सहज सरल सापेक्षता - ५ (अंतिम)

या आधी...


  • सहज सरल सापेक्षता - १
  • सहज सरल सापेक्षता - २
  • सहज सरल सापेक्षता - ३
  • सहज सरल सापेक्षता - ४


    ही आईन्स्टाईनसाठी मोठी झेप होती. आनंदानं त्यानं केवळ हवेत उडी मारायची बाकी ठेवली होती. त्याच्यासाठी ठीक होतं. पण आम्हाला तर त्याला कोंडून ठेवावंसं वाटत होतं. त्याचं म्हणणं होतंच असं विचित्र!

    आमच्यातलं कुणीसं म्हणालं, "आईन्या, वेड लागलंय तुला. अरे हेच बघ, तू ही ओढ तयार करायची म्हणतोस, ही अशी सूर्यासमोर ठेवायला. तुला ही ओढ म्हणजे काय पोरखेळ वाटते? अरे अशी कोणती ओढ आहे की जी मनात आलं की दिसेल नि मनात आलं की रुसेल? तेही तू 'स्थिर' कशाला म्हणतोस यावरून. ओढ अशी थोडीच असते, त्याला नाईलाज आहे."  आईन्स्टाईन म्हणाला, "हां! हेच तर मी म्हणतोय. ही ओढ आहेच अशी अवखळ, नाटकी." आम्ही म्हटलं, "बस्स झालं आईन्या. हरलास तू. तुझी 'ती' ओढ नाटकीच होती तर." एक कागदाची थप्पी पुढं सारत तो म्हणाला," हे घ्या. वाचा. नि बसा बरळंत."


    आम्ही वाचू लागलो. म्हणजे तसा प्रयत्न केला. साधारणसा. हे काहीतरी अजब गौडबंगालच होतं.  काहींना समजलंही म्हणे, बाकीचे ओळी मोजत होते. "हम्म!!".  काहीजण म्हणाले, "आणि जरी हे खरं असलं, तरी आपली जुनी थापच बरी आहे." अहो या पठ्ठ्यानं जे काही लिहिलं त्याचा घड मागच लागत नव्हता!


    पण हरमन- नाव आहे, म्हणाला त्याला काहीतरी खास समजलं म्हणे. त्यानं नि आईनस्टाईननं मिळून एक नवीनच कथा रचली. ती काहीशी अशी...


    तुम्हाला आपण कसं हालू शकतो हे माहीतच आहे. वर-खाली, डावी-उजवीकडे आणि पुढे मागे. हरमन म्हणाला, "यात आपण आणखी एकाची भर घालू - काळ. बरोबर, ही सुद्धा हालण्यासाठीची एक दिशा." "चार काय... ठीक." सारे म्हणालो.  आता दोघे थोडे गंभीर झाले. म्हणाले, "आता हे चारही पर्याय वापरत आपण काय काय करू शकतो ते पाहू. समजा हे चार प्रकार वाकवता आले तर? अंहं! असं नव्हे की यात जी गोष्ट आहे ती वाकवायची. पण हे चार पर्यायच वाकवले तर?" काही म्हणाले, "आता आणखी वाकड्यात शिरू नका बाबांनो." पण ते दोघे थांबणारे नव्हते, म्हणाले "हे घ्या!"


    समजा वस्तुमानामुळं हे पर्याय वाकत असले तर? जिथं जितकं वस्तुमान जास्त तिथं तितकाच मोठा खळगा. समजा दोन जागा आहेत. 'क' आणी 'ख'. आपापल्या काळातल्या. एक एका वस्तुमानाच्या या बाजूला आणि दुसरी त्या बाजूला. आता एखादी गोष्ट 'क' कडून 'ख' कडं गेली, तर कशी दिसेल? तुम्ही म्हणाल सरळ रेषे सारखी. खरं तर हो ही आणि नाही ही. रेषा आहे खरी. पण वाकलेली. जेंव्हा ती त्या खळग्यातून प्रवास करते ना, त्या भागापुरती.  ही रेषा एका रेषे सारखी तेंव्हाच दिसेल जेंव्हा आपण चारही मिती लक्षात घेऊ. तुम्ही 'क' कडून 'ख' कडं बघत असाल तर फक्त टिंबच दिसेल. जर काळ लक्षात घेता येत नसेल तर ही रेषा मध्येच काहीशी भरकटलेली दिसेल.  असं करू. फार मोठं काही तरी घेऊ. सूर्य. सूर्य घ्या.  आता 'क' आणी 'ख' सूर्याच्या जवळ असूद्यात. एकाच जागी पण वेगवेगळ्या काळा मध्ये. थोडावेळ जाऊ द्या. 'क' कडून 'ख' कडं जाणारी रेषा आता तुमच्या-माझ्यासाठी एक वक्राकार कमान असेल.  (लक्षात घ्या आपण पर्‍उठ्वीसोबत प्रदक्षिणेवर आहोत.) एक अशी कमान की जी फिरतच राहिलं नि जिच्या केंद्र भागी असेल आपला सूर्य.


    "पाहिलंत!" अल्बर्ट म्हणाला. "तुम्ही म्हणता सूर्याला ओढ आहे. पण आपण जेंव्हा सूर्या भोवती फिरतो, त्यालाच अक्ष बनवून,  हे  असे या चार मिती मध्ये, तेंव्हा आपण खरं तर एका सरळ रेषेतच जात असतो. आपण प्रदक्षिणा घालतच नाही आहोत मुळी. म्हणूनच म्हणतो की ही ओढ फसवी आहे, नाटकी आहे. तुम्हाला सरळ रेषेत राहायला दुसर्‍या कुढल्याच ओढीची गरज नाही!" आमच्या पैकी आणखी काही जणांना काहीतरी समजलं. ते म्हणाले, " तुम्ही दोघं हा नाद सोडून का नाही देत? हे खरं असूही शकेल, पण भलतंच तिरपागडं आहे." "मग घ्या खात्री करून!"'


    आता आम्ही या सार्‍याचा खरे खोटेपणा प्रत्यक्षपणे बघायचं ठरवलं...


    त्याच्या म्हणण्यानुसार, सूर्याचे किरण न्यूटनच्या म्हणण्यापेक्षा थोडे जास्तच लालसर होते. ते खरंच होतं. त्याच्या म्हणण्यानुसार मंगळ न्यूटनच्या तुलनेत थोडासा दूर होता. तो ही होता. विशेष म्हणजे, जे आता वरच्यावर सांगितलं जातं, तेच ते, दिवसा तारे दाखवणारं उदाहरण! तुम्हाला माहीतच आहे, जेंव्हा चंद्र सूर्य आणि पर्‍उथ्वी यांच्या मध्ये येतो, सूर्यग्रहण. याच वेळी तुम्हाला सूर्याच्या अगदी जवळचे तारे नक्की कसे आहेत हे पाहायची संधी मिळते. (अर्थातच आकाशात त्याच्या जवळ दिसणारे. आलंच असेल लक्षात. ) आम्ही त्यांच्याकडं बारकाईनं पाहिलं. पुस्तकाच्या आधारानं ते तारे कुठले आहेत, हे ही पाहिलं.  या तार्‍यांपासून आपल्याकडं येणारी सूर्यकिरण सूर्यापासून येताना वाकतात. अल्बर्टनं सांगितलं की ते किती वाकतील. न्यूटननं ही ते वाकतील असं सांगितलं होतंच पण त्याच्या तुलनेत अल्बर्ट ची वक्रता जास्त होती. साधारण दुप्पट. तर मग आम्ही तार्‍यांकडं बघत होतो नि हातातल्या पुस्तकात. याचा प्रयोगाचा निष्कर्ष तुम्हीही मला सांगू शकाल.


    आम्ही आवंढा गिळत, मटकन खाली बसलो. थोड्या वेळानं अल्बर्टला म्हणालो, "खरंच डोकेबाज आहेस बाबा. हे सारं तुला सुचलं कसं?" "आता तू ही हातातली नोकरी सोड नि चल आमच्या बरोबर"


    आम्हाला आता अल्बर्ट आवडायला लागला होता.


    ~ समाप्त ~


    थोडक्यात, हे सारं असं होतं. बापरे, वेळ तर पाहा किती झालीय ती! मी बराच वेळ काढला ना? चला. आता आटपतो. तुम्ही लक्ष देऊन वाचता हे पाहून बरं वाटलं. या उपद्व्यापाचा काहीतरी उपयोग झाला असेल अशी आशा आहे.


    तळटीप


    मूळ लेखन : ब्रायन रेटर (मपेट लॅबस्‌)
    मूळ लेख : छोट्या छोट्या शब्दात सापेक्षता.
    वैशिष्ट्य: मूळ लेखमालेचे वैशिष्ट्य म्हणजे सारी लेखमाला चार किंवा त्याहूनही कमी अक्षरांच्या शब्दात लिहिली आहे.
    टिप्पणी : मूळ लेखमाला अप्रतिम आहे. भाषांतर भाषांतर वाटल्यास, विषयांतर वाटल्यास, गोंधळात टाकणारे वाटल्यास वा अर्थ बिघडवणारे वाटल्यास त्याचा दोष आहे. लेखाच्या सुरसतेचे, सुलभतेचे सारे श्रेय मूळ लेखकाचे आहे. या विषयावर अधिकार वाणीने बोलण्याची त्याची प्राज्ञा नाही, मूळ लेख वाचून अर्थाचा अनर्थ होत असल्याचे लक्षात आल्यास त्याच्या नजरेस आणून द्यावे ही विनंती. त्याला रुचलेला लेख चोखंदळ वाचकांपुढे पोहोचवण्याचा हा प्रयास मात्र होता.