सुन मेरे बंधू रे...

बिनसाखरेचा चहा प्यायलात तुम्ही कधी? किंवा बिनसाखरेची बासुंदी खाऊन बघीतलीत? एक वेगळीच पण चांगली चव लागते. हिंदी चित्रपटसंगीताचा कार्यक्रम, तोही लताबाईंच्या गाण्यांना वगळून, अशीच एका नव्या चवीची अनुभूती देऊन गेला. प्रयोजन होते सन्माननीय संगीतकार एस. डी. बर्मन यांच्या जन्मशताब्दीचे. एक ऑक्टोबरला झालेल्या या संगीतजलशाचा कालावधी होता तब्बल पाच तासांचा. अर्थात लताबाई आणि सचिनदा या द्वयीचा एक स्वतंत्र कार्यक्रम दोन-तीन दिवसांपूर्वीच होऊन गेला होता. पण लता मंगेशकर या रत्नाला वगळून इतर गायकांना वापरून सचिनदांनी ज्या अजरामर कलाकृती जन्माला घातल्या त्यातल्या पंचेचाळीस निवडक रचनांचा हा कार्यक्रम. खरे तर या कार्यक्रमाविषयी समीक्षात्मक काही लिहिण्याची गरजच नाही. दोन मध्यंतरासह सादर झालेल्या या कार्यक्रमातील गाण्यांची यादी जरी नजरेखालून घातली तरी आठवणीतल्या या गाण्यांचे स्वर्गीय सूर आपल्या आसपास रूंजी घालू लागतात.
'मनोगत' वरील संगीताचे एक जाणकार मला सचिनदांच्या संगीताविषयी  लिहितात :
बर्मनदांचे संगीत छान असते. पण अनिल बिस्वास - रोशन - जयदेव यांच्यासारखी खोली त्यात नसते असे माझे मत आहे. याचे कारण बाकी तिघांना काव्यविषयक जाण जास्त होती, त्यामानाने बर्मनदांना तितकी नव्हती असे वाटते. अर्थात देव आनंद साठी मुद्दाम हलकी फुलकी गाणी द्यावी लागली असेही असेल.
त्यांच्या या मताशी सगळेच लोक सहमत असतील असे नाही, पण एक बाकी खरे, या कार्यक्रमाच्या निवेदिकेने म्हटल्याप्रमाणे सचिनदांचे संगीत हे 'तरुणांचे' संगीत आहे. नौशाद यांच्या संगीतासारखे ते कधी शास्त्रीय बोज्याखाली दबून गेले नाही, की मदनमोहन यांच्या सुरावटींसारखे रानावनातून अनवट वाटा धुंडाळत फिरले नाही. सचिनदांचे संगीत हे हातगाडीवाल्याचे, पानवाल्याचे, रिक्षावाल्याचे आहे, सर्वसामान्यांचे आहे. तरीही ते कुलीन, जातीवंत आहे. लोकप्रिय होण्यासाठी सचिनदांना लक्ष्मीकांत-प्यारेलाल सारखे उथळ व्हावे लागले नाही. अर्थात मला स्वतःला सचिनदांची 'शर्मिली' नंतरची गाणी फारशी आवडत नाहीत, पण ही माझी वैयक्तिक आवड झाली. त्याआधीचा काळ बाकी जी.एं. चा भाषेत बोलायचे तर सचिनदांच्या सुरांच्या सुगंधी निळ्या धुक्याने भरून गेला आहे.
इतर गायक - संगीतकारांच्या तुलनेत यश मिळवण्यासाठी सचिनदांना कमी संघर्ष करावा लागला असावा, असा माझा समज आहे. राजघराण्यात जन्माला आलेल्या सचिनदांना आपले पिताजी नवद्वीपचंद्र बर्मन यांच्याकडून संगीताचे पहिले धडे मिळाले.एक गायक म्हणून त्यांचे नाव प्रसिद्धीला आले. हिंदी चित्रपटसृष्टीतला त्यांचा प्रवेश ही पुढची नैसर्गिक पायरी होती. 
सुन मेरे बंधू रे...
मेरा सुंदर सपना बीत गया...
न तुम हमे जानो...
जानू जानू री..
जाये तो जाये कहां...
उपर गगन विशाल...
गा मेरे मन गा...
आजा पंछी अकेला है...
ढलती जाये चुनरिया हमारी ओ राम...
दुखी मन मेरे...
तू कहां ये बता...
गुपचुप गुपचुप प्यार करे...
सच हुए सपने तेरे...
अच्छा जी मैं हारी...
ख्वाब हो तुम या...


स्वतःशी प्रामाणिक राहून सांगतो, पहिल्या मध्यंतराच्या आधी सादर झालेल्या या गाण्यांमधलं बरंवाईट करताच येणार नाही. सचिनदांच्या स्वतःच्या आर्त आवाजातलं 'सुन मेरे बंधू रे...' ऐकताना जसा आनंदाने काठोकाठ भरून गेलो, तसाच ठसकेबाज ' बन जा तू उनकी, मै इनकी रहूंगी' ऐकतानाही. 'उनका भी गम है, अपना भी गम है, अब दिल के बचनेकी उम्मीद कम है' ऐकताना तर सलाम साहिरला करावा, तलतला की सचिनदांना, असा प्रश्न पडला, 'तू कहां..' हे त्रेचाळीस वर्षांपूर्वी ध्वनिमुद्रीत झालेलं गाणं ऐकताना जी पावले ठेका धरत नाहीत, त्यांनी जिवंतपणाचा दावा तरी का करावा? ती सिमल्यातली धुकंभरी रात, खिडकीत परीसारखी उभी असलेली नूतन आणि जगातल्या सर्व प्रेमींचा अर्क साक्षात मदनाच्या मुशीत ओतून विधात्यानं तयार केलेला मस्तीभरा देव आनंद... कणेकरांचे शब्द उसने घेऊन सांगतो, लोक आपले मधुमेह- रक्तदाब विसरले, आपली सुटलेली पोटं आणि टकलं विसरले आणि टाळ्यांच्या साथीत प्रशांतचा 'वन्स मोअर' घेतलेला आवाज एखाद्या गुहेतून आल्यासारखा घुमू लागला...
'चांद तारोंने सुना
इन नजारोंने सुना
प्यार का राग मेरा
रहगुजारोंने सुना...'


वहां कौन है तेरा...
नैना दिवाने...
दिल आज शायर है...
वक्त ने किया...
हम थे वो थी...
आन मिलो आन मिलो...
तेरी दुनियी में जीने से...
छोड दो आंचल
अपनी तो हर आह इक तूफान है...
जलते है जिसके लिये...
रात अकेली है...
पूछो ना कैसे मैने रैन बिताई...
तेरे मेरे सपने...
सुनो गजर क्या गाये...

एखाद्या स्त्रीचं लावण्य असं जीवघेणं असतं की त्यापुढे आपण अगदी चिरगुटासारखे आहोत असं वाटायला लागतं (पु. ल.) या वाक्याची आठवण यावी अशी अवस्था.'ना कहीं चंदा, ना कहीं तारे, ज्योत के प्यासे मेरे नैन बेचारे, भोर भी आस की किरण ना लायी' अशी अहिरभैरवातली सैरभैर अवस्था. 'ये भी मुश्किल कै तो क्या आसान है' असा प्रेमिकेच्या रूपात वरच्या बर्थवर बसलेल्या विधात्याला केलेला  सवाल, ' जायेंगे कहां, कुछ पता नही, चल पडे मगर, रास्ता नही' असा अंधारात नाहीसा होणारा एकाकी रस्ता, 'गीत नाजुक है मेरा, शीशे से भी टूटे ना कहीं' हे कवीमनाचं आर्जव. भूलभुलैया.
ओरे माझी, मेरे साजन हैं उस पार...
सैंया दिल में आना रे...
ऐसे तो ना देखो...
अबके बरस भेज...
फूलोंके रंग से...
जाने क्या तूने कही...
ऐ काश चलते मिलके...
नजर लागी राजा...
नाचे मन मोरा...
पाच रुपैय्या बारा आना...
जाने वो कैसे लोग थे जिनके...
बडी सूनी सूनी है...
दीवाना मस्ताना हुवा दिल...
ओ जानेवाले हो सके तो लौट के आना
देखी जमाने की यारी..


वळवाच्या पावसासारखे बरसत येणारे सूर. 'किती घेशील दो कराने..' अशी अवस्था. 'बदरा घिर आये, रुत है भीगी भीगी...' सगळीकडेच सप्तसुरांचे मेघ भरून आले आहेत. सामताप्रसादांचा तबला बिजलीसारखा कडकडत आहे, कुठूनशी कुणाचीतरी चाहूल ऐकू येते.'सनसनाहटसी हुई, दिलमें आहट सी हुई...' नको, नको गं असं बघू..'खूबसूरत सी कोई हमसे खता हो जाये' माझं कुठलं एवढं नशीब? 'जो मै होत्ती राजा, बेला चमेलिया, महक रहती राजा तोरे बंगले पे' आणि कोण तो कोपऱ्यात एकटाच बोलतोय स्वतःशी? 'इसको ही जीना कहते है तो यूंही जी लेंगे, उफ न करेंगे लब सी लेंगे आंसू  पी लेंगे...' छ्या, काय गाणं की काय तुझं? 'पॅमॅगॅ पॅमॅगॅ पॅमॅगॅमॅ.. अरे तो बघा ढगातून रफीचा पहाडस्वर गरजत आला..'दीवाना मसताना हुवा दिल, जाने कहां होके बहार आयी...'


ती बघा, शुभ्र पांढरं धोतर- कुरता घातलेली, पातळ मागं फिरवलेल्या केसांची चष्मावाली एक कृश आकृती या सप्तस्वरांच्या इंद्रधनुष्यामागून आपल्याकडं पहात आहे. तिच्या चेहऱ्यावर लहान मुलाचं निरागस हसू आहे. हातात पानाचा चकचकीत डबा आहे. तुम्ही? फक्त तुम्हीच जवान? अरे, मला बघा. माझ्या संगीताला बघा. मी आज नाही, तुम्हीही उद्या नसाल, पण माझे जवान सूर सदैव जवान रहातील. अरे, अरे, वाऱ्याचा झोत आला, इंद्रधनुष्य विस्कटलं, सचिनदा दिसेनासे झाले.
टाळ्यांच्या कडकडाटानं मी भानावर आलो. रंगमंचावरचे वादक-गायक पडद्याआड होत होते. पाठ भरून आली होती, आणि मनही. भरल्या आवाजात मी त्या पडद्यालाच म्हणालो, 'थॅंक यू, सचिनदा'.