मी हरलो, मी जिंकलो! (उत्तरार्ध)

ओकॉनरवरील आरोप वाचून दाखवण्यास सुरुवात झाली. वाचणारा कारकून म्हणत होता, "मि.रोनान क्वर्क ओकॉनर, तुमच्यावर १८४५च्या कायद्याच्या १७व्या कलमान्वये पत्ते खेळताना फसवाफसवी केल्याचा आरोप आहे. दि.१३ मेला तुम्ही केरी परगण्यात एका लूगन कीन नावाच्या इसमाशी पत्ते खेळताना फसवून अगर लबाडी करून अगर एखाद्या बेकायदेशीर मार्गाचा अबलंब करून त्याला एका मोठ्या रकमेला लुबाडले आहे. तुम्हाला आरोप मान्य आहे किंवा नाही?" ओकॉनर म्हणाला "नाही." ओकॉनरला विचारण्यात आले की त्याचा वकील कोण आहे. त्यावर त्याने सांगितले की तो स्वतःच आपला बचाव करणार आहे.


त्यानंतर फिर्यादीचे वकील पुढे आले. त्यांनी सांगितले, "दिनांक १३ मेला आरोपी डब्लिनहून ट्रॅलीला जाण्याऱ्या गाडीने प्रवास करत होते. त्याचवेळी मि.लगून कीन हेही त्याच गाडीत चढले. लगून कीन हे ट्रॅलीतील किराणा-भुसार मालाचे व्यापारी. त्यादिवशीच्या व्यवहारात त्यांनी चांगली कमाई केली होती. ७० पौंडाहूनही जास्त रक्कम ते जवळ बाळगून होते. प्रवास लांबचा होता. वेळ घालवण्यासाठी आरोपी, मि.कीन आणि आणखी एक प्रवासी असे तिघे गाडीत पोकर खेळू लागले. पत्याचा कॅट आरोपीचाच होता.  फेअरानफ्युअ  येईपर्यंत मि.कीन बरेच पैसे गमावून बसले होते. त्यामुळे त्यांना ह्या प्रकारात काहीतरी काळंबेरं असावं अशी शंका आली. ते फेअरानफ्युअला  उतरले आणि तेथील रेल्वे अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी ट्रॅलीच्या पोलिसस्टेशनला फोन करून ट्रॅली स्थानकावर ही गाडी पोहोचण्याच्या वेळी एका पोलिस अधिकाऱ्यास तेथे हजर राहण्यास सांगावे अशी विनंती केली.

वकिलांचा पहिला साक्षीदार होता तो पोलिस अधिकारी. त्याला विचारल्यावर त्याने सांगितले,"मला मिळालेल्या आदेशांनुसार मी डब्लिन-ट्रॅली गाडी स्थानकात येत असताना प्लॅटफॉर्मवर हजर राहिलो. एक गृहस्थ मला येऊन भेटले. ते म्हणजेच फिर्यादी मि.कीन. त्यांनी आरोपीकडे निर्देश केला व मी आरोपीस पोलिस स्टेशनवर चलण्यास सांगितले. आरोपी व मि.कीन यांना घेऊन मी पोलिस स्टेशनवर गेलो. तिथे आरोपीची झडती घेण्यात आली. त्याच्या खिशात पत्त्यांचा एक जुनापुराणा कॅट सापडला. मि.कीन यांनी सांगितले की गाडीत ते ह्याच पत्त्यांनी खेळत होते. मग ते पत्ते तपासणीसाठी आमच्या संबंधित विभागाकडे पाठवले. त्यांच्या रिपोर्टाच्या आधारावर मि.ओकॉनर यांच्यावर खटला भरण्यात आला."     


ओकॉनरला विचारले, "तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का?" त्याने नकार दिला.


आता दुसरा साक्षीदार आला. हा म्हणजे पोलिसखात्याच्या डब्लिनच्या कार्यालयातला  डिटेक्टिव होता. तो म्हणाला, "आमच्या तपासणीत आम्हाला असे आढळले की पत्त्यांवर पाने ओळखता येतील अशा खुणा आहेत."


"कशा प्रकारे या खुणा केल्या आहेत?"


"दोन पद्धतींनी.  एक ट्रिमिंग व दुसरी शेडिंग. ट्रिमिंग मध्ये पत्त्यावरची नक्षी व पत्त्याची कड यामध्ये मोकळ्या जागेची जी एक अरुंद पट्टी असते तिची रुंदी कमी-जास्त ठेवलेली असते. त्यावरून पान कोणत्या रंगाचे आहे -म्हणजे किलवर, इस्पिक, बदाम, चौकट ह्यापैकी- हे कळते. हा रुंदीतील फरक अगदी सूक्ष्म असला तरी कार्डशार्प माणसाला तो दिसू शकतो. कारण तो ते शोधतच असतो!


"शेडिंग मध्ये पत्त्यावरील नक्षीत एखादाच ठिपका इतर नक्षीच्या मानाने जास्त गडद किंवा जास्त फिक्का असतो. ह्या ठिपक्याच्या जागेवरून ते पान एक्का, राजा, राणी,.. इ.पैकी कोणते आहे हे ओळखता येते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे ठिपके अगदी लहानसे असले तरी कार्डशार्प माणसाला ते सहज दिसतात.


"ह्या दोन्ही प्रकारच्या खुणा अशा केलेल्या असतात की पत्ते कसेही धरले तरी त्या दिसतील."


फिर्यादीच्या वकिलांनी विचारले, "अशा पत्त्यांनी खेळताना कार्डशार्प माणूस हरण्याची किती शक्यता आहे?"


डिटेक्टिव म्हणाला, "शून्य. कारण त्याला इतर भिडूंची पाने कळतच असतात. तेव्हा त्यानुसारच तो बोली लावतो."


ओकॉनरला विचारले, "तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का?" यावेळीही त्याने नकार दिला.


आता तिसरा साक्षीदार पिंजऱ्यात आला. हा साक्षीदार म्हणजे खुद्द लगून कीनच होता. तो साक्षीदाराच्या पिंजऱ्यात गेला आणि त्याने रागाने ओकॉनरकडे पाहिले. वकिलाने विचारल्यावर त्याने आपली बाजू सांगितली. तो १३ मेला डब्लिनहून ट्रॅलीला चालला होता. त्या दिवशीच्या व्यवहारात  त्याला बरेच पैसे मिळाले होते. शिवाय त्याला पोकर खेळण्याची आवड होती आणि त्यात गतीही होती. त्यामुळे आरोपीशी पोकर खेळायला तो लगेच तयार झाला. पण फेअरानफ्युअच्या आधी तो ६२ पौंड गमावून बसला होता. त्याला चांगली पाने येऊनही तो सारखा हरतच होता. त्यामुळे त्याला शंका आली. तो फेअरानफ्युअ स्थानकावर उतरला व पोलीस अधिकाऱ्यास ट्रॅली स्थानकावर हजर रहाण्याची विनंती केली.


आता त्याचा आवाज चढला. तो गुरकावून म्हणाला, "आणि माझा तर्क बरोबर होता. हा माणूस खुणा असलेल्या पत्त्यांनी खेळत होता. त्यानं मला फसवलं आहे."  


ह्यावेळी मात्र ओकॉनरने आपल्याला फिर्यादीस काही प्रश्न विचारायचे आहेत असे सांगितले. पण हे सांगतानासुद्धा तो अगदी बापुडवाणा दिसत होता.
तो म्हणाला,"तुम्ही म्हणता, मी पत्ते काढले."
"हो. काढलेतच!"
"कशा प्रकारे?"
"कशा प्रकारे म्हणजे? तुम्ही तुमच्या खिशातून बाहेर काढलेत."
"तसं नाही. मी त्या पत्त्यांचं काय केलं?"
"तुम्ही त्यांनी पेशन्स खेळायला लागलात."
"संभाषण तुम्ही सुरू केलंत का मी?"
कीनचा चेहरा जरा पडला. आपली बाजू लंगडी होतेय हे लक्षात आलं की माणसाचा स्वर जसा थोडा चिडका होतो तशा स्वरात तो  म्हणाला,"मीच सुरू केलं, पण तुम्ही इतकं वाईट खेळत होतात." ज्यूरीकडे पाहून तो म्हणाला,"कितीतरी पानं लागण्यासारखी होती पण ह्यांनी ती लावली नव्हती. मला ते बघवत नव्हतं. म्हणून मी त्यांना ती लावायला सांगितली."


जज्जसाहेबांचा आता "विलक्षण योगायोग" ह्या संकल्पनेवर विश्वास बसायला लागला होता!             


"ते ठीक आहे, पण पोकर खेळण्याची कल्पना कुणाची?" ओकॉनरने विचारले.
"तुमचीच!" कीनने जरा घुश्शातच उत्तर दिले.
"बोली लावून खेळावे हे कोणी सुचवले?"
"तुम्हीच."
"नाही. तुम्ही नीट आठवून पहा. तुम्हीच म्हणालात की आपण पैसे लावून खेळूया, म्हणजे जास्त मजा येईल. आधी आपण काडेपेटीतल्या काड्यांनी खेळत होतो."


कीन आठवण्याचा प्रयत्न करत होता. तो प्रामाणिक माणूस दिसत होता. खोटं बोलणं त्याला जमण्यासारखं नव्हतं. जरा चरफडतच तो म्हणाला,"हो, मीच तसं म्हटलं होतं." मग ज्यूरीकडे पाहून तो म्हणाला, "पण हीच कार्डशार्प माणसाची युक्ती असते. तो कौशल्याने दुसऱ्या माणसाला खेळायला प्रवृत्त करतो आणि पुढचं तर सगळं त्याच्याच हातात असतं!"


ओकॉनर म्हणाला, "खेळ संपला तेव्हा तुम्ही मला किती पैसे दिलेत?"
"बासष्ठ पौंड. मी घाम गाळून मिळवलेले बासष्ठ पौंड!"
"मी असं विचारतोय की मला तुम्ही किती पैसे दिलेत?" 'मला' शब्दावर जोर देत ओकॉनर म्हणाला.
"काहीच नाही. मी त्या शेतकऱ्याला ६२ पौंड दिले."
"शेतकऱ्याने मला किती दिले?"
"काहीच नाही. तुम्हीच त्याला काहीतरी साताठ पौंड दिलेत."
ओकॉनर म्हणाला, "माझे प्रश्न संपले."
कीनचा चेहरा आता चांगलाच पडला होता!


कीन खाली उतरू लागला. तेवढ्यात जज्जसाहेब म्हणाले, "मि.कीन, जरा थांबा. हा शेतकरी कोण?"
कीन म्हणाला, "आमचा सहप्रवासी, आमच्या खेळातला तिसरा भिडू, वेक्सफर्ड गावातला एक शेतकरी."
जज्ज म्हणाले, "तुम्ही त्याला नाव विचारलंत?"
"नाही. मी त्याचं नाव कशाला विचारू? पत्ते तर ह्या गृहस्थांचे होते आणि तेच मला फसवत होते."


त्यानंतर ओकॉनर आपली बाजू सांगायला लागला. त्याचा व्यवसाय म्हणजे घोडे विकत घ्यायचे आणि विकायचे. ह्या व्यवसायासाठी त्याला प्रवासही करायला लागत असे. १३ मेच्या साधारण आठवडाभर आधी तो अशाच कामासाठी डब्लिनला गेला होता. काम संपवून तो एका बारमध्ये गेला. तिथे त्याला हा पत्त्यांचा कॅट सापडला. एकदा त्याला वाटलं की हा बारमालकाकडे द्यावा. पण तो इतका जुना होता की त्याला वाटलं आपण तो ठेवायला हरकत नाही. आपल्याला लांबच्या प्रवासात वेळ घालवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्याच्यावर खुणा आहेत हे त्याला  माहीत नव्हते. ह्या खुणा आणि ते ट्रिमिंग, शेडिंग का काय ते तो पहिल्यांदाच ऐकत होता.


खटला संपला. ओकॉनर निर्दोष आहे असा निकाल दिला गेला. जज्जसाहेब मनात म्हणाले, "ओकॉनर, तू खरं बोलत असलास तर तू अगदीच कमनशिबी आहेस बेट्या! स्वतःजवळच खुणा असलेले पत्ते असूनही तुला ते माहीत नाही. पण जर तू खोटं बोलत असलास तर मात्र तू पत्ते फारच गलथानपणे खेळतोस असं म्हटलं पाहिजे. आपल्याच खुणा असलेल्या पत्त्यांनी खेळताना तू एकदा नव्हे तर दोनदा हरलास!"


आता जेवणाची सुट्टी झाली होती. जज्जसाहेब कोर्टाच्या इमारतीबाहेर पडून जेवायला निघाले होते. तेवढ्यात पाठीमागून आवाज आला."साहेब" त्यांनी वळून पाहिलं. फिर्यादी लगून कीन त्यांना म्हणत होता, "समोर त्या आलीशान गाडीत कोण आहे ते पाहिलंत का?" जज्जांनी तिकडे पाहिलं. ती आलीशान गाडी ओकॉनर चालवत होता आणि शेजारच्या सीटवर पाद्रीबाबा बसले होते. पाद्रीबाबांनी ह्या दोघांच्याकडे पाहून हाताची दोन बोटं वर केली आणि प्रसन्न हास्य केलं. कीन म्हणाला "याचा अर्थ काय?" जज्ज म्हणाले, "आपल्याला आशीर्वाद देत होता की काय कुणास ठाऊक?" कीन म्हणाला, "पण मला हे कळत नाही, त्याने तो पाद्र्याचा झगा का घातलाय?" जज्ज म्हणाले "कारण तो पाद्री आहे!" कीन उसळून म्हणाला, "छे! छे! तो पाद्री नाही, तो वेक्सफर्डचा शेतकरी आहे. मी ज्याच्याबद्दल कोर्टात सांगितलं तो आमच्या खेळातला तिसरा भिडू!"


समाप्त