गलथानपणा आणि रक्तदाब

'एकशे साठ नव्वद...' डॉक्टर कानातल्या नळ्या बाहेर काढत म्हणतो. 'गेल्या वेळी ठीक होतं.. एव्हढ्यात काय झालं? गोळ्या घेताय ना वेळेवर?'
मी चपला घालतो. 'काय काय सांगू बाबा तुला...' 'आतल्या' आवाजातला माझा आत्मसंवाद सुरु होतो. 'सकाळी संगणक सुरु करताना त्याचा कळपट पुढं ओढला की त्यावर ठेवलेली इमिटेशन ज्वेलरी खाली पडते. बाहेर 'साखर' असं लिहून आत कुरड्या ठेवलेल्या डब्यावर गेल्या आठवड्यापासून गायब झालेला मोबाईलचा चार्जर विराजमान झालेला असतो. संगणकाचा सीपीयू, मॉनिटर आणि स्पीकर्स सगळे बंद असं फक्त लाईट गेले असतील तरच होतं . सोफ्याच्या गादीखाली टीव्हीचा रिमोट ठेवणे हे काय कुणीही करेल, पण गॅसच्या दोन शेगडयांमध्ये चटके सहन करत बसलेला बापुडवाणा रिमोट पाहिलाय तुम्ही? आणि तुरीची डाळ एकाच वेळी दोन डब्यात अर्धी अर्धी भरून ठेवली की ती जास्त चांगली लागते हे माहिती नसेल तुम्हाला! आता यात माझ्या ब्लडप्रेशरकडे कुठं बघत बसू...?'
'ऑपोझिटस ऍट्रॅक्ट' हे नीटनेटकेपणाच्या बाबतीतही लागू झालं असतं तर किती छान झालं असतं! नवऱ्यानं पायजमा सोडून पँट घातली की जमिनीवर ळ च्या आकारात पडलेला पायजमा बायकोनं उचलून वॉशिंग मशीनमध्ये टाकलाच. पेपरचं पहिलं पान सोफ्यावर, दुसरं कॉटखाली आणि पुरवणी डायनिंग टेबलवर असं करून बायको अंघोळीला गेली की नवऱ्यानं 'मेरा छोटासा देखो ये संसार है...' असं गुणगुणत ती सगळी पानं गोळा केलीच. आणि नवरा बायको दोघेही अप्रतिम गबाळे असतील तर मग विचारायलाच नको. 'अगं, हे पाहिलंस का तू चुकून फ्रीजमध्ये ठेवलेल्या बटाट्याला किती छान कोंब आलेत...' असं त्यानं म्हणताच तिनं 'आणि तुम्ही परवा पिशवीतच विसरलेली केळी बघा किती मस्त काळी पडलीयत..' असं कौतुकानं म्हणावं. ' परवा गॅसवर परत दूध ओतू गेलं ना, तेंव्हा ओट्यावर इतकं सुंदर ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग झालं होतं ना, मी लग्गेच माझ्या मोबाईलवर त्याचा फोटो काढून ठेवला..' असं त्यनं म्हणावं तर 'तुम्ही पँटमध्ये विसरलेल्या आणि वॉशिंग मशीनमधून धुवून आलेल्या नोटांची सेंचुरी झाली बरं का.. असं तिनं म्हणावं..
पण असं इतकं सोपं सगळं थोडंच असतं? मग असले 'आजारी' गरीब बिचारे पुरुष चडफडत का होईना, साबणाच्या तुकड्यातुकड्यांना पाण्यात भिजत घालून त्याचा लिक्वीड सोप तयार करतात, काही ठिकाणी मेदवृद्धी झालेली आणि काही ठिकाणी खपाटीला गेलेली टूथपेस्ट लाटण्याने चेपून सगळी पेस्ट समोर आणून मागे घड्या घालून ठेवतात, अमृतांजन, व्हिक्स च्या बाटल्या उचलून जागेवर ठेवतात, ज्या त्या उशीला जे ते अभ्रे आणि ज्या त्या पेनाला ती ती झाकणे घालून ठेवतात..
'काही नाही हो... मध्ये जरा टेन्शन होतं. आता होईल ठीक...' मी उघडपणे म्हणतो.