घर पत्त्यांचे

पूर प्रीतीचे कशाने ओसराया लागले
आटले अमृतझरे की पाट कोणी काढले

तू न राजा, मी न राणी, घर न हे पत्त्यांतले
मांडले जे सहज आणिक फुंकरीने मोडले

सांगते माझ्या घराशी कोणते नाते व्यथा
दो दिसांची पाहुणी की मापही ओलांडले

शाश्वतींचा होत पारा निसटला हातातुनी
राहिले सामुद्रिकांच्या भाकितांचे दाखले

दोन लाटांतील अंतर, मृण्मयी, संसार हा
याहुनी टिकली कधी का वाळुवरची पावले