अवडंबर

फोडतो घडा, चिंब भिजवतो जो कंकर होउनी
कधी भिजवतो वत्सल आंचल तो पाझर होउनी

उसळतो कधी लाटेसम मी प्रीतीच्या सागरी
शांत बैसतो कधी किनारी औदुंबर होउनी

पाहता तिला स्फुरती कवने गात्रागात्रातुनी
रोम रोम देहाचा गायी गीत अधर होउनी

मोहरू पुन्हा, गतसालाचे विसरू कोमेजणे
सहा ऋतुंचा सरला फेरा संवत्सर होउनी

अवचित ढळता पदर बदलला नूर,मैफली, तुझा
दाद लागल्या देऊ नजरा केवळ नर होउनी

काय मनाची घालमेल अन् काय स्थितप्रज्ञता
पार्थ कालचा गीता सांगे योगेश्वर होउनी

भृंग, मेणबत्त्यांनी दाखव सहानुभूती तुझी
राहिली अता माणुसकीही अवडंबर होउनी