वाक्प्रचारांच्या व्युत्पत्ती ( भाग दुसरा )

      मनोगतींचे वाक्प्रचारांवरचे प्रेम पाहून आणखी माहिती देण्याचा मोह आवरला नाही. म्हणींवर आणि पर्यायाने मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांचा 'संप्रदाय' वाढो एवढीच इच्छा.
      हरताळ फासणे----हरताळ नावाचा एक पिवळा विषारी पदार्थ आहे. पूर्वी पोथ्या पुस्तके हाताने लिहीत असत. लिहिताना एखादा शब्द चुकला तर तो शाईने न खोडता त्यावर हरताळाची पूड फासत. त्यावरून वाचक समजे की हा शब्द वाचायचा नाही. या वरून हरताळ फासणे म्हणजे कलंक लावणे. 
      हरताळ पाडणे---- हर हे हट किंवा हाट याचे अपभ्रष्ट रूप. हट किंवा हाट म्हणजे बाजार. ताळ म्हणजे कुलूप. हरताळ म्हणजे बाजार बंद करणे, संप पुकारणे.
      ससेमिरा लागणे.----एखाद्या गोष्टीची एकसारखी चिंता लागणे, ध्यास लागणे. एका राजपुत्राने एका अस्वलाचा विश्वासघात केला म्हणून अस्वलाने त्याला शाप देण्यासाठी चार श्लोक रचले.त्यांची आद्याक्षरे स,से,मि,रा अशी होती.या शापाने राजपुत्राला वेड लागले आणि तो स,से, मि,रा ही अक्षरे बडबडू लागला. 'जर कोणाच्या तोंडून हे चारी श्लोक ऐकलेस तर तुझे वेड जाईल'असा उःशापही  अस्वलाने दिला होता. पुढे एका राजकन्येच्या तोंडून त्याने अस्वलाचे ते चार श्लोक ऐकले आणि त्याचे वेड गेले अशी कथा बृहत्सागर या ग्रंथात आहे. 
      त्रिशंकूसारखी स्थिती होणे----त्रिशंकू नावाच्या एका राजाने सदेह स्वर्गाला जाता यावे म्हणून यज्ञ केला आणि स्वर्गलोकी गमन केले. पण देवांनी त्याला खाली लोटून दिले. विश्वामित्रांना हे आवडले नाही. त्यांनी आपल्या तपःसामर्थ्याने त्रिशंकूला वर वर चढवण्याचा प्रयत्न केला पण त्रिशंकू स्वर्गापर्यंत पोहोचू शकला नाही. धड स्वर्गलोकी नाही आणि धड मृत्युलोकी नाही अशा स्थितीतच तो लोंबकळत राहिला.
      इंगा फिरणे----इंगा हे चांभाराचे उलथन्यासारखे हत्यार. चामड्याच्या वाद्यांचा ताठपणा घालवण्यासाठी त्यांच्यावरून हे हत्यार फिरवतात.या वरून इंगा फिरणे म्हणजे दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडल्याने ताठा जिरणे.
      वाऱ्यावर वरात  देणे----याचा अर्थ पोकळ आश्वासने देणे. सध्या आपण चेक देतो तसे जुन्या काळी हुंड्या देत. पण राजे लोक चेक देत त्याला वरात देणे असे म्हणत. वरात एखाद्या जबाबदार व्यक्तीकडे पाठवली जाई.त्यात अमुक एका इसमाला तुमच्या वसुलीतून अमुक इतकी रक्कम द्यावी असा हुकूम असे. अशी वरात वाऱ्यावर दिली तर ती पोहोचणार तरी कुठे?
      बोऱ्या वाजणे--- याचा अर्थ पराभव होणे,पुरती वाट लागणे. बोऱ्या म्हणजे शिंदी, ताड इत्यादीच्या पानाची चटई. पूर्वी खजुरासारखे पदार्थ असल्या चटयांतून किंवा बोऱ्यांत गुंडाळून पाठवत.असा माल नेत असताना बोऱ्या फाटला म्हणजे सगळा माल वाया जाई. 
      सूत उवाच करणे---सगळ्या पौराणिक कथा सूतांनी शौनकांना सांगितल्या आहेत म्हणून कथेच्या प्रारंभी सूत उवाच  असे दोन शब्द येतात. यावरून सूत उवाच करणे म्हणजे सुचवणे किंवा प्रारंभ करणे.
      गौडबंगाल---बुद्धीने आकलन न होण्याजोगी गूढ गोष्ट. पूर्वी गौड आणि बंगाल हे दोन देश मंत्रतंत्रविद्येबद्दल प्रसिद्ध होते त्यावरून हा शब्द झाला आहे. 
      कानाला खडा लावणे---कानाची पाळी फार नाजूक असते. त्या ठिकाणी खडा लावून दाबणे हा पूर्वीच्या काळी शिक्षेचा प्रकार होता. कानाला खडा लावणे म्हणजे पुन्हा तीच चूक होऊ नये म्हणून स्वतःला शिक्षा लावून घेणे. 
      चंबू गवाळे आटोपणे---चंबू म्हणजे तांब्या आणि गवाळे म्हणजे सोवळे ठेवण्याची पिशवी. दुसऱ्याच्या घरी जेवल्यानंतर ही दोन्ही काखेत मारून लोक घरी येण्यास निघतात. 
      पडत्या फळाची आज्ञा---सीतेला शोधत शोधत मारुती जेव्हा अशोकवनात पोहोचला तेंव्हा तो अतिशय भुकेला होता. त्याने सीतेजवळ बागेतली फळे खायची आज्ञा मागितली तेंव्हा तिने फक्त जमीनीवर पडलेली फळे खाण्यास परवानगी दिली. मारुतीने लगेच मोठे मोठे वृक्ष मुळांसकट उपटून त्यांची जमीनीवर पडलेली फ'ळे खायला सुरवात केली.
      या लेखात आणि 'थोडसं म्हणींविषयी ' व ' संप्रदायांच्या व्युत्पत्ती'  या माझ्या लेखांत दिलेली माहिती खालील पुस्तकांतून घेतली आहे.
     'म्हणीः अनुभवाच्या खाणी ' लेखक---नी. शं. नवरे व य. न. केळकर.
      'मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी'  लेखक---वा̱̱.गो.आपटे.  
                                                                        वैशाली सामंत.