वाचावे ते नवलच - ६ - चीनमधील कुत्री आणि भारतातील जंतुनाशके

चीनमधील एका गांवांत ५० हजार कुत्रांना ठार मारल्याची एक बातमी मागच्या आठवड्यात वाचली तेंव्हाच त्यावर लिहावंसं वाटलं होतं, पण असंही वाटलं की या भयंकर बातमीचीसुध्दा गंमत वाटणारा हा सैतान कोण आहे असं प्राणीमित्रांनी उगाच म्हणायला नको. पण आज आणखी दोन बातम्या वाचल्या आणि लिहायचं ठरवलं.
चिनी लोकांना अखाद्य असं कांही नसतं असं ऐकलं होतं. त्यामुळे झुरळं, उंदीर वगैरेंचा चट्टा मट्टा करणारे चिनी कुत्र्यामांजरांना तर सोडणारच नाहीत, ती आतां फक्त प्राणिसंग्रहालयातच ठेवलेली असतील असं मला वाटायचं. आता त्यांना रानांत रहाण्याची संवय नसल्यामुळे त्यांच्यासाठी खास अभयगृहे वगैरे बांधण्याची योजना असावी असाही एक विचार मनांत आला होता. त्या सगळ्याला धक्का बसला त्याचं मला हंसू आलं.
आज असं वाचलं की जगभर झालेल्या विरोधाला न जुमानता दुस-या एका शहरात ५ लाख कुत्री मारणार आहेत. त्यापुढे असेही लिहिलं आहे की तेथे १६ माणसे रेबीज या रोगाला बळी पडली आहेत व या भयानक रोगाला आळा घालण्यासाठी अशी हत्या आवश्यकच आहे. पहिल्या घटनेतील गांवांतसुध्दा ३ माणसे दगावली होती. रेबीज हा रोग चीमनध्ये दुस-या क्रमांकाचा जीवघेणा रोग झाला आहे म्हणे. पहिला कोठला हे लिहिलेले नाही,
दुसरी एक बातमी अशी आहे की भारतातील अनेक शहरातील भूगर्भजलामध्ये बदनाम झालेल्या शीतपेयांपेक्षाही कांही पटीने अधिक प्रमाणांत जंतुनाशके आढळली आहेत. ती कुठून आली? अर्थातच ज्या कीटकनाशकांचा व उंदरांच्या विषांचा सर्व माध्यमामधून धडाक्याने प्रचार केला जातो त्याचा अतिरेक होत असणार. तरीही ते कीटक किंवा प्राणी नष्ट झालेले नाहीतच. कदाचित कांही प्रमाणांत कमी झाले असतीलही. या हत्येबद्दल प्राणीमित्रांचे काय म्हणणे आहे?  उंदराचा जीव व कुत्र्याचा जीव वेगळा असतो कां? त्यांचा उपद्रव माणसांनी किती आणि कां म्हणून सहन करायचा? हे प्रश्न सुध्दा पडतातच ना?