मृत्युंजय

आज २४ ऑगस्ट, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची जयंती.

raj



 त्यांना घरी बापू अथवा बापूसाहेब असे म्हणत. ते लहानपणापासूनच अतिशय जिद्दी आणि निश्चयाखातर इरेला पेटणारे होते. कुणी म्हणायचा अवकाश की, 'बापू काकडी जपून खा, कडू आहे'. बापून काकडी कचाकच खाऊनं टाकेल. एकदा माजघरात खेळायला बसले असता त्यांना कुणीतरी सांगितले की जपून उठा, वर कोनाड्यात चिमणी आहे. बापूसाहेबांनी तडक चिमणी हातात धरली आणि हाताच्या पंज्यात दाबून तिची काच फोडून टाकली. पुढे हिं.स.प्र.से च्या पर्वात त्यांच्या सहकाऱ्यांना अगदी असाच अनुभव आला. एकदा ही भूमीगत मंडळी आग्रा येथे मुक्काम असताना स्वयंपाक बापूसाहेब करत होते. त्यांचा स्वयंपाक तो काय! कसलेतरी डाळीचे गरगट वा एकत्र शिजवलेल्या भाज्या आणि जाड्या भरड्या रोट्या. अचानक स्वयंपाक घरातून जळका वास आला. बघतात तर राजगुरू तापलेली लाल सळई घेऊन स्वत:च्या छातीवर डागत होते. थक्क झालेल्या सहकाऱ्यांना ते अगदी सहजपणे म्हणाल की, 'आज ना उद्या आपण पकडले जाणारच. मग पोलीस अतोनात छळ करतील ना? तो किती सहन करता येईल ते पाहत होतो.'

हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताक सेनेत महाराष्ट्राचा ध्वज दिमाखाने फडकावणाऱ्यांपैकी श्रीराम सावरगावकर, सदाशिवराव मलकापूरकर, करंदीकर आणि राजगुरू. त्यांचा हिं.स.प्र.से.मध्ये प्रवेश झाला तो त्यांच्या देशासाठी काहीतरी करून दाखवायच्या दुर्दम्य इच्छेमुळे. क्षुल्लक अपमानामुळे राजगुरू लहान वयातच घर सोडून गेले ते काशीला जाऊन हिंदी व संस्कृत च्या अध्ययनात गढले. मात्र त्यात ते फार रमणार नव्हते. सावरगावकर प्रभृतींनी पुढे काशीमध्ये 'गीर्वाण वागवर्धिनी सभा' स्थापन केली. या संस्थेच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमात सर्वजण संस्कृत मध्ये भाषण करीत. एकदा या सभेच्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या एका विज्ञानशाखेच्या विद्यार्थ्याने संस्कृत विषयी काही अनुद्गार काढले. राजगुरूंनी सरळ त्याच्या श्रीमुखात भडकवली. काशीत रावसाहेब कुदळ्यांच्या तालमीत लाठी काठी शिकण्यात बापुसाहेब अध्ययनापेक्षा अधिक रमले. पुढे त्यांची भेट रंगनाथ जोशी यांच्याशी झाली जे धनुर्विद्येवर लेखन करीत होते. सावरगावकरांना धनुर्विद्या अवगत होती, त्यांनी राजगुरूंना शिकवायला सुरुवात केली. लवकरच ते गुरुच्या वरताण झाले व ५० फुटांवरचं खडा वा चाव्यांचा जुडगा बाणाने उडवू लागले. हनुमान व्यायाम प्रसारक मंडाळातून मल्लविद्येचे शिक्षण घेऊन त्यांनी 'व्यायाम विशारद' ही पदवी प्राप्त करून घेतली होती. (सॊंडर्स वधाच्या वेळी जेव्हा पळणाऱ्या राजगुरूंना पकडायला फर्न धावला व त्याने राजगुरूंना आवळले तेंव्हा याच मल्लविद्येचा वापर करीत राजगुरूंनी पायातला पेच घालून त्याला जमीनीवर आदळला होता). याच संस्थेच्या एका उन्हाळी शिबिराला आलेल्या हिवरखेडच्या लच्छुलाल या राजस्थानी युवकाकडे बंदूक होती. तिचा मनसोक्त वापर करून राजगुरू नेमबाजीत प्रवीण झाले (राजगुरूंनी आपल्या पिस्तुलाची पहिलीच गोळी सॊंडर्स च्या डोक्यात घालून त्याला जागीच लोळवला होता).

एक दिवस राजगुरूचे भाग्य उजाडले. १९२६ च्या उन्हाळ्यात प्रकृतीवर इलाज करून घेण्यासाठी बाबाराव सावरकर काशीस आले. सर्व युवकांना ती एक पर्वणीच होती.त्यांची व्यवस्था पं. मदन मोहन मालवीय यांनी केली होती. बाबारावाना वैद्य त्र्यंबकशास्त्री या प्रख्यात भीषग्वर्याचे औषध चालू होते. त्यांना औषध आणणे, वाचून दाखवणे यासाठी एक विद्यार्थी हवा असल्याचे त्यांनी सावरगावकरांना सांगताच त्यांनी ते काम स्वतः:च अत्यानंदाने स्वीकारले.बाबारावांना भेटायला अनेक मातब्बर येत असत. असेच एकदा गोरखपूरच्या स्वराज्य या पत्राचे संपादक श्री. मुनिश्वरप्रसाद अवस्थी हे आले असता त्यांच्याशी सावरगावकरांचा परिचय झाला. सावरगावकरांची क्रांतिकारक संघटनेत काम करण्याची तळमळ पाहून त्यांनी सावरगावकरांची गाठ आझादांशी घालून दिली. मग त्यांच्या मार्फत राजगुरूंचा शिरकाव हि .स. प्र. से. मध्ये झाला. पुढे मुनिश्वर प्रसादांनीच काकोरी अभियुक्तांना सजा देण्यास कारणीभूत असलेल्या पोलीस निरीक्षक तसद्दाक हुसेनच्या वधासाठी राजगुरू यांचे नाव शिव वर्मा यांना सुचवले. बाबारावही राजगुरूंच्या धाडसी स्वभावाने बाबारावांवरही चांगली छाप पाडली होती. त्याकाळी हिंदूंना बाटविण्याच्या मोहिमेत प्रसिद्धीस आलेल्या हसन निजामी याला कंठस्नान घालायची कामगिरी बाबारावांनी राजगुरूवर सोपवली व त्यांनी ती पारही पाडली मात्र दुर्दैवाने हसन निजामीचा सासरा त्यात मेला व तो स्वत: वाचला. त्याला आपल्याच जातीतल्या काही विरोधकांचा संशय आला व त्यामुळे पोलीस तपास भरकटला व राजगुरू नामानिराळे राहिले. हाच अनुभव कदाचित त्यांना उपयोगी पडला असावा. कारण आझादांनी त्यांना सॊंडर्स वधासाठी भगतसिंहाबरोबर निवडले.

हिं.स.प्र.से. मध्ये भगतसिंग यांना रणजित तर राजगुरूंना रघुनाथ वा एम या सांकेतिक नावाने ओळखले जात असे. सॊंडर्स वधानंतर राजगुरूंनी आझादांकडे भगतसिंगांची लटकी तक्रार केली होती की याने स्वत:ला उत्तम स्वयंचलित रिवॉल्वर घेतले व मला मात्र साधे पिस्तूल दिले! अर्थातच राजगुरूंनी नेम अचूक साधला. आपल्या पहिल्याच गोळीत तो नीच मरण पावला असता भगतसिंगांनी उगीच आणखी सहा गोळ्या वाया घालवल्या अशीही तक्रार त्यांनी केली. आपण काहीतरी दिव्य केलं हा आनंद त्यांना झाला होता. लाहोरला खटला सुरू असताना त्यांची बहीण गोदुताइ त्यांना पाहायला लाहोरला गेली होती. ती एक दिवस घरचे जेवण व त्यात श्रीखंड घेउन तुरुंगात गेली व नेमकी त्याच दिवशी भगतसिंग व सुखदेव यांच्यांबरोबर राजगुरूंनाही फाशी झाल्याची बातमी समजली. त्या बहिणीला अतिशय वाईट वाटले. मात्र बापूसाहेब निर्विकार होते उलट आपल्याला फाशी नाही झाली आणि मित्रांना तर झाली या विवंचनेत असलेले राजगुरू शिक्षा ऐकून खूश झाले होते. 'बापू तुला जन्मठेप झाली असती तर निदान तुला कधीतरी भेटता आले असते' असे त्या बहिणीने म्हणताच बापुसाहेब म्हणाले की, 'असे रोज मरण्यापेक्षा मला फासावर जायला अधिक आवडेल. शिवाय फाशी झाली तर पटकन मोकळा होईन व पुन्हा इथेच जन्माला येईन व पुन्हा लढेन'. दिनांक २३ मार्च १९३१ रोजी राजगुरूंना वयाच्या तेविसाव्या वर्षी हौतात्म्य प्राप्त झाले.

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना त्यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन


 


raj res


हुतात्मा राजगुरूंचा वडिलोपार्जित वाडा - त्यांचे जन्मस्थान. हा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.