तालीम एकांकिकांची आणि अभ्यासाची सुद्धा...

            कॉलेज सुरू होतं तसे मला हळू हळू तालमीचे वेध लागतात. माझी तालीम म्हणजे व्यायामशाळा नाही; एकांकिकांच्या तालमीबद्दल बोलतोय मी. शाळेत असताना चुकूनही कधी स्टेजवर न गेलेला मी, एकांकिका करण्यात कसा ओढलो गेलो कुणास ठाऊक? गेली दोन वर्ष बॅकस्टेज करणं आणि मिळालाच तर छोटासा रोल करणं अशीच गेली. मला काय माहीत की फक्त अनुभव आणि शब्दांचे शुद्ध उच्चार यांवर एवढा मोठ्ठा रोल मिळू शकतो. मी यावर्षी युनिव्हर्सिटी युथ फेस्टीव्हलला केलेल्या एकांकिकेत सायकॉलॉजिस्टच्या भूमिकेत होतो. कधीही न प्रत्यक्ष पाहिलेली व्यक्ती स्टेजवर कशी बरं करावी? इमॅजिन आणि इंप्रोव्हाइज करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.


एक प्रसिद्ध सायकॉलॉजिस्ट, म्हणजे तो वयाने पस्तिशीचा असावा. कपडे अर्थातच कडक इस्त्रीचे फॉर्मल्स. दिसायला कसा असेल? "श्वास" मधल्या संदीप कुलकर्णीसारखा (आता दिसायला मी काही त्यांच्याएवढा स्मार्ट आणि तगडा मुळीच नाही, तरीपण इमॅजिन करायला कोणाच्या बापाचं जातंय?) अर्थात, मी केस वाढवल्यामुळे थोडा मॅच्युअर्ड दिसतच होतो म्हणा. पण खरा प्रॉब्लेम होता तो म्हणजे, एका खर्‍याखुर्‍या सायकॉलॉजिस्टचे वाटावेत असे मॅच्युअर्ड उच्चार, ते विशिष्ट शब्द, लकबी हे सगळं डेव्हलप करायचा.


मला सरांची, म्हणजे दिग्दर्शकांची खरी मदत झाली ती इथेच. आमचे सचिन सर असं म्हणायचे की, नुस्तं पाठांतर दाखवून उपयोग नाही; प्रत्येक वाक्याला एक थॉट्प्रोसेस (विचारधारा ?)द्यायला हवी. म्हणजे प्रत्येक वाक्याचं, त्या योगानं पूर्ण व्यक्तिरेखेचं लॉजिक डेव्हलप करावं लागणार. "या व्यक्तिरेखेसाठी मी भरपूर होमवर्क केला!" असं मोठे मोठे ऍक्टर लोकं जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांना काय अभिप्रेत असतं ते मला आता थोडंफार कळू लागलंय. छ्या, सायकॉलॉजिस्ट नुस्ता स्टेजवर करायचा तरी एवढी डोकॅलिटी लागते; खर्‍या सायकॉलॉजिस्टचं काय होत असेल कुणास ठाऊक?


बाकी दिनेश सरांची क्रिएटिव्हीटी ही एक अजबच गोष्ट! कधी काय आणि कसं सुचेल काय सांगताच यायचं नाही बॉ. साला आख्खा एक सीन प्रेक्षकांकडे पाठ करून करणं काय सोपी गोष्ट आहे का? पण थिएटर करण्यातली खरी मजा ती हीच. अर्थात, दिनेश सर, सचिन सर आणि जय सर सुद्धा हे जे काय बोलायचे, ते मी लिहितोय इतक्या सभ्य भाषेत कधीच नाही. त्यांची भाषा लिहायची तर अर्ध पान नुस्त्या फुल्यांनीच भरेल.........


जाऊदेत, चांगल्या गोष्टी तेवढ्या घ्यायच्या. बाकी सोडून द्यायचं


काय, खरं की नाही?


खरंच, सोडून द्यायचं! ह्या एकांकिका, हा थिएटरचा मला व्यापून वर दशांगुळे उरणारा जीवनानुभव असा सोडून थोडीच देता येतो. म्हणूनच कॉलेजाच शेवटच वर्ष असलं तरी मी थोडी रिस्क घ्यायचंच ठरवलं. आणि आय.एन्‌.टी साठी नव्या दमाने, नव्या स्क्रिप्टवर मेहनत घ्यायला सुरुवात केली.....


.....आय.एन्‌.टी च्या स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत पोचलो आम्ही सगळे, तेव्हा कसला आनंद झालेला मला. हो ना, परफॉर्मन्सच्या फक्त चार दिवस आधी मिळाला मला मेन रोल आणि आमची एकांकिका पुढच्या फेरीत आलीसुद्धा. ... ... ...


...................आता एकांकिका संपल्या. आय.एन्‌.टी च्या स्पर्धेच्या फायनलला न पोहोचता आल्याच दुःख मनाशी अजूनही सलतंय. सकाळी उठल्यापासूनच एक रिकामपण जाणवायला लागतं. रात्री कितीही थकून झोपलो तरी, पहाटे उठल्याउठल्या कधी एकदा तालमीला पोचतो असं व्हायचं. कसले भारलेले दिवस होते ते! अस्तित्वात नसलेली एखादी व्यक्तिरेखा... तो माणूस किंवा एक सायकॉलॉजिस्ट... एकांकिकेची ३५- ४० मिनिटं मी पूर्णपणे त्या व्यक्तिरेखेसारखाच विचार करणार, चालणार बोलणार ही तसाच!!! आता सगळं संपल्यावर भूतकाळाकडे तटस्थतेने बघताना किती वेगळं आणि ........ आणि........ भन्नाट वाटतंय. (आयला, ऐन टायमाला शब्दच सुचत नाहीत)


आणि आता समोर येऊन पडलाय गेल्या पंधरा- वीस दिवसांचा बाकी असलेला अभ्यास... माझ्याशी दुरान्वयानेही संबंध नसलेले ते इकॉनॉमिक्स चे आकडे आणि एम्पीपीची(मॅनेजमेंट ऍन्ड प्रॉडक्शन प्लॅनिंग) रटाळ थिअरी हुश्श... पण नाही, अभ्यास न करून कसं चालेल? पण एकांकिका करण्याच्या वेळची एकाग्रता इकडे अभ्यासात कशी आणावी हाच एक मोठा प्रश्न आहे. हे कसं शक्य आहे? एकांकिका करणं, रोज सकाळी कडमडत तालमीला जाणं या प्रत्येक गोष्टीत एक नवीन करण्याची ऊर्मी आहे. एकच वाक्य रोज वेगळ्या पद्धतीने म्हणून पाहताना मिळणारा आनंद, या थिअरीच्या एककल्ली अभ्यासात कुठायं?जाऊदे हा विचारच नको...कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला(तरी) पंच्यात्तर (की पंच्याहत्तर?!?) टक्के काढायचेच म्हटल्यावर हे सारं करणं आलंच की!


पण माझी तर इकॉनॉमिक्सचं पहिलं पान वाचून उलगडायच्या आधीच झापडं मिटतात. एम्पीपीची कहाणीही काही वेगळी नाहीये. नोट्स काढूयात???...... कदाचित लिहायला लागलो की झोप थोडी उशीरा येईल. नोट्स.......आता या नोट्स काढायच्या म्हंजे दोन टोकाचे प्रकार आहेत माझ्याबाबतीत; एम्पीपीत काटछाट इतकी करतो की पुस्तकाच्या निम्मं सुद्धा नोट्समधे उतरत नाही. थोडक्यात काय तर, फिचर्स ऑफ मॅनेजमेंट, कॉम्पोनंट्स ऑफ मॅनेजमेंट आणि प्रोसेस ऑफ मॅनेजमेंट या तिन्ही उत्तरांमध्ये एकच पॉईंट फिरवून फिरवून लिहायची खाबूगिरी मला चांगलीच जमते. आणि इकॉनॉमिक्सची तर तर्‍हाच निराळी; भारताच्या गेल्या ५०-५५ वर्षातल्या औद्योगिक विकासाच्या एकजात सगळ्या बाजू विशद करणारे(ऑल फिगर्स इन क्रोअर्स असा बिल्ला अभिमानाने मिरवणारे) ते आकडे आणि परसेंटेजेस सुद्धा..........बापरे भोवळ येते मला! छ्या, हे सारं कधी आणि कसं पाठ होणारे कुणास ठाऊक........


काय करू मी या अभ्यासासाठी?........कसा करू?.................कधी करू?


फक्त प्रश्न आणि प्रश्नच