कर्नाळा- इतिहास

कर्नाळा लेख लिहिल्या नंतर वाचकांनी कर्नाळ्याच्या इतिहास बद्दल उत्सुकता दाखवली होती, तसे कर्नाळ्याच्या इतिहासा शिवाय तो लेखच अपूर्ण होता. मुळातच कर्नाळा किल्ल्या बद्दल बऱ्याच लोकांना ठोस माहिती नाही व इतर बऱ्याच ऐतिहासिक वाड:मयात देखील कर्नाळा बद्दल पूर्ण उल्लेख नाही. लोकांना कर्नाळाची तोंडओळख आहे ती पक्षी अभयारण्य म्हणून पण ह्या किल्ल्याने देखील ईतिहासात बऱ्याच लढाया पाहिलेल्या आहेत. कर्नाळाचा ईतिहास मी तिथे नमूद केलेल्या फलका वरील मजकुरावरून माझ्या भाषेत लिहितं आहे.


प्राचीन काळी पनवेल व बोर घाटातून (त्यावेळच्या) मुंबई व चौल बंदराकडे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाळा किल्ल्याचा उपयोग होत असे. चौल हे ठिकाण अलिबागच्या पुढे रेवदंडा जवळ मुरूडच्या वाटेवर आहे. तिथून येणारा माल कर्नाळा वरून त्या काळच्या पुणे, ठाणे येथील बाजारपेठेत पोहचवला जायचा. कर्नाळावर देवगिरी यादवांचे १२४८ ते १३१८ पर्यंत राज्य होते, किल्ल्याचे बांधकाम कोणी केले याचा पुरावा दिला नसला तरी देवगिरी यादवांनीच कर्नाळा बांधला असावा. बहुतेक करून महाराष्ट्रातील प्राचीन किल्ल्यां पैकी एक असा बहुमान कर्नाळ्याला आपण देऊ शकतो (चुकीची दुरुस्ती करण्यात यावी.). पुढे सन १३१८ ते १३४७ पर्यंत दौलताबादाच्या मुस्लिम शासकाकडे कर्नाळ्याचा ताबा होता. तेव्हा कर्नाळा उत्तर कोंकण म्हणजेच ठाणे व रायगड ह्यांचे मुख्यालय होते.दौलताबाद कडून कर्नाळाचा ताबा गुजरातच्या फौजे कडे गेला. हा गुजराती शासक कोण होता ह्याचा उल्लेख कुठेच नाही आहे, तसा मला पण ह्या बद्दल कोडे आहे कारण गुजराती शासकाने कर्नाळा पर्यंत मारलेली मजल ह्या बद्दल कुठेच अजून पर्यंत वाचनात आलेले नाही.


१५४० मध्ये अहमदनगरच्या निजामाने हा किल्ला जिंकला, पण गुजराती शासकाने पोर्तुगीजांच्या साहाय्याने कर्नाळा परत मिळवला. परत एकदा निजाम चालून आला असता गुजराती शासकाने कर्नाळा पोर्तुगीजांना बहाल केला, वसईच्या कॅप्टनने निजामाच्या सैन्याचा वेढा मोडून काढून स्वतःचा अंमल स्थापन केला आणि किल्ल्याच्या संरक्षणार्थ ३०० युरोपियन सैनिक तैनात केले. पुढे पोर्तुगीज व निजाम यांच्या मध्ये झालेल्या मैत्रीच्या तहात वार्षिक १७५० पौंड ह्या ठराविक खंडणीच्या रकमेवर पोर्तुगीजांनी हा किल्ला निजामशहाकाडे सोपविला. एवढा उहापोह पाहिल्या नंतर त्या काळात कर्नाळाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते.


निजामशहा कडून मग हा किल्ला मुघलांकडे होता, ह्या बद्दल सविस्तर माहिती मिळाली नाही. सन १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी कर्नाळा मुघलांकडून जिंकून स्वराज्यात समाविष्ट केला. मिर्झाराजा जयसिंग बरोबर झालेल्या पुरंदरा च्या तहात कर्नाळ्याचा देखील बळी गेला होता पण लवकरच इतर किल्ल्यां बरोबर कर्नाळ्याचे स्वराज्यात पुनरागमन झाले.  महाराजांच्या मृत्यू नंतर औरंगजेबाने कर्नाळा परत जिंकला आणि कर्नाळा पारतंत्र्याच्या साखळदंडा मध्ये जेरबंद झाला. सन १७४० मध्ये पेशव्यांनी कर्नाळ्याला परत स्वराज्यात आणले. १८०३ मध्ये इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाच्या वतीने गडाचा ताबा घेतला व १८१८ मध्ये स्वतःचा अंमल जाहीर केला. सन १८१८ पर्यंत क्रांतीवीर  वासुदेव बळवंत फडके ह्यांचे आजोबा कर्नाळ्याचे किल्लेदार होते. ह्याच कर्नाळाच्या बेलाग सुळक्याने तरूण वासुदेव ह्यांच्या मनात स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली आणि ह्या आद्य क्रांतीकाराला एडनच्या तुरंगाची भिंत पण थोपवू नाही शकली.


हा इतिहास तुम्हाला रंजक वाटला असेल तर कर्नाळाची छायाचित्रे सुद्धा तितकीच छान आहेत (माझ्या लिखाणापेक्षा नक्कीच). काही छायाचित्रे गेल्या जानेवारीत काढलेली आहेत तर गर्द हिरव्या रंगातली छायाचित्रे गेल्या शनिवारी काढलेली आहेत. त्यासाठी तुम्ही हा दुवा पाहू शकता.http://www.flickr.com/photos/sumeetshinde.