मुक्काम वानवडी

 पुण्याजवळ वानवडी येथे महादजी शिन्दे यांची छत्री आहे असे शाळेत असतांना इतिहासाच्या (कां भूगोलाच्या?) पुस्तकात वाचतांना खूप मजा वाटली होती. लढाईच्या धामधुमीत ते ती इथे विसरून गेले की कुणाला तरी त्यांनी आपली आठवण म्हणून ठेवायला दिली होती अशी पृच्छा सुद्धा केली होती. ती एक स्मारक म्हणून बांधलेली इमारत  आहे असे समजल्यावर तितकीशी मजा राहिली नाही. तरीही ते नांव स्मरणाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात कोरले गेले आणि पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर पुसले गेले नाही.


त्यानंतर अनेक वर्षांचा काळ गेला. अनेक वेळा पुण्याला जाणे व तेथे राहणेही झाले. पण वानवडीचा साधा उल्लेख सुद्धा कधी झाल्याचे आठवत नाही. आपण पुण्याला 'वानोरी' इथे फ्लॅट घेणार असल्याचे मुलाने सांगितले आणि जुनी आठवण एकदम जागी झाली. केंद्रीय विद्यालयात शिकतांना वानवडीची किंवा महादजी शिंदे यांची माहिती त्याला कधीच मिळाली नव्हती. त्यामुळे मी त्याबद्दल विचारल्यावर सुद्धा त्याच्या डोक्यात कुठलीच ट्यूब पेटली नाही. 


दिवाळीनिमित्त त्याच्याकडे रहायला आल्यावर शोधाशोध सुरू केली. पुणे शहराने प्रसरण पावतांना वानवडीला गिळंकृत केले असल्याने आता ते 'पुण्याजवळ' राहिलेले नाही. त्याचाच भाग झाले आहे. 'विंडसर','ऑक्सफर्ड', 'रहेजा', 'गंगा' 'सेक्रेड हार्ट' अशा नांवांच्या मोठमोठ्या वसाहती उभ्या राहून सगळे वातावरण कॉस्मोपॉलिटन होऊन गेले आहे. मधेमधेच कोठे कोठे मराठमोळी जुनी वस्ती दिसते. त्याचेही बरेच शहरीकरण झालेले दिसते.


अशाच एका छोट्या रस्त्याच्या टोकाला महादजी शिंदे यांची सुप्रसिद्ध छत्री उभी आहे. ते जरी सन १७९४ मध्ये स्वर्गवासी झाले तरी त्यांच्या वंशजांनी सन १९१३ मध्ये हे स्मारक बांधले अशी नोंद केलेली संगमरवरी शिला तिथे बसवली आहे. नक्शीदार खांब व शिखर असलेले हे एक महादेवाचे प्रेक्षणीय असे मंदिर आहे. त्याची व्यवस्थित निगा राखलेली असल्याने चांगल्या सुस्थितीत आहे. शिंदे घराण्याचे आद्य संस्थापक सरदार राणोजी शिंदे यांच्यापासून अलीकडेच वारलेल्या माधवराव यांच्यापर्यंत सर्वांच्या तसबिरी भिंतीवर टांगल्या आहेत. त्यातच एक विजयाराजे यांचा फ्रेम न केलेला फोटो आहे.


येथील एका शिलेवरील लिखाण थोडे संस्कृतमध्ये व  त्याहूनही थोडक्यात मराठीमध्ये केले असून हिंदीमध्ये लिहिलेली एक स्वतंत्र शिला आहे. त्यावर सुद्धा तत्कालीन संस्थानिकाचे नांव शिंदे न लिहिता सिंधिया असे लिहिलेले आहे. हा बदल कधी झाला हा आणखी एक संशोधनाचा विषय होईल.


एकंदरीत पहाता वानवडीचा मुक्काम थोडा सत्कारणी लागला असे म्हणायला हरकत नाही.