हे असे का होते?

भारतातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) ह्या क्षेत्रात उमेदवारांच्या नोकरीकरता मुलाखती घेत असताना काही गंमतशीर निरीक्षणे आढळली. त्यात तथ्य आहे याची खात्री आहे फक्त त्यामागची कारणे जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न


९०% अधिक लोकांनी प्रोग्रॅमिंग भाषा,संकेतस्थळ निर्मिती, डेटाबेस तंत्रज्ञान , ईआरपी या सर्व क्षेत्रात ते पारंगत आहेत असे लिहीले होते,  त्याकरता बेसिक पासून तर जावा, पर्ल, ओरॅकल, सॅप ह्या सकट सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचे कौशल्य त्यांच्या माहितीपत्रकात नमूद केले होते. फक्त ५ वर्षाच्या वर वा तेवढा अनुभव असणाऱ्या सदस्यांनी मात्र त्याशिवाय त्यांचा अनुभव ज्या क्षेत्रात जास्त आहे त्यावर अधिक भर दिला होता. बरेचदा अधिकाधिक सदस्यांनी आम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करायला तयार आहोत असे म्हटले होते.


जे उमेदवार माहितीपत्रकात खरी माहिती प्रामाणिकपणे नमूद करतात त्यांनी कृपया गैरसमज करून घेऊ नये.


अनुभवाअंती माहितीपत्रकातील ६०% माहिती केवळ आकर्षक माहितीपत्र करण्यास भरली होती असे आढ्ळते. कित्येक उमेदवार मुलाखतीत उघडे पडतात तर काही त्यातूनही पार पडून नोकरीत रुजू होतात. अशांपैकी मग ज्या क्षेत्रात पारंगत आहोत असे दिले असते त्यापैकी एखाद्यावर काम सुरू करताना  विविध संकेतस्थळांवरून मदत घेतात व ते तंत्रज्ञान पगार घेत शिकू लागतात हे कितपत योग्य आहे?


या मागे कोणती कारणे आहेत?


सगळेच तंत्रज्ञान आवडते व त्यात सारखी गती असे शक्य आहे का?


आपली आवड निवड याचे काही निकष त्यांना नसतात का? असून मनाविरुद्ध ते असे करतात का? असे असेल तर त्याची कारणे काय आहेत?


 स्थापत्यशास्त्र, उत्पादनतंत्र , रसायनशास्त्र यामधील कंपन्यात येणारे उमेदवार एवढ्या मोठ्या प्रमाणात खोटी माहिती भरतांना आढळले नाही. तुमचे काय मत आहे? असे का होते?


आमचा अनुभव असा नाही असे तुमचे मत असेल तर त्याविषयी सुद्धा चर्चा इथे व्हावी.