'शाळेची सुट्टी' म्हणल्यावर कुणाचं मनं रम्य आठवणीत जात नाही? मी माझा मधली ही चारोळी अगदी परफ़ेक्ट आहे..
आठवणींच्या देशातं
मी मनाला कधी पाठवत नाही
जाताना ते खूष असतं
पण येताना त्याला येववत नाही..
मी देखील माझ्या मनाला शाळेच्या त्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आठवणीत पाठवायच टाळते.. जातानाचं ठीक आहे हो पण मन एकदा ठाण्याच्या टेंभी नाक्यावर रूळल की परत यायचं नाव घेत नाही.
सुट्टी लागायची तारीख आव्वांना कशी कळायची कुणास ठाऊक! लहान पणी वाटायच की आमच्या पावगी बाई पत्र पाठवायच्या त्यांना! अव्वा म्हणजे आमच्या मावशी आजीचे यजमान. रेल्वे मधून रिटायर होऊन बरीच वर्ष झाली होती.अव्वा नाव कस पडलं माहीत नाही.. बहुतेक ताई लहान पणी बोबड बोलायची तेव्हा हे नावं पडलं. मावशी आजी घरीचं असायची .. तिचं खरं नाव तर मला अजुन महीत नाही.. माझ्या आईची ती सख्खी मोठी मावशी. माझी आजी तिला 'बेबी' म्हणायची.. आई 'बेमावशी' .. आणि चाळीतली सर्वजण 'छोट्या' मामी.. मूलबाळ नव्हतं पण माझा दिलिप मामा ( आईचा लांबचा भाऊ) त्यांच्या कडेचं लहानाचा मोठा झाला.चाळीतल्या सगळ्याचं लहान मुलांना लळा होता त्यांचा. खूप लाड करायचे सगळ्या लहान मुलांचे.. त्यामुळे परिक्षा कधी संपते आणि कधी अव्वा येतात अस व्हायचं. त्यांनी कधी आम्हाला फ़ार वाट पाहायला लावल नाही. पांढरा झब्बा पायजमा.. डोक्यावर काळी टोपी ..हातात छत्री.. वयाने ६५ च्या आसपास असावेत..वयाच्या मानानी खूपच active होते. अव्वांच्या जीवनावश्यक गोष्टी दोनचं. चहा.. आणि पिवळा हत्ती सिगारेट.. अगदी नाईलाज झाला तर मग 'पनामा', पण इतर कोणते ब्रॅण्ड चालायचे नाहीत..अव्वांची दुसरी प्रिय गोष्ट म्हणजे त्यांची जुन्या स्टाइल ची 'काळी टोपी'.. त्यांना घरी रहायचा आग्रह करायचा असेल तर सरळ त्यांची टोपी लपवावी.. टोपी शिवाय ते जाणार नाही हे माहित असायच. आणि दर वेळेस टोपी लपवल्यावर नवीन घेणं त्या पेन्शनर खिशाला परवडणारं नव्हतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत मात्र आम्हाला ठाण्याला जायची घाई असायची त्यामुळे ही trick एरवी साठी होती.
पुण्याहून मुंबईला ट्रेन नी जाणे हे मी अजुनही तितकचं एन्जॉय करते..लोणवळ्याची चिक्की.. कर्जत चे वडे.. डोंगरची मैना.. थोडावेळ दारात ऊभं राहयचं.. सगळं इतक common पण तरी एकदम special !! गाडीत आम्ही काही हट्ट करायचो नाही.. आईनी तस सांगितलेला असायचं . पण ठाण्याला उतरल्यावर मात्र टांग्यातूनच जायचा हट्ट नेहमी असायचा.. एकदम छोटा प्रवास टांग्याचा. टेंभी नाक्यावर उतरायचं. तिकडून थोडा चालत गेल्यावर चाळीच्या वऱ्हांड्यात मावशी आजी वाट पहात असायची. गोल साडीतली साडेचार फ़ूट उंच आणि चेहऱ्यावर किचित हसू.. 'छोट्या मामी ' हे नाव मात्र तिला उंचीमुळे मिळालं नव्हतं. अव्वांच्या मोठ्या भावाला 'मोठे मामा' त्यांची बायको 'मोठ्या मामी' , अव्वा 'छोटे मामा' आणि मावशी आजी 'छोटया मामी' .. चाळीतल्या लोकांनी एकदम सुटसुटीत नावं ठेवली होती.
चाळीतला दिनक्रम एकदम ठरलेला.. एकदम Routine .. हे एकमेव Routine जे मला कधी बोरं झाल नाही. सकाळी उठायची घाई नाही.पण सकाळी वेळेत उठून गॅलरीत नाष्टा करत बसायचं. आजूबाजूला सगळे गडबडीत स्वत:च्या घाईत .. त्यांचं काय चाललय .. कोण काय करतय हे बघण्यात इतका टाइम पास व्हायचा.. मागच्या बाजूला खिडकीत बसल की खालची नळावरची war front मग थोडावेळ पुढच्या गॅलरीत .. तिकडे दाढी करायला पंक्त्ती बसायच्या.. आधी ऑफ़िस वाले .. नंतर सगळे पेन्शनर.. अव्वा मात्र त्यात नसायचे.. सकाळी लवकर उठून फ़ुलं आणायला जायचे.. म्हणजे morning walk व्हायचा.. फ़ूलं आणली की ती sort करायची...पुडे बनवायचे.. कोणाच्या देव्हाऱ्यात किती देव आहेत .. कोणाला किती फ़ुलं लागतात ते अव्वांना चोखं ठाऊकं .. पुडे तयार झाले कि वाटप करायचं काम माझ्याकडे...
मावशी आजी आत कायम कामात गुंतलेली..स्टोव्ह पाशी कायम काहीतरी चालू असायचं. दुपारी थोडी मोकळी होईल तोच मग केरवारे, कपड्यांच्या घड्या..दुपारचा चहा .. संध्याकाळची खाणे.. काम चालूच. त्या सुट्टीच्या २ महिन्यात कधीही तिने आम्हाला नावडता पदार्थ केल्याच मला आठवतं नाही.. आमच्या आवडीचं फ़िश.. चिकन करायचं.. आणि मग ब्राह्मणाच्या पोरी कशा फ़िश मटामटा खातात म्हणून मिश्कील हसायचं.. तिची एक मांजर होती.. तिचेही असेच लाड. रोज मासेवाली आली कि त्या मांजरी साठी स्पेशल वाटा.. मोठया मामींची आणि तिची चूल वेगळी होती. दिलिप मामा एकदिवसा आड जेवायचा दोघींकडे.. आम्ही मात्र कधी मोठया मामींकडे जेवलेल आवडायचं नाही तिला. मी मोठ्या मामींच्या कपाटातला हाजमोला खायचे लपून.. हे तिला कळल .. लगेच अव्वांना धाडल हाजमोला आणायला. आपल्या नातींना कोणी काही बोलू नये. आपल्या कडे आल्यावर त्यांना काही कमी पडून द्यायचा नाही यासाठी तिचा प्रयत्न.
असं दिवस भर नुसता खायचं खेळायचं .. मजा करायची.. मग मधे आधे कोणी लोक मामा आहेत का म्हणून विचारत यायचे..की उगाच अगाऊ पणा करत विचारायचे कोणते मामा? छोटे की मोठे ? समोरचा बुचकळयात पडला की "लग्न लावणारे का जागा दाखवणारे??" अव्वा लग्नाची 'स्थळं दाखवयचे' आणि मोठे मामा 'घरासाठी जागा'. क्वचित कोणी नको असलेला पहुणा आला तर 'निरोप' सांगून परतवून लावायचे..संध्याकाळ कधी व्हायची कळायचं नाही.. मग फ़िरायला जाणं.. रात्री चाळीत पत्त्यांचा अडडा.. कुल्फ़ी खायला तळ्यावर जायचं ..मामाला सुट्टी असली की मुंबई फ़िरायला जायचं. पाहता पाहता सुटटी संपायची.. आणि परत निघायचं.. पुण्याला पोचल्यावर आठवायचं की रोज शुध्द्लेखन करायला सांगितल होत बाईंनी .. मग उरलेल्या थोड्या दिवसात खरडून काढायचं.. शाळेच्या पहिल्या दिवशी सुट्टीत काय केलं म्हणून सांगताना कोणी दिल्ली पाहिली असायची .. कोणी केरळ तर कोणी राजस्थान.. आमचं मात्र ठरलेलं Destination व्यंकूबाईची चाळं आणि मग थोड फ़ुलवायचं असेल तर मामानी मुंबईतली दाखवलेली राणीचा बाग..चौपाटी वगैरे ठिकाण सांगयची.. पण कधी वाटलं नाही की पुढच्या सुट्टीत आपणही कुठेतरी दुसरी कडे जाऊ.. मन तृप्त असायचा अव्वा आणि मावशी आजीच्या लाडानी. आणि वाट पहायची पुढच्या सुट्टीच्या चाळीतल्या स्पेशल Routine ची!!