साहित्यमय सफर

   'केसरी' बरोबर आम्ही नैनितालला चाललो होतो. दिल्ली ते नैनिताल असा बसचा प्रवास चालू होता. मुंबई-दिल्ली असा १७-१८ तासांचा आगगाडीचा प्रवास आणि त्यानंतर दिल्लीत भरपेट जेवण यामुळे सहप्रवासी सुस्तावलेले होते शिवाय रीतसर ओळखीचा कार्यक्रमही झाला नव्हता. त्यामुळे बसमध्ये गाण्याच्या भेंड्या, हास्य-विनोद असा नेहमीचा धांगडधिंगाही नव्हता. एवढ्या मोठ्या प्रवासात वेळ कसा घालवायचा या विवंचनेत असताना मला अचानक माझा विरंगुळा सापडला.
      आमचा वाहनचालक 'सबसे तेज' होता.पटापट पुढच्या वाहनांना मागे टाकत त्याची आगेकूच चालू होती. असेच एका दुधाच्या गाडीला मागे टाकून जात असताना माझे लक्ष त्या गाडीच्या मागे रंगवलेल्या शब्दांवर गेले आणि मला हसूच आले. ते शब्द होते 'फिर वही दूध लाया हूं'. मग माझे डोळे असेच आणखी काही शोधण्यासाठी भिरभिरू लागले.तेंव्हा माझ्या लक्षात आले की 'हॉर्न ओके, फिर मिलेंगे,मेरा भारत महान' अशी मुंबईसारखी 'एकवाक्यता' इथे नव्हती. पुष्कळसे लिखाण गुरुमुखीत होते.गुरुमुखी जाणणारे जवळपास कुणी नव्हता म्हणून जीव चुटपुटला. पण जे थोडेसे साहित्य हिंदीत होते त्यातही पुष्कळ वैविध्य होते. एका ट्रकवर 
       'दुख में सुमिरन सब करै, सुख में करे न कोय
        जो सुख में सुमिरन करै तो दुख काहे होय'    हा कबीराचा दोहा होता तर दुसऱ्यावर ' दिल दिया जाता एक को, वो भी बडे नेक को  
                   दिल क्या आम का टुकडा है जो दिया जाय हर एक को'
असा फुटकळ शेर होता.
  कुठे 'गरीबी में वो रिश्ते भी टूट जाते हैं, जो खास होते हैं
         दुश्मन भी दोस्त बन जाते हैं जब पैसे पास होते हैं'  असे परखड सत्य आढळले तर कुठे 'लडकी को मत छेड, वो पाप होगा
                      ये मत भूल कि किसी दिन तू भी लडकी का बाप होगा' असा
इशारा होता.
        ' न पीना हराम है, न पिलाना हराम है
         पीनेके बाद होश में आना हराम है'  अशी भावना बाळगणारा 'पियाराम'ही इथेच भेटला आणि
         'तितलियां रस पीती हैं, भंवरे बदनाम होते हैं
          दुनिया शराब पीती है, ड्रायवर बदनाम होते हैं' अशी कैफियत मांडणारा 'सोवळाराम'ही इथेच भेटला.
           'सेठ दिलदार है, पर चमचोंसे परेशान हूं' असे सांगणाऱ्या  'त्रस्ता'ची ही भेट झाली आणि  
           ' रास्ते में रुकके दम लूं ये मेरी आदत नहीं
             लौटकर वापस चला जाऊं ये मेरी फ़ितरत नहीं 
             और कोई हमनवा मिल जाये ये मेरी क़िस्मत नहीं
              ऐ गमे-दिल क्या करूं, ऐ वहशते-दिल क्या करूं'  असे म्हणणाऱ्या अगतिकाचीही भेट झाली.  
      इथे जुलमाचा रामराम नव्हता. सगळे लिखाण मनापासून होते. औपचारिक' मेरा भारत महान' ऐवजी देशभक्तिपूर्ण 
              'दीवाली(दीवा+अली) में अली, मुहर्रम में राम
               इसीलिये तो मेरा भारत महान'  होते. 
     'बुरी नजरवाले तेरा मुंह काला' या मुळमुळीत शिवी ऐवजी 
                'बुरी नजरवाले तेरे बच्चे जीये
                 और बडे होकर तेरा खून पीये' असा सणसणीत शाप होता.
      अशा साहित्यमय प्रवासात दंग असताना आमच्या वाहनचालकाच्या अविरत भोंगा वाजवण्याने माझी तंद्री भंग पावली. बघितले तर समोर एक ट्रक आपल्याच मस्तीत चालला होता. आमच्या वाहनचालकाच्या भोंग्याला तो अजिबात भीक घालत नव्हता.कितीही शंख केला तरी काही उपयोग होणार नाही हे मला कळून चुकले होते कारण त्या ट्रकवर लिहिले होते
                 हॉर्न बजाओ शौक से
                  साइड मिलेगी अगले चौक से   
                                                             वैशाली सामंत.