असंतोष


आज 23 जुलै २००६, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची १५० वी जयंती आहे.  मी काही या विषयातील तज्ञ नाही पण टिळकांना मनापासून खूप मानणारा आहे.  टिळकांच्या जन्मशताब्दीलाही माझा जन्म झाला नव्हता तेंव्हा त्यांचा अथवा त्या काळाचा कधी अनुभव येणे तर लांबच राहिले... तरी देखील जे काही आतापर्यंत या थोर माणसाबद्दल वाचले आहे ते आठवूनही मला त्यांची आजच्या काळातही उणीव भासते. लोकसंग्रह, प्रचंड वाचन, लेखन, देशप्रेमाने आत तापलेल्या लोहाप्रमाणे पण वरून मात्र बर्फाचा थंड गोळा, कर्मयोग हा आचरणात आणणारा हा महान माणूस.


वास्तविक आपल्यापैकी बय्राचजणांनी लहानपणी टिळकांच्या "ठेवणीतील" गोष्टी ऐकल्या असतीलः आकाश पडले तर काय करशील, 'मी दाणे खाल्ले नाहीत मी फ़ोलफ़टे उचलणार नाही', आणि सर्वात महत्वाचे म्हणजे "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच".. इत्यादी.


टिळकांचे "समग्र टिळक ख़ंड" (क्षमस्व पण मला बिनचूक नाव आठवत नाही आहे, पण मी कधी काळी हे थोडेफार अथवा "फार थोडे" पण वाचले आहे), गंगाधर गाडगीळांचे "दुर्दम्य" ही ऐतिहासिक कादंबरी, आणि गोविंद तळवळकरांचे "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक" हे लेनिनवर पाश्चात्य लेखिकेचे असलेले "नॉट बाय पॉलिटिक्स अलोन" यापुस्तकासारखे पुस्तक खूप माहिती देऊन जाते. दि.वि. गोखले, दुर्गाबाई भागवत इत्यादी मान्यवरांचे पण लिखाण आहे. या काही वाचनातून माझ्या आठवणीत राहिलेले काही मुद्दे  खाली लिहितो आहे. प्रत्येकाचा संदर्भ वेगवेगळा देत नसल्या बद्दल क्षमस्वः



  1. लहानपणापासून टिळक त्यांच्या काका-काकूंकडे राहिले. सुरवातीपासूनच निर्भीड.  विधवाविवाहबद्द्ल समाजात सर्वत्र बोलणाय्रा आणि अनन्यसाधारण सामाजिक मान असलेले न्यायमूर्ती आणि तत्कालीन सुधारक महादेव गोविंद रानडे यांनी स्वतःच्या प्रथम पत्नीच्या मृत्यूनंतर वडिलांच्या आग्रहाखातर लहान मुलीशी (जरठबाला) विवाह केला. त्यावर "आपला समाज सुधारत का नाही" या विषयावर (त्यांनीच चालू केलेल्या) "रानडे" वादविवाद स्पर्धेत एक मुलगा समाजधुरीणांचे आचरण नसल्यामुळे म्हणून असे बोलून "रानड्यांचे " उदाहरण भर सभेत देऊ लागला, तेंव्हा एरवी शांत आणि मृदू असलेल्या रानड्यांचा तोल जाऊन ते त्या मुलावर ओरडले.  तेंव्हा टिळकांनी रानड्यांना भर सभेत सुनावले... त्या काळच्या पुण्यात हा किस्सा खूप गाजला होता. नवीन पिढी उद्धट झाली आहे... पूर्वीचे पुणे आता राहिले नाही असे तमाम पुणेकरांना मनोसक्त म्हणता आले!
  2. टिळक आणि आगरकर हे डेक्कन कॉलेजधील मित्र.  दोघांचे तेज आणि विद्वत्ता पाहून विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी (त्यांना "मराठी भाषेचा शिवाजी" म्हणायचे) जेंव्हा केसरी मराठाचे संपादक होण्यास सांगितले तेंव्हा दोघेही तयार नव्हते कारण दोघांचे शिक्षण इंग्रजीत झाल्याने मराठी लिहिता येयचे नाही. विष्णुशास्त्री म्हणाले की "देशाबद्दल खरच तळमळ असेल तर, शब्द आपोआप सुचतील".  तसेच झाले, आगरकरांची लेखणी त्यांच्या पद्धतीने धारधार झाली तर टिळकांची त्यांच्या पद्धतीने... टिळकांच्या अग्रलेखाच्या शीर्षकांमध्येच खूप काही समजून जाई - "उजाडले पण सूर्य कुठे?",  "प्रिन्सिपॉल, पशूपाल की शिशुपाल?", "हे आमचे गुरूच नव्हेत", "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?" - यातील शेवटच्या अग्रलेखावरूनच त्यांना सहा वर्षांची मंडालेला शिक्षा झाली होती. परत आल्यावर शिथिल झालेल्या चळवळीकडे बघत "पुनश्च हरी ॐ" असा लेख लिहून सुरुवात केली.  त्या आधीच्या दशकात टिळक आणि आगरकर या दोघांनीही अननुभावाने कोल्हापूरच्या शाहू महाराजांबद्द्ल लिहीले, आणि त्या मानहानीच्या खटल्यात दोघांनाही ठाण्याच्या तुरुंगात ठेवले गेले होते.
  3. टिळक आणि आगरकर या दोघांनाही वास्तविक "मानाच्या नोकय्रा" करत सुखाने जगता आले असते. पण आपल्या सुदैवाने तसे ते नव्हते. टिळक तर म्हणायचे की जर आपला देश स्वतंत्र असता तर मी एखाद्या विद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून जगणे पसंत केले असते. म्हणूनच फर्ग्युसन कॉलेज काढले नावारूपाला आणले आणि तिथून बाहेर पडावे लागले तरी त्याचा राग धरून (किंवा ते कारण पुढे करत) समाजापासून दूर जाण्याचे त्यांनी टाळले. पुढे दुर्दैवाने समाजसुधारणा कशी करावी (घर ताब्यात घेऊन साफ करायचे का साफ करून ताब्यात घेयचे) यावरून दोघात टोकाचा वाद झाला. मैत्रीपेक्षा दोघेही तत्त्वाशी एकनिष्ठ राहिले. तरीही जगासमोर सुधारक नसणाय्रा टिळकांना ओळखणारे "प्रच्छन्न सुधारक" म्हणायचे आणि ते खरेही होते. "मुलांच्या चालीने चालावे, मुलांच्या बोलीने बोलावे, तैसे जनासी सिकवावे, हळूहळू" या समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे समाजाचा "तेजोभंग" न करता ते पुढे नेण्याचा प्रयत्न करायचे. म्हणूनच त्यांचे सर्व जाती धर्माशी संबंध होते आणि त्यांना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी अशी पदवी मिळाली होती.  
  4. ब्रिटिशांच्या प्रत्येक डावाला ओळखण्याची क्षमता असल्याने त्यांनी पहिली फाळणी टाळली (बंगालची).  जिनांना त्यांनी सांभाळून घेतले. म्हणूनच जिना त्यांचे वकीलही झाले होते. 
  5. देशाबद्दल अपार प्रेम, दुर्दम्य आत्मविश्वास या मुळे  संपूर्ण भारताचे ते पुढारी झाले. स्वतःच्या आयुष्यात स्वातंत्र्य मिळणार नाही याची चांगली कल्पना असूनही मार्ग न सोडता तो पुढच्या पिढीसाठी तयार केला. ब्रिटिश जेंव्हा त्यांच्या गीतारहस्याचे हस्तलिखित देत नव्हते तेंव्हा काळजी करणाय्रा अनुयायांना म्हणाले की सरकारने नुसते हस्तलिखितच घेतले आहे माझे डोके नाही. सिंहगडावर चार दिवस बसून सर्व लिहून काढीन!
  6. १९१८-१९ च्या दरम्यान कोर्टकचेरिच्या निमित्ताने लंडनला असताना गांधीजींनी त्यांची भारतातील पहिली चळवळ चालू केली. आपण जागी केलेली  सामान्य जनता आणि तिच्यातला असंतोष हे आपल्यानंतर  पुढे नेण्याचे कर्तृत्व या माणसात आहे हे ह्या महान माणसाने जाणले आणि आपल्या अनुयायांना गांधीजींना मदत करायला सांगितली. गांधींचा टिळकांवरचा आदर काही कमी नव्हता म्हणूनच त्यांना (गांधीजींना) जेंव्हा सहा वर्षांची शिक्षा झाली तेंव्हा त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर आले की टिळकांसारखी शिक्षा होणे हा मी माझा सन्मान समजतो...

टिळकांची लोकप्रियता प्रचंड होती आणि सर्व थरात होती. टिळकांची अंत्ययात्रा आणि लोकांना झालेली दुःख ही एक ऐतिहासिक आठवण आहे. अशी गोष्ट वाचली आहे की टिळकांना गांधीजी खांदा देऊ लागले तेंव्हा कुणीतरी त्यांना अडवले कारण ब्राम्हणाला बनिया कसाकाय खांदा देणार? गांधीजी क्षणभर थांबले आणि म्हणाले "लोकसेवकाला जात नसते..." आणि पुढे चालू लागले. आणि मग टिळकयुगाचा अस्त आणि गांधीयुगाचि सुरवात झाली...


तुम्हाला आठवणारी गोष्ट इथे सांगत रहा...