रंगीत सांजा

  • रवा १ वाटी (बारीक अथवा जाड)
  • टोमॅटो १, अर्धे गाजर, अदपाव वाटी मटार, अर्धा कांदा
  • १ लहान बटाटा, अर्धी सिमला मिरची, ४-५ श्रावणघेवडा शेंगा
  • अदपाव भाजलेले दाणे, २ मिरच्या, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी
  • खवलेला ओला नारळ १ वाटी, अर्धे लिंबू, अर्धा चमचा लाल तिखट,
  • तेल, मोहरी, हिंग, हळद, जिरे, मीठ, साखर, बारीक शेव
३० मिनिटे
२ जणांना

सर्वात आधी मध्यम आचेवर रवा किंचीत तांबुस रंग येईपर्यंत भाजून घेणे. फोडणीमध्ये हिरव्या मिरच्या, लाल तिखट व वरील सर्व भाज्या बारीक चिरून घालणे व परतणे. १-२ वाफा देवून शिजवणे. नंतर त्यात २ वाट्या पाणी घालून व लिंबू पिळून, चवीनुसार मीठ व थोडीशी साखर घालून कालथ्याने ढवळून एक उकळी आणणे. उकळी आली की त्यात भाजलेला रवा घालून पटापट कालथ्याने ढवळणे. गुठळी होऊन न देणे. नंतर त्यावर झाकण ठेवून १-२ वेळा दणदणीत वाफ आणून परत कालथ्याने ढवळणे. सांजा मोकळा झाला पाहिजे.

वर दिलेल्या सर्व भाज्या बारीक चिरून (बटाटा, कांदा, मटार, श्रावणघेवडा उर्फ बीन्स, सिमला मिरची, गाजर, टोमॅटो ) साधारण २-३ वाट्या होतात.

रोहिणी

हा रंगीत सांजा खाताना त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर , खवलेला ओला नारळ  व  बारीक शेव घालून खाणे. सर्व भाज्या घातल्याने हिरवा, पिवळा, पांढरा, लाल रंग येतो. शिवाय त्यावर कोथिंबीर,ओला नारळ व शेव घातल्याने खायलाही मजा येते.

तमीळ मैत्रीण अभिरामि