मराठी चित्रपटांचा तिरंगा!

आनंदाने वाचावी अशी बातमी म.टा. त वाचायला मिळाली. सर्वांना चर्चा करता यावी ह्यासाठी त्या बातमीतला काही भाग येथे उतरवून ठेवला आहे.


म.टा. तली मूळ बातमी : इंडियन पॅनोरमात मराठीचा 'तिरंगा'
शुक्रवार दि. २६ ऑक्टो. २००६.


बयो, बाधा आणि मातीमाय...


नवी दिल्ली


' श्वास'नंतर उभारी घेतलेल्या मराठी चित्रपटसृष्टीने यंदाच्या इंडियन पॅनोरमामध्ये 'तिरंगा' फडकवला. चित्रा पालेकर यांचा 'मातीमाय', गजेंद अहिरे यांचा 'बयो' आणि सुमित्रा भावे/सुनील सुकथनकर यांचा 'बाधा' या तीन मराठी चित्रपटांनी हा भीमपराक्रम केला आहे. या चित्रपटांबरोबरच पणजीत होणाऱ्या ३७व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मधुर भांडारकर या मराठी दिग्दर्शकाचा 'कॉर्पोरेट'ही पॅनोरमामध्ये झळकणार आहे.


बंगाली आणि मल्याळी सिनेमांची वर्षानुवर्षांची मक्तेदारी मोडून काढत मराठी सिनेमांनी हे यश कमावले आहे. अगदी अलीकडेपर्यंत देशातील चित्रपटकलेचे दर्शन घडवणाऱ्या पॅनोरमामध्ये एकही मराठी सिनेमा नसण्याची नामुष्कीची पाळी येत असे. ती 'परंपरा' या सिनेमांनी दिमाखात मोडली आहे. पणजीमध्ये २३ नोव्हेंबर ते तीन डिसेंबर या काळात रंगणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेता शशी कपूर यांच्या हस्ते होणार आहे. हिंदी व्यावसायिक चित्रपटांतील फक्त 'बनारस' या पंकज पराशरदिग्दशिर्त चित्रपटाचा पॅनोरमामध्ये समावेश झाला आहे. सईद मिर्झा यांच्या नेतृत्वाखालील ज्युरींनी पॅनोरमासाठी चित्रपटांची निवड केली.


नॉन-फीचर फिल्म्सच्या विभागातही मराठीचा तिरंगाच फडकला आहे, हे विशेष. तीन मराठी दिग्दर्शकांच्या कलाकृती या विभागात निवडल्या गेल्या आहेत. ख्यातनाम दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा पंडित कुमार गंधर्वांवरील 'हंस अकेला' (हिंदी), फिल्म्स डिव्हिजनसाठी उत्तमोत्तम अॅनिमेशनपट बनवून असंख्य पुरस्कार पटकावणारे दिग्दर्शक अरुण गोंगाडे यांचा संगीतमय 'कटी पतंग' (हिंदी) आणि विनय वैराळे यांचा बी. आर. चोप्रा यांच्यावरील 'बी. आर. हर दौर में नया दौर' या फिल्म्स या विभागात निवडल्या गेल्या आहेत. .... ....