट्या गोष्टी का नाही होणार? म्हणजे, सगळ्या भारतीयांनी १ ऑगस्ट २००६ रोजी दुपारी बारा वाजता आपापल्या शहरात उडी मारावी. त्याच्या प्रभावाने भूमीवर जे प्रचंड कंपन निर्माण होईल त्याने सीमेपलीकडे असलेले अतिरेक्यांचे सगळे तळ नष्ट व्हायला हरकत नसावी. कोणत्या भागातल्या लोकांनी उडी नक्की किती फुटांवरून, कोणत्या कोनातून मारावी वगैरे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून मिळेलच.


काय म्हणता? वाटल्यास काही म्हणू नका, पण हा प्रकार जरा हलकेच घ्या आणि उडी अवश्य मारा, :)


इंग्रजी दुवे -


http://en.wikipedia.org/wiki/World_Jump_Day
http://www.madphysics.com/ask/world_jump_day_debunked.htm