(वाग्वैजयंती - काय करावे?)



काय करावे?

[आचरटपणापलीकडे या ओव्यांची(ही) फारशी किंमत नाही.]


ताजे लिखाण पाहून । "अहाहा!" प्रतिसाद देऊन ।

उपकारातळी दाबून । प्रतिसाद घेता येतसे ॥ १ ॥



नवीन सदस्य पाहून । नवखा आहे हे जाणून ।

उसळता चेंडू टाकून । बळी मिळवता येतसे ॥ २ ॥


मुळमुळीत काव्य खरडून । कुणी न देती प्रतिसाद, वाचून ।

दुसऱ्या नावे प्रवेशूून । प्रतिसाद देता येतसे ॥ ३ ॥


बराच यत्न करून । काही न सुचे झडकरून ।

वादग्रस्त चर्चा टाकून । धूळ उडवता येतसे ॥ ४ ॥


जुन्यानव्याची चोरी करून | टुकार कवी येता कविता घेऊन |

"वा! छान!" सा प्रतिसाद देऊन | वेळ टाळता येतसे || ५ ||


मीच तो शहाणा म्हणून । अकांडतांडव करून ।

असंबद्धसे लिहून । प्रौढी मिरवता येतसे ॥ ६ ॥


सर्वांस उपाय येत दिसून | परि एका गोष्टीस आहे न्यून |

कोणी बुद्धिमान समोरून — | येता, काय करावे? || ७ ||





प्रेरणा - गोविंदाग्रजांची "काय करावे?" ही सुंदर कविता.