संस्कार !

नराचा नारायण करणारे आणि पशुचा परमेश्वर करणारे संस्कार ! कुणाचे काय मत असेल, तर कुणाचे काय.........असो ! ह. घ्या.


माकडांच्या वस्तीत एकदा


असं काही आक्रीत घडलं


एक माकड छाती बडवून


खूप म्हणजे खूपच रडलं



काय झालं ? काय झालं ? ?


प्रश्नांनी आणला वात


काय सांगू ,कसं सांगू ?


हाय माझा झाला घात !


प्रयोग म्हणून पिल्लावर


प्रत्येक नवा संस्कार केला


बघता बघता डोळ्यासमोर


माकडाचा ' माणूस' झाला !



उत्क्रांतीने घडायचं


ते संस्कारांनी साधलं


असं काय रडतोस


जणू भूतानं बाधलं ?


अरे भूतं परवडली


हा 'माणूस' नाही बरा


बोलील एक, करील दुसरं


जगावेगळी याची तऱ्हा



याच्या साध्या वागण्याचा


लागत नाही ताळमेळ


संस्काराच्या नादाने झाला


पिल्लाच्या आयुष्याचा खेळ


केस विंचरून बसतो सदा


उवांबाबत रहातो दक्ष 


अशाने मैत्रिणी मिळणार कशा


यातच आता आमचं लक्ष



रोज सकाळी पिल्लू


न चुकता  पडतं पाया


अर्ध जंगल नावावर करा


म्हणून सारखं मागतं सह्या


हात धुतो, श्लोक म्हणतो


खात नाही कधी ओढून


लपवून ठेवलेली फळे मात्र


एकटाच खातो झाडाआडून



व्यवहारीपणाच्या संस्कारातून


त्याला आलंय शहाणपण


माणसांचे संस्कार विसरवतात


आई-बापाचे म्हातारपण


बायकोनेच आता देवाला


कळवळून घातलंय साकडं


नको कसले संस्कार देवा


सुखी ठेव माझी दोन्ही माकडं


 


                                        -(सुसंस्कृत) अभिजित पापळकर