राजाचे कान सुप्पाएवढे!

सुपाएवढे कान असणाऱ्या राजाची गोष्ट आठवते का? राजाच्या त्या कानांची एका शेतकऱ्याला गम्मत वाटली. पण बोलायची सोय नाही! सुळावर चढवलं म्हणजे? शेवटी शेतकऱ्याने एक खड्डा खणला आणि त्यात डोकं घालून हळूच म्हणाला, "राजाचे कान सुप्पाएवढे, राजाचे कान सुप्पाएवढे" ... आणि खड्डा बुजवून टाकला. पुढे त्या खड्ड्यातून एक रोप वाढलं आणि त्या रोपाच्या पानापानांतून आवाज यायला लागला, अशी ती गोष्ट पुढे जाते.


आपल्या सुदैवाने भारतात किंवा इथे अमेरिकेत आता राजाला एवढं घाबरायची परिस्थिती उरलेली नाही. कोणीही उठावं, आणि "राजा भिकारी, माझी टोपी चोरली" म्हणावं, यात आपल्याला काही नवल वाटत नाही. अमेरिकेतला "सॅटर्डे नाइट लाइव" किंवा आपल्याकडचा "मूवर्स अँड शेकर्स" हे याच पठडीतले कार्यक्रम.


परवा मात्र याचा कहर पाहिला! "सॅटर्डे नाइट लाइव" मधला बहुरूपी स्टीव ब्रिजेस याने पत्रकार संघाच्या एका संमेलनात बुशरावांचं सोंग घेतलं, आणि बुशरावांची आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची यथेच्छ टिंगल केली. बुशरावांचे चुकीचे शब्दप्रयोग आणि शब्दोच्चार, घसरती लोकप्रियता, ख्रिस्ती सनातन्यांचे लांगुलचालन, आंतरराष्ट्रीय परीस्थितीबद्दल (अ)ज्ञान, उपाध्यक्ष डिक चेनी यांनी मित्रावर "चुकून" छर्ऱ्याची बंदूक चालवली तो प्रसंग, त्याच चेनीरावांचा हृदयरोग ... काही काही सुटलं नाही.


पण विषेश म्हणजे हे सगळं अध्यक्षांच्या उपस्थितीतच झालं. एवढंच नाही, तर स्वतःवरच्या या चिखलफेकीची मूळ कल्पनाही बुशरावांचीच! पत्रकारांसमोर द्यायच्या या भाषणात प्रकट भाग स्वतः बुशरावांनी म्हटला आणि त्याजोडीचं मजेदार स्वगत हे त्या बहुरूप्यानं म्हटलं.


बुशरावांचं बाकी सगळं सोडा हो, पण या कल्पकतेला आणि मनमोकळेपणाला तरी दादच द्यायला हवी. अजून ते काय करू शकता म्हणा!


गूगल विडियो चा दुवा


अमेरिकन राजकारणाशी परिचय नसला तरीही तुम्हाला आवडेल असं वाटतंय. कसं वाटलं, ते सांगा. आणि भारतात यासारखं काही झालं असेल तर तेही सांगा.


- कोंबडी


आधी चर्चा सदरात टाकलेला हा प्रस्ताव गद्य साहित्यात हलवायचा होता, पण move च्या खाली काहीच सोय दिसली नाही. फक्त Array असं दिसलं. सबब येथेच ठेवत आहे.