अभिनंदन पुणे! - अभिनंदन नरेंद्र जाधव!!

गेले काही दिवस असणारी ही कुलगुरुपदाची ही अटकळ आज खरी ठरली आहे.


अभिनंदन पुणे! - अभिनंदन नरेंद्र जाधव!!


सकाळमधील ही बातमी चिकटवतो आहे.


पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नरेंद्र जाधव








सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २९ - ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, रिझर्व्ह बॅंकेचे कार्यकारी संचालक आणि "आमचा बाप आणि आम्ही' या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक डॉ. नरेंद्र जाधव यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. २२ ते २५ ऑगस्टदरम्यान पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांनी "सकाळ'ला सांगितले. ....
.... विविध कारणांमुळे कुलगुरू निवडीची प्रक्रिया लांबल्याने संभ्रम निर्माण झाला होता. अनेक जणांची नावे चर्चेत होती. काही अफवाही पसरल्या होत्या. शोध समितीने जाहीर केलेल्या पॅनेलमध्ये डॉ. जाधव यांचे नाव आल्यानंतर तेच कुलगुरू होणार, अशी अटकळ होती. मात्र, रिझर्व्ह बॅंकेतील मोठे पद सोडून ते कुलगुरू होतील काय, असा प्रश्‍न विचारला जात होता. कालच्या मुलाखतींनंतर कुलपतींनी निवड जाहीर न केल्याने संभ्रमात भर पडली होती. मात्र, डॉ. जाधव यांच्या नियुक्तीने या सर्व चर्चांवर आता पडदा पडला आहे.

डॉ. जाधव यांची कुलगुरुपदी झालेली नियुक्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. गेली अनेक वर्षे शास्त्रज्ञ किंवा विज्ञान शाखेतील व्यक्तींना कुलगुरू होण्याचा मान मिळाला आहे. डॉ. जाधव यांच्या रूपाने मानव्यविद्या शाखेला हा मान आता मिळत आहे. तसेच, प्रथमच अर्थतज्ज्ञ व्यक्ती पुणे विद्यापीठाची कुलगुरू होत आहे. डॉ. जाधव ख्यातनाम साहित्यिक आणि वक्ते आहेत. तसेच, सामाजिक कार्यकर्तेही आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतही समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकाला कसा न्याय मिळेल, याचा विचार ते करतात.

डॉ. जाधव यांचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत झाले. अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठाची डॉक्‍टरेट पदवी त्यांनी मिळविली. त्या वेळी त्यांना उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्याचे पारितोषिकही मिळाले. १९७७ पासून रिझर्व्ह बॅंकेच्या सेवेत. "इकॉनॉमिक ऍनिलिसिस अँड पॉलिसी' विभागाचे प्रमुख. सध्या "यूएसएड' प्रकल्पाअंतर्गत अफगाणिस्तानच्या दा बॅंकेत काम. १९९८ ते २००२ या काळात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. "आयएमएफ'वरच मूल्यांकन अधिकारी म्हणूनही काम. इथिओपियाच्या नॅशनल बॅंकेच्या गव्हर्नरचे सल्लागार म्हणूनही काम केले.

ॅनिटरी इकॉनॉमिक्‍स, पब्लिक फायनान्स, इंटरनॅशनल इकॉनॉमिक्‍स आणि इकनोमेट्रिक्‍स या विषयांत त्यांनी प्रामुख्याने संशोधन केले आहे. "डॉ. आंबेडकर ः इकॉनॉमिक थॉट्‌स अँड फिलॉसॉफी' हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यासाठी त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. "आमचा बाप आणि आम्ही'चे इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत भाषांतर झाले आहे. याच पुस्तकावर हिंदी भाषेत दूरचित्रवाणी मालिका निघाली. त्यांची "मॉनिटरी इकॉनॉमिक्‍स फॉर इंडिया', "चॅलेंज टू इंडियन बॅंकिंग ः कॉम्पिटिशन, ग्लोबलायझेशन अँड फायनान्स मार्केटिंग' आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत.

प्रेरणादायी प्रवास
"आमचा बाप आणि आम्ही' या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक म्हणून डॉ. जाधव अधिक प्रसिद्ध आहेत. समाजाच्या तळाच्या पायरीपासून वरच्या स्तरापर्यंत गेलेल्या मुलांच्या आणि स्वतः कष्ट करून त्यांना प्रेरणा देणाऱ्या वडिलांच्या (दामोदर संताजी जाधव) अस्सल कहाणीने मराठी मनाचा ठाव घेतला. जाधव कुटुंबीय मूळचे ओझर- नाशिक येथील. दामोदर संताजी जाधव (डॉ. जाधव यांचे वडील) यांनी सुरवातीला हमाली केली. मग "जीआयपी' रेल्वेत बिगारी म्हणून कामाला लागले. पुढे रेल्वे पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीला लागले. त्यांनी मुलांवर चांगले संस्कार केले, त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. चारही मुलांनी उच्च शिक्षण घेतले. थोरला मुलगा "आयएएस' झाला, दुसरा मुलगा दुबईत "गल्फ एअर'मध्ये स्थिर होतो आहे, तिसरा मुलगा मुंबई महापालिकेत अधिकारी आणि चौथा मुलगा म्हणजे डॉ. नरेंद्र जाधव.

पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद मिळाल्याने डॉ. जाधव यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे


-----------------------------------------------------


नरेद्र जाधव यांच्या आमचा बाप आणि आम्ही यांतील काही लेख पूर्वी सकाळमध्येच आलेले वाचले होते. दुवेही होते. पण नवीन मांडणीत ते सापडत नाहीत. इतर कोणास ते गवसल्यास येथे जरूर द्यावेत.