वाग्वैजयंती - काय करावे?


काय करावे?

[आचरटपणापलीकडे या ओव्यांची फारशी किंमत नाही.]

उन्हाळ्यासाठी पाणी न ठेवून | नदी वेगे जाता पळून |
भक्कम दगडांचे धरण बांधून | तिला अडवता येतसे || १ ||

अगदी आपला नेम धरून | तोफ सुटता धडधडून |
हळुच बाजूला सरून | मारा चुकविता येतसे || २ ||

अंतराळी कडकडून | वीज घरावरी पडता तुटून |
उंच खांबांत बांधून | पाताळी सोडिता येतसे || ३ ||

सावकारांनी वैर धरून | जप्ती आणिता दावा करून |
मागील बाकी देऊन | तिला उठविता येतसे || ४ ||

अगदी नीट रोख धरून | म्हैस मागी येता धावून |
एकदम छत्री उघडून | तिला पळविता येतसे || ५  ||

जुन्यानव्याची चोरी करून | भिकार कवि येता कविता घेऊन |
कशी तरी एकदा वाचून | चुकविता येतसे || ६ ||

सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून |
तोंडाळ बायको कडकडून — | येता, काय करावे? || ७  ||

गोविंदाग्रज

गोविंदाग्रजांच्या वाग्वैजयंतीतल्या आवडलेल्या कविता मनोगतींसाठी  देण्याचा मानस आहे. ह्या उपक्रमातली ही पहिली कविता.