आधी लेखन की आधी वाचक ?

आधी अंडे की आधी कोंबडी? या प्रश्नाचे समर्पक उत्तर कधी मिळेल असे वाटत नाही. पण आधी लेखन की आधी वाचन? या प्रश्नाचे ढोबळ उत्तर अगदी सोपे आहे. मुळात कांही लिहिलेलेच नसेल तर काय वाचणार? आता कवि लोक "डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे" वगैरे म्हणतात. पण ती लिपीच वेगळी असते आणि न देखे रवी ते पहाणा-या कविमंडळींना ती वाचता येते. जास्त विचार केला तर लक्षांत येईल की माणूस लहानपणी भाषा शिकतांना आधी बोलायला शिकतो, मग वाचायला आणि त्यानंतर लिहायला हा नैसर्गिक क्रम आहे.  रोजच्या आयुष्यात आपण शेकडो अक्षरे या ना त्या कारणाने वाचतो पण कागदावर किती लिहितो?  वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांतील हजारो पाने वाचतो. अनेक जणांनी लाखावर पाने वाचली असतील. पण किती पाने लिहितो आणि त्यातील किती इतर लोक वाचतात?
 
पूर्वीपासूनच मला सुध्दा अधून मधून कांही बाही लिहायची हुक्की यायची. उगाच प्रेरणा, ऊर्मी यासारखे मोठे शब्द वापरण्यात अर्थ नाही. पण कोरा कागद आणि लिहिणारे पेन शोधून काढून दोन चार ओळी लिहीपर्यंत मध्येच फोनची किंवा दरवाजावरील घंटी वाजायची किंवा "अहो, ऐकलत कां?" ची साद येऊन लिहिण्यात खंड पडायचा.  त्यानंतर "आपण लिहिलेलं कोण वाचणार आहे?", "कोणी वाचणारच नसेल तर लिहायचं तरी कशाला ?"  अशा विचारामध्ये ती हुक्की विरून जायची. आधी आपल्याला सुचेल तसं लिखाण करायचं?  कां आधी निदान दोन चार तरी वाचक शोधून त्यांना रुचेल असं कांही लिहायचं? या घोळातच 'ढळला रे ढळला दिन सखया' असं झालं.


याच वेळी इंटरनेटवरील ब्लॉग या प्रकारानं मला गाठलं. मी त्याला शोधून काढलं असं मुळीच म्हणता येणार नाही. "तुम्ही इथे लिहू शकता.", "अगदी सोपं आहे", "कधी सुरुवात करता?" अशा गळेपडू जाहिराती वाचता वाचता मीही एकदाचा त्या मोहात पडलो.  पण आपण हे जे कांही ब्लॉग वगैरे लिहिले आहे ते तरी कोणी तरी वाचत असेल कां अशी शंका होतीच.  अधून मधून व्हिजिटर मीटर पाहिले.  त्यातील आकडा रोज थोडा पुढे सरकतांना दिसत होता. त्याअर्थी कोणीतरी तिथपर्यंत भरकटत येत तर होते. त्यानंतर त्यांनी माझं लिखाण कदाचित वाचलंही असेल आणि एखाद दुसरी ओळ त्यांना आवडली सुध्दा असेल असा सकारार्थी विचार करून पुढे जायचं असं ठरवलं.


त्यातच कुणीतरी मनोगताची वाट दाखवली. या दीवाने आम मध्ये सर्वांना मुक्त प्रवेश आहे. कोणालाही मनांत येईल तसे लिहिता येते तसेच वाचलेल्या लेखावर प्रतिक्रिया देता येतात. अनेक लोक प्रतिक्रिया देतात सुध्दा. त्यामुळे आपण लिहिलेले कोणीतरी वाचत आहे याचे समाधान मिळते. हा एक रबर स्टॅंप असतो असेही कोणी नकारार्थी म्हणेल ते सोडा. किती वाचने झाली हा आकडा दाखवला जातो. तितक्या लोकांनी निदान शीर्षक वाचून ते पान उघडलेले असते असे म्हणायला हरकत नाही.
 
इथे तर हजारी, पंचहजारी (वाचने झालेले) मनसबदार दिसतात. त्यांचे लिखाणही खुमासदार असते. पण नवख्या माणसाने कसले आडाखे बांधावे. किती वाचने झाली किंवा किती प्रतिक्रिया आल्या तर आपले लिखाण वाचण्याजोगे आहे असे समजावे याबद्दल अनुभवी मनोगतींनी कांही मार्गदर्शन केले तर ते उपयुक्त होईल.