मराठीच्या सद्यःस्थितीबद्दल यथेच्छ टाहो फ़ोडून झाल्यावर आपण विचार करू की आपण मराठीसाठी काय करतो ? मी स्वतः खालील गोष्टी करतो.
१) ऑफ़िसमधल्या गणेशोत्सवात (ठार नास्तिक असूनही) झब्बा घालून, पुढे उभा राहून मोठ्या आवाजात "सुखकर्ता दुःखहर्ता" ही मराठी आरती म्हणतो.
२) ज्यांना मराठी समजतं त्यांच्याशी मराठीतच बोलतो.
३) संक्रांतीला मुद्दाम सगळ्यांना तिळगूळ वाटून "आमच्यात असं का असतं" हे समजावून सांगतो"
४) यंदा पालखी पुण्यात आल्यावर ट्रॅफ़िकच्या नावानी बोंब मारणाऱ्यांना ही लाखो लोकं कामंधामं सोडून पंढरपूरला का मरायला जातात हे सांगितलं.
५) शुक्रवारी ऑफ़िसच्या पार्टीमध्ये "माझा एकादशीचा उपास आहे" म्हणून काही खाल्लं नाही आणि का उपास आहे ते ही सांगितलं.
ह्या सगळ्यामगचा उद्देश एकच; मी मराठी आहे आणि "आमच्यात असं असतं" हे सगळ्यांना बोंब मारून सांगणे !
आपल्याला सगळ्यांनाच मराठीचा प्रचंड अभिमान आहे. मग तो "फ़्लाँट" का नाही करायचा? तुम्ही पण कुठेतरी, कसातरी हा अभिमान जपत असालच की. कसा तो सांगा पाहू !