मी हरलो, मी जिंकलो! (पूर्वार्ध)

मी हरलो, मी जिंकलो! (पूर्वार्ध)


(Frederick Forsyth यांच्या  Sharp Practice  ह्या कथेचा स्वैर अनुवाद करण्याचा प्रयत्न.)


ट्रॅलीला जाणारी गाडी किंग्जब्रिज स्थानकात उभी होती. जज्ज कमिन पहिल्या वर्गाच्या डब्यात खिडकीजवळच्या सीटवर बसले होते. दर तीन महिन्यांनी केरी परगण्याच्या ट्रॅलीतील कोर्टात जाऊन खटल्यांचे निकाल लावणे हा त्यांच्या कामाचा भाग होता.  गाडी सुटायला आता थोडाच अवकाश होता.  तेवढ्यात एक माणूस डब्यात आला. आपली बॅग त्याने वरच्या रॅकमध्ये ठेवली आणि जज्जसाहेबांच्या समोरच्या सीटवर खिडकीशी बसला. गार्डाने शिट्टी दिली, गाडीचे दरवाजे बंद झाले. तेव्हढ्यात ते पुन्हा उघडल्याचा आवाज झाला आणि एक काळे कपडे घातलेली व्यक्ती धापा टाकत आत आली आणि एका सीटवर धप्पकन बसली. खिडकीतला माणूस म्हणाला, "फादर, आपल्याला गाडी अगदी जेमतेम मिळाली. जरा धाडसाचंच होतं हे!" पाद्रीबाबा म्हणाले, "हो ना. देवाची कृपा!"


गाडी सुटली. जज्जसाहेबांनी आपले कागदपत्र काढून वाचायला सुरुवात केली. पाद्रीबाबांनी पण न्यूमनची प्रसिद्ध प्रवचनं वाचायला घेतली. तो खिडकीशी बसलेला माणूस म्हणाला, "माफ करा हं, " जज्जसाहेब मनात म्हणाले "बापरे! त्याला माझ्याशी बोलायचंय!" ते संपूर्ण इंग्रजी पठडीत वाढलेले असल्यामुळे अनोळखी माणसाशी संभाषण करणं त्यांना जरा जडच जायचं. तो माणूस विचारत होता, "मी ह्या टेबलाचा अर्धा भाग वापरला तर चालेल का?" जज्जसाहेबांनी "चालेल" असं त्रोटक उत्तर दिलं आणि पुन्हा कागदपत्रांमध्ये डोकं घातलं. थोड्या वेळात त्यांना कसला तरी "च्यक, च्यक" असा आवाज ऐकू आला. कागदपत्रांतून डोके वर काढून त्यांनी पाहिले. समोरच्या माणसाने टेबलावर पत्ते मांडले होते आणि तो अगदी एकाग्रतेने पेशन्स खेळत होता. अशी एकाग्रता झाली की काही लोकांची जीभ बाहेर येते. तशीच त्याची आली होती आणि त्यातूनच तो आवाज येत होता.  जज्जसाहेबांनी पुन्हा डोकं कागदपत्रांमध्ये घातलं. पण त्यापूर्वी त्यांनी पाहिलं की काही पानं लागण्यासारखी होती तरी त्या माणसाने ती लावली नव्हती. "जाऊ दे. मला काय करायचंय" असं ते मनाशी म्हणाले खरं पण त्यांचं लक्ष कागदपत्रांमध्ये लागेना. शेवटी त्यांनी कागद बाजूला ठेवले व ते डावाकडे बघायला लागले. उभ्या चार ओळींपैकी एक रिकामी होती, एक राजाही उघडलेला होता. पण तो राजा तिथे लावायचे काही त्या माणसाला कळत नव्हते. तो पुढची तीन पाने टाकायला निघाला होता. आता जज्जसाहेबांना रहावेना. ते जरा  खाकरले. त्याबरोबर समोरच्या माणसाने वर पाहिले. जज्ज त्याला म्हणाले,"तो राजा लावा ना रिकाम्या जागी; आणि मग ती काळी नव्वी लाल दश्शीवर लागेल. "खरंच की!" असं म्हणून त्याने ती पाने लावली. मग आणखीही काही पाने लागली. जज्जसाहेबांनी आणखीही काही सूचना दिल्या आणि म्हणाले, "माझी खात्री आहे की हा डाव नक्की निघेल!" तो माणूस म्हणाला."छे छे, आजपर्यंत माझा डाव कधीच निघाला नाही." पण तो डाव निघाला खरा. जज्ज म्हणाले,"मी म्हणत होतो की नाही?" "हो, पण तो निघाला तो आपल्या मदतीनेच! आपल्याला पत्त्यात फारच गती आहे."


त्यानंतर त्या माणसाने पत्ते गोळा केले आणि परत खिशात ठेवले आणि कंटाळलेल्या चेहऱ्याने खिडकीबाहेर बघत बसला कारण प्रवास लांबचा  आणि कंटाळवाणा होता. त्यानंतर पोकर खेळण्याची कल्पना कुणी काढली कुणास ठाऊक, पण ते दोघे पोकर खेळू लागले खरे. आधी नुसतं गमतीगमतीतच खेळणं चाललं होतं. तो खिडकीतला माणूस म्हणाला, "सर, तुमची स्मरणशक्ती उत्तम आहे. पण माझा घोटाळा होतंय कोण किती जिंकलं. म्हणजे आपण काही पैसे लावत नाही आहोत पण तरी हे कळलं तर बरं नाही का?" त्यावर जज्जसाहेबांनी आपल्या ब्रीफकेसमधून एक काडेपेटी काढली. (त्यांना रोज नाश्त्यानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर सिगार ओढायची सवय होती. आणि उंची सिगारासाठी पेट्रोलचा  लायटर वापरणे त्यांना अजिबात पसंत नव्हते. त्यामुळे त्यांच्याजवळ नेहेमी काडेपेटी असे.) तर त्यांनी काडेपेटीतल्या काड्या काढल्या. पैशाच्या ऐवजी त्या काड्या वापरून कोण किती जिंकलं वगैरे लक्षात ठेवायला सोपं गेलं असतं. थोडा वेळ ते दोघे खेळले. आता दोघांचाही संकोच कमी झाला होता. त्यांनी एकमेकांना नावं विचारली. त्या माणसाचं नाव ओकॉनर होतं. जज्जसाहेबांनीही आपलं नाव सांगितलं. हुद्दा वगैरे सांगावं असं त्यांना वाटलं नाही. थोडा वेळ खेळ छान चालला होता. पण पोकर दोघात खेळण्यात तेवढी मजा नाही. मग ओकॉनर पाद्रीबाबांना म्हणाला, "तुम्ही येता का खेळायला?" पाद्रीबाबा म्हणाले,"मी कधीतरी खूप पूर्वी पत्ते खेळलेलो आहे. शिवाय तुम्ही खेळताय तो खेळ मला माहीत नाही." जज्जसाहेब म्हणाले,"मी ते सांगतो." असं म्हणून त्यांनी एका कागदावर रॉयल फ्लश, फोर ऑफ द काईंड, स्ट्रेट फ्लश, फुल हाऊस,.... वगैरे सर्व व्यवस्थित लिहून, पाद्रीबाबांना समजावून सांगितलं.  पाद्रीबाबा म्हणाले, "म्हणजे ह्यात हात वगैरे करायचे नसतात का?"  "नाही." असे म्हणून जज्जसाहेबांनी पॉइंट्स् कसे मोजायचे ते सांगितलं. पाद्रीबाबा खेळायला तयार झाले. फक्त ते म्हणाले,"माझ्या हे सगळं एकदम लक्षात रहाणार नाही. मी हा कागद मधून मधून पाहिला तर चालेल का?" जज्ज म्हणाले,"अगदी खुशाल. तुमच्याजवळच ठेवा ना तो कागद."


आता तिघे खेळू लागले. खेळ थोडा वेळ चालला होता. पण जज्जसाहेबांच्या लक्षात आलं की ओकॉनरचं लक्ष खेळात फारसं नाहीये. ते म्हणाले, "तुम्हाला फारशी मजा येत नाही असं दिसतंय!" जज्जांना मात्र मजा येत होती आणि त्यांना अजून खेळावंसं वाटत होतं. ओकॉनर म्हणाला, "नाही न! आपण पैसे लावून खेळू या का? मग जरा मजा येईल."  जज्जसाहेब म्हणाले, "माझी हरकत नाही. पण तुम्हीच बघा! तुम्ही आधी बऱ्याच काड्या गमावून बसला आहात." ओकॉनर म्हणाला "न जाणो! माझं नशीब बदलेल सुद्धा." पण पाद्रीबाबा म्हणाले,"मग मी खेळातून बाद. माझ्याकडे फारसे पैसे नाहीत. माझ्यासारख्या माणसाच्या खिशात पैसे खुळखुळत नसतात. जे आहेत ते सुद्धा मला माझ्या आईसाठी हवे आहेत. मी तिलाच भेटायला चाललोय." जज्जसाहेबांनी त्यावर तोड काढली. ते ओकॉनरला म्हणाले,"आपण असं करू. आपण फादरना पैसे उसने देऊ. ते हरले तर आपण त्यांच्याकडून काही घ्यायचं नाही. ते जिंकले तर मात्र आपण त्यांना पैसे द्यायचे." ओकॉनरलाही हे पटलं पण पाद्रीबाबा म्हणाले, "पण मी पैसे लावून खेळूच शकत नाही कारण तो जुगार आहे! जुगार खेळणं पाप आहे." हे ऐकून दोघेही खट्टू झाले. पण ओकॉनरच्या डोक्यातून एक कल्पना निघाली.  तो म्हणाला,"तुम्हाला मिळालेले पैसे तुम्ही जर कुणा गरजूंना मदत म्हणून दिले तर ते देवालाही चालेल नाही का? तसंच करा न!" पाद्रीबाबांनी थोडा विचार केला आणि म्हणाले,"डिंगल  येथे एक अनाथाश्रम आहे. तिथली मुलं बिचारी थंडीत कुडकुडत असतात. त्यांना मदत करता येईल." जज्ज म्हणाले "वा, वा! छानच कल्पना! ओकॉनर, ती आपण दोघांनी अनाथाश्रमाला दिलेली देणगी समजूया."


तिघे खेळू लागले. कधी हा, कधी तो असे जिंकत होते. तिघांनाही खेळात मजा येत होती. आता शेवटचं स्टेशन जवळ आलं. त्यांनी ठरवलं हा आता शेवटचा डाव. पाने वाटून बोली वगैरे लावून झाली. ह्या डावात ओकॉनरला चांगली पाने आली होती,  जज्जसाहेबांना तर फारच छान पानं आली होती. ते खुशीत येऊन म्हणाले, "हे बघा! चार देवियाँ!" आणि त्यांनी आपली पाने खाली टाकली. ओकॉनरचा चेहऱ्यावर निराशा पसरली. पाद्रीबाबा जरा बिचकतच म्हणाले, "राजे राण्यांच्या वर असतात न?" जज्जसाहेब म्हणाले, "हो, पण जर तुमच्याकडे चारही असतील तर!" पाद्रीबाबा म्हणाले, "आहेत न!" आणि त्यांनी आपली पाने दाखवली.


आता चेहऱ्यावर निराशा पसरण्याची पाळी जज्जसाहेबांची होती! असो. खेळ संपला. सर्व हिशेब केल्यावर जज्ज पाद्रीबाबांना पन्नास पौंड देणं लागत होते, तर ओकॉनर १२ पौंड. पाद्रीबाबांचा तर आपल्याला एवढे पैसे मिळणार ह्यावर विश्वासच बसत नव्हता. ओकॉनरने आपल्या पाकीटातून एकेक पौंडाच्या १२ नोटा काढल्या आणि पाद्रीबाबांना दिल्या. तो म्हणाला,"फादर, मला वाटतं आकाशातला बापच तुमच्यासाठी पानं वाटत होता." जज्जसाहेबांनी आपलं चेकबुक बाहेर काढलं आणि पाद्रीबाबांना म्हणाले,"त्या अनाथाश्रमाचं नाव काय म्हणालात तुम्ही? म्हणजे चेक कोणत्या नावाने देऊ?" त्यावर पाद्रीबाबा म्हणाले,"अहो, तो  अगदीच लहानसा आश्रम आहे. मला नाही वाटत त्यांचं कुठल्या बँकेत खातं असेल." जज्जसाहेब म्हणाले,"मग मी तुमच्याच नावाने चेक देतो." त्यावर पाद्रीबाबा जरा ओशाळे होऊन म्हणाले,"माझे पैशाचे व्यवहार अगदी मर्यादित आहेत. माझंही बँकेत खातं नाहीये." "यावरही उपाय आहे" असे म्हणत जज्जांनी बेअरर चेक पाद्रीबाबांना दिला आणि म्हणाले,"हा बँकेत द्या, ट्रॅलीतील बँक बंद व्हायला अजून अर्धा तास अवकाश आहे. तुम्ही उतरल्यावर सरळ बँकेतच जा. तुम्हाला लगेच पैसे मिळतील." पाद्रीबाबांना आपलं आश्चर्य लपवता आलं नाही. ते म्हणाले, "म्हणजे हा कागद दाखवला की बँक मला पैसे देईल?" जज्जसाहेब हसून म्हणाले, "हो, पण हा चेक नीट ठेवा. तो ज्याला कुणाला मिळेल तो बँकेतून ह्याचे पैसे घेऊ शकेल."


गाडी आता ट्रॅली स्थानकावर आली. तिघेही खाली उतरले. जज्ज म्हणाले, "बरंय फादर, ओकॉनर, माझा प्रवास छान झाला. थोडा महागात पडला खरा! पण वेळ चांगला गेला." ओकॉनर दु:खी चेहऱ्याने म्हणाला, "मला आज चांगला धडा मिळाला. आता पुन्हा आपण कधी गाडीत पत्ते खेळणार नाही! धर्मगुरु वगैरे मंडळींशी तर कधीच नाही." फादर म्हणाले,"त्या अनाथाश्रमात आजच पैसे पोहोचतील याची मी व्यवस्था करतो."


तिघेही एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या वाटेने निघून गेले. जज्जसाहेब त्यांच्या नेहमीच्या हॉटेलात गेले. दुसऱ्या दिवशी कोर्टात लवकर जायचे होते म्हणून रात्री ते लवकरच झोपून गेले.


दुसऱ्या दिवशी जज्जसाहेब कोर्टात गेले. कोर्टाचे कामकाज ठरलेल्या वेळेला सुरु झाले. पहिले एकदोन खटले मामुली होते. त्यांचे निकाल पटापट लावले गेले. तिसरा खटला पुढे आला. आरोपीच्या नावाचा पुकारा झाला आणि त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात आणण्यात आलं. खटला सुरु होण्यापूर्वीच्या सर्व तांत्रिक बाबी आटपल्या आणि जज्जसाहेबांनी कागदपत्रातून डोकं वर काढलं.


आरोपीच्या पिंजऱ्यात ओकॉनर उभा होता! दोघांच्याही चेहऱ्यावर विस्मय उमटला.      


क्रमशः


(जज्ज हा judge  ह्या शब्दाचा उच्चार नाही, ते judge ह्या शब्दाचे मराठी भाषांतर आहे. जसे stove ह्या शब्दाचे मराठी भाषांतर 'ष्टो' असे होते (इति पुल).)