एक प्रवासवर्णन आमचेही!!! - ६

मी बऱ्याचदा या महाड रस्त्याने गेलो आहे आणि रायगड रोपवेच्या बोर्डाकडे अगदी मान वळवून वळवून पहात आलो आहे पण जायची संधी कधी सापडली नव्हती. पण आज तसे होणार नव्हते!! पहिल्या लेखात मी म्हटल्याप्रमाणे, मी हा बेत फक्त प्रभाकर पेठकरांचे  रायगडचे प्रवासवर्णन वाचून केला.

आता आम्ही रायगडाला जाण्यास वळलो होतो. अत्तापर्यंत कमीतकमी ८० / ९० किमीचा प्रवास झाला होता पण तो ताण / शीण कुठच्याकुठे गायब झाला जेव्हा पहिला दगड दृष्टीस पडला "रायगड २२ किमी." "पाचाड २५ कि.मी." पण आत्तापर्यंतच्या माझ्या ज्ञानानुसार पाचाड हे रायगडच्या पायथ्याचे गाव त्यामुळे ते प्रथम यायला हवे!!! पण सरकारी कि.मी असतील असे मानुन मी दुर्लक्ष केले.

मोजक्या "टमटम" माणसांनी तुडुंब भरलेल्या येजा करीत होत्या. पावसाला अचानक जोर आला आणि मनात एक विचार आला चला बरेच झाले आपण सकाळी आलो काही चिंतेची गोष्ट नाही. अगदी आरामशीर किल्ला अनुभवता येईल.

वातवरण धुंद होते, एक प्रकारचे चैतन्य होते त्या सर्व वातावरणात की ते शब्दात वर्णन करायला या पामराला तरी निश्चितच शक्य नाही. रस्ता जवळजवळ चारही बाजुंनी सह्याद्रिच्या पर्वत रांगांनी वेढला होता. शेते हिरवीगार झाली होती आणि त्यातुन शुभ्रगार पाणी झुळुझुळू वाहात होते. एक दोन पुल पार करून आम्ही आता घाट चढायच्या तयारीत होतो. आणि तेव्हढ्यात एक लाल डबा (S.T.) आम्हाला दिमाखात पार करुन गेला, चिखल उडवत!!



सर्व रस्ताभर एक आवाज आमचा पाठलाग करत होता असे उगाच वाटले, म्हणुन एका वळणावर थबकलो पहातो तो काय एक प्रचंड मोठा धबधबा समोरच कोसळत होता. आणि न रहावुन मी मनसोक्त भिजुन घेतले.
त्याची ताकद एवढी होती की खाली उभे राहीलेल्या माणसाला चांगले फटकेच पडतील. हूफ्फ...



फ्रेश होउन पून्हा एकदा मार्गस्थ झालो... पाचाड पर्यंतचा हा रस्ता साफ वळणा वळणांचा आहे, माझ्या बायकोला माथेरानची आठवणच झाली, पण हा घाट मझ्यामते त्याहीपेक्षा कठीण होता आणि जास्त लांबीचाही. पाचाड पार करुन आता आम्ही हिरकणीच्या गावी पोचलो होतो, जिथुन हा रज्जुमार्ग थेट रायगडावर नेतो.



तिकीटाचा भाव ऐकुन (१३० रु प्रती माणशी) मी अर्धा स्वर्गात पोचलोच होतो. ;) नशिबाने आम्हाला एकही मिनीट वाया न घालवता रायगडावर जाता आले, आमच्या आधी काही मंडळी आगोदर येउन पोचली होती.

आम्हाला प्रत्येकी ४ असे २ डब्यांत कोंबुन कर्मचाऱ्याने बाहेरुन कडी ठोकली.
माझी बायको मला म्हणाली वरती कोण receive करणार का? मी म्हटले हो आणि स्वाग़तपेय ही देतील काळजी नको. ज्येमेतेम आमचा डबा बाहेर पडायला आणि पावसाला सुरुवात व्हायला एकच वेळ मिळाली जणु काही तो दबाच धरुन बसला होता. आम्हाला पुर्ण भिजवून तो गायब झाला.

रज्जुतून दिसणारे दृष्य मनोहारी का काय तसे होते. (आणखिन अलंक्रित भाषा वापरणे म्हणजे मला न जमणारेच आहे.) पण ते सर्वपणे अवर्णनिय होते. तुम्हीच पहा...



मोजुन ४ मिनीटात ढग कापुन आम्ही रायगडावर पोहोचलो होतो. हा मधला प्रवास म्हणजे मी ऊघड्या आणि बायकोने डोळे मिटुन अनुभवला होता, आणि असे वाटत होते की आम्ही एखाद्या उघड्या विमानात बसलो आहोत. सगळी कडे फक्त धुके का ढग म्हणावे त्यांना? ते होते.

नेहमी प्रमाणे एका सराईत गाईडने आम्हाला रायग़डाची इत्यंभुत माहीती दिली आणि तासाभरात मोकळे केले. (एक सांगायचे विसरलो ह्या तिकीटामधे परतीचा प्रवास आणि गाईडची फी आणि एक छोटा माहितीपट धरलेले असते.)



क्रमशः