कवितांच्या रंगीत आठवणी

लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा.


वेदश्रीने प्रतिसादामधे लिहिलेली 'केळीच्या बागा मामाच्या' वाचली आणि बालपणीच्या रम्य आठवणींमधे मन कधी जाऊन पोहोचलं कळलंही नाही. सोनालीसारखं 'दाटल्याहेत आठवणी' असं झालं. हो, कारण दारकानाथांनी लिहिल्याप्रमाणे 'क्यूं की बचपन कभी रिटायर नही होता'!!!


ही 'केळीच्या बागा मामाच्या' कविता शाळेमधे नक्की कोणत्या वर्षी होती आठवत नाही. वेदश्रीचा प्रतिसाद पाहिला आणि मनाच्या तळाशी गेलेली ही कविता उसळी मारून वर आली. लहानपणीच्या काही कविता मधे कितीही वर्षे गेली तरी मन:पटलावरून पुसल्या जात नाहीत हेच खरं. ही कविता अचानक समोर आली आणि काही केल्या मनातून जाईना. काम करता करता एकीकडे मनांत सारखी सारखी ही कविता घोळत राहिली. वेदश्रीला मन:पूर्वक धन्यवाद, ही कविता प्रतिसादामधे लिहिल्याबद्दल.


मराठीच्या पुस्तकामधे ह्या कवितेच्या पानावर केळीच्या झाडाचं असलेलं चित्र अजूनही लख्ख आठवतं आहे. बालपणीची टप् टप् टापांच्या घोड्याची आणि फुलपाखराची कविताही अशीच मनांत घर करून राहिली आहे.


टपटप टाकित टापा चाले माझा घोडा


पाठीवरती जीन मखमली, पायी रुपेरी तोडा ॥


उंच उभारी दोन्ही कान, ऐटीत वळवी आपुली मान


मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा ॥


घोडा माझा घाली रिंगण, उखडून टाकी सारे अंगण


काही त्याला अडवत नाही, नदी असो की ओढा ॥


घोडा माझा फ़ार हुशार, पाठीवर मी होता स्वार


नुसता त्याला पुरे इशारा कशास चाबूक ओढा ॥


ही कविता काठीचा घोडा करून खेळणारा मुलगा म्हणत असतो. कवितेशेजारी काठीवर स्वार झालेल्या मुलाचं आणि त्या काठीने अंगणातल्या मातीत उमटवलेलं रिंगणाचं चित्र होतं.


छान फुलपाखरू असं होतं-


छान किति दिसते फुलपाखरू ॥


पंख चिमुकले निळे जांभळे हालवुनी उडते, फुलपाखरू ॥


ह्या वेलींवर फुलांबरोबर, गोड किती हसते, फुलपाखरू ॥


मी धरू जाता, येई न हाता, दूरच ते उडते, फुलपाखरू ॥


काही कविता अर्धवट आठवतात आणि पूर्ण आठवण्यासाठी मन धडपडत रहातं. ह्या केळीच्या बागा अकस्मात गवसल्या आणि वाटलं की वेदश्री आणि इतर मनोगतींना कदाचित मला अर्धवट आठवणार्‍या कविता पूर्ण आठवत असतील तर पहावं. वेदश्री, तुझी डायरी काढ बाहेर.


पहिलीच्या मराठीच्या पुस्तकात शेवटच्या पानावर चिमणीची एक कविता होती. पुस्तकाची सुरुवात 'अभय घर बघ', 'कमल नळ बघ' व तत्सम छोट्या सोप्या धड्यानी होत असताना, शेवटच्या पानावर मात्र मोठी कविता होती. पहिलीच्या मुलांनी वर्षाच्या शेवटापर्यंत वाचनात आणि आकलनात मोठी प्रगती करावी अशी शिक्षणखात्याची अपेक्षा असावी. ती कविता पूर्ण आठवत नाही. अनेकांना विचारून पाहिलं, पण पूर्ण कविता अजून सापडली नाही. कुणा मनोगतीच्या मनोगत झाली असेल तर अवश्य लिहाल का? मला आठवणारा कवितेचा भाग असा-


'कोंबडीताई, कोंबडीताई, माझा घरटा पाहिलास बाई?'


'नाही गं बाई, मुळी नाही, तुझा माझा संबंध काही?'


'कपिलामावशी, कपिलामावशी, घरटे मोडून तू का जाशी?'


'नाही गं बाई, मोडेन कशी, मऊ गवत दिले तुशी'


आता बाई जाऊ कुठे, पाहू कुठे, राहू कुठे


गरीब बिचार्‍या चिमणीला, सगळे टपले छळण्याला


चिमणीला मग पोपट बोले, 'का गे तुझे डोळे ओले?'


'काय सांगू बाबा तुला, माझा घरटा कुणी नेला'


'चिमणीताई, चिमणीताई, माझ्या घरट्यात येतेस बाई?'


'पिंजरा किती छान माझा, सगळा शीण जाईल तुझा'


'जळो तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला'


'राहीन मी घरट्याविना', चिमणी उडून गेली राना.  


 कवितेची सुरुवात मात्र काही केल्या आठवत नाही. अशीच अजून एक बडबड-कविता. तिचीही सुरुवात आठवत नाही. आठवणारा भाग असा-


वीज चमकली चक् चक् चक्


जिकडे तिकडे लख् लख् लख्


पाऊस आला धो धो धो


पाणी वाहिलं सो सो सो


पाण्यात बोट सोडली, सोडली


हातभर जाऊन बुडली, बुडली


बोटीवर बसला बेडूक


तो ओरडला डरांव डुक् डरांव डुक्


कुणाला आठवले आहे का सुरुवात? एक कविता होती-


उघड पावसा ऊन पडू दे


उडू बागडू हसू खेळू दे


कवितेच्या पुढचा भाग आहे का कुणाच्या लक्षात? चौथीच्या पुस्तकात 'हिरवा पाहुणा' नावाची कविता होती-


आज ये अंगणा पाहुणा गोजिरा


ये घरा आमुच्या सोयरा साजिरा ।।


वाजता नौबती, ये सखा सोबती


खेळवा संगती, हा जरा लाजरा ।।


कोवळे देहुडे, सावळे रूपडे


पोपटी अंगडे शोभते सुंदरा ।।


हा वसंतासवे, सृष्टीला हासवे


पालवे बोलवे भूमीच्या लेकरा ।।


गीत गाता मुखी, नाचवा पालखी


छत्रछायाकृती मित्र आला घरा ॥ 


'चल ग सई, कुठे ग बाई' अशीही एक कविता होती. मनीमाऊची कविताही प्रयत्न करूनही पूर्ण आठवत नाही. कुणी सांगेल का मला पूर्ण कविता?


मनीमाऊ मनीमाऊ अंग तुझे किती मऊ


डोळे तुझे घारे घारे मिशीवरून जीभ फिरे


मखमलीचे मऊ पाय चालून चालून थकले काय?


पाऊल काही वाजेना, चाहूल काही लागेना


डोळे लिटून बघतेस कशी..............


पोपटावरची कविता होती-


'पोपटा पोपटा बोलतोस गोड, पण झालास रोड


खा ना जरा पेरूची फोड'


भाऊ भाऊ बोलतोस गोड, देतोस फोड,


पण दार उघड आणि मला सोड'


ह्या झाल्या प्राथमिक शाळेतल्या कविता. माध्यमिक शाळेत शिकलेल्या कविता त्यामानाने जास्त संख्येने आणि जास्त प्रमाणात आठवताहेत. कुसुमाग्रजांची 'आनंदी पक्षी', बालकवींची 'निर्झरास', पद्मा भोळेंची 'आकाशवेडी' आणि इतर काही कविता पूर्ण (पाठ्यपुस्तकात होता तेवढा भाग) आठवताहेत. त्या आता इथे लिहित नाही. परंतु कुणाला हव्या असल्यास सांगा, जरूर लिहीन. अर्धवट आठवणार्‍या कविता मात्र लिहिते, म्हणजे कुणाला पूर्ण आठवत असतील तर त्यान्ना त्या लिहून मला पाठवता येतील. एक मला आवडलेली पण आता पूर्ण न आठवणारी कविता -


उंचावून कर उभे माड हे शिरी वीरापरि झेलीत वृष्टी


जरा पहावे क्षितिजावर तर बुडून जाते धुक्यात दृष्टी ॥


हिरवी  धरणी, श्यामल डोंगर, धूसर निळसर तलम हवा ही


--------------- उसळत खिदळत चंचल काही ॥


भिजून गेले पंख तरीही बसला तारांवरती पक्षी


मधून ठिपके थेंब कोवळा, फुलवित जळी वलयांची नक्षी ॥


-----छेडी--- मल्हार ----------- धारांच्या तारांवर वारा


लख्ख वीजेच्या प्रतिबिंबाचा क्षणात गोठून झाला पारा ॥


---------- धुराडे-------------------


-------------गुच्छ धुराचे झुलती, भिजती ॥


ही कविता कुणास आठवत असल्यास कृपया, अवश्य, जरूर पाठवा.


तर अशा ह्या कवितांच्या आठवणी. मनात फुललेल्या केळीच्या बागांनी हे लिहिल्याशिवाय स्वस्थताच अशक्य केली, आणि मग तगमगणार्‍या मनाला शब्दात उतरवण्याशिवाय गत्यंतरच नव्हत. काय करणार, शेवटी,


मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर


किती हाकला हाकला फिर येतं पिकावर ॥


मन मोकाट मोकाट त्याले ठायी ठायी वाटा


जशा वार्‍यानं चालल्या पाण्यावरल्या रे लाटा ॥


मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात


आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभाळात ॥