सूर्याचे न चालता चालणे- भाग १

खगोलशास्त्रामधील नवनव्या घडामोडींची माहिती देणारे अभ्यासपूर्ण लेख तज्ज्ञ मंडळी लिहीत असतात. या शास्त्रामधील काही महत्वाचे शोध आधी कोणी लावले यावर अनेक वेळा वादविवाद होत असतात. "सूर्याचे न चालता चालणे" हा ज्ञानेश्वरीमधील एका ओवीचा भाग या संदर्भात उद्धृत केला जातो. हे चालणे कसकशा प्रकारचे असते याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न या लेखात करीत आहे.


रोज सकाळी पूर्व दिशेला क्षितिजावर सूर्याचे लालचुटुक बिंब उदयाला येते. हा सूर्य प्रखर होता होता आकाशात वर वर चढत जाऊन माध्यान्हीला माथ्यावर येतो. त्यानंतर पश्चिमेकडे खाली उतरत संध्याकाळी त्याचे फिकट पडत जाणारे बिंब क्षितिजाला टेकून अदृश्य होते. हे दृश्य आपल्या महाराष्ट्रात, किंवा उष्ण कटिबंधात सर्वत्र वर्षभर दिसते. गेल्या डिसेंबर अखेरीस मी इंग्लंडमध्ये होतो. तिथे मात्र आकाशाच्या दक्षिणेकडच्या छोट्याशा भागातच सकाळी तो डावीकडे उगवायचा, तिरका चालत भर दुपारी जेमतेम हातभर वर यायचा आणि संध्याकाळी उजवीकडच्या बाजूला अस्तंगत व्हायचा. हा सगळा प्रवास ७-८ तासात आटपायचा. आणखी उत्तरेला धृवाजवळ गेल्यावर त्याचे दर्शनसुद्धा झाले नसते तर दक्षिण धृवाजवळ तो चोवीस तास क्षितिजाभोवती घिरट्या घालताना दिसला असता. तिथे उदयही नाही आणि अस्तही नाही. सूर्याचे हे वेगवेगळ्या प्रकारचे चालणे दररोज घडत असते.


पुढील माहितीसाठी आपण महाराष्ट्रात परत येऊ. रात्र झाल्यावर तगेच आकाशांत चांदण्या (ग्रह,तारे) दिसू लागतात, शुक्ल पक्षामध्ये चंद्र चमकताना दिसतो. कृष्ण पक्षात तो सूर्यास्तानंतर उगवतो. त्या चांदण्यांकडे लक्ष देऊन पाहिल्यावर त्यांमधील फक्त एक धृव तारा एका जागी स्थिर असून त्याच्या आजूबाजूच्या काही चांदण्या त्याच्याभोवती फिरत आहेत असे दिसते. इतर सर्व चांदण्या इतक्या दूर असतात की आपण त्यांचा धृवाबरोबर संबंध जोडू शकत नाही. सूर्यास्ताच्या वेळी त्या ज्या ठिकाणी असतील तेथून पश्चिमेकडे सरकत जात क्षितिजावरून मावळताना दिसतात. तसेच पूर्वेच्या क्षितिजावरून नवनव्या तारका उगवून पश्चिम दिशेकडे जाताना दिसतात. याचाच अर्थ फक्त सूर्यच नव्हे तर चंद्र व इतर चांदण्यासुद्धा आकाशात सतत पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना आपल्या डोळ्यांना दिसतात व चक्षुर्वैसत्यम् या न्यायाने त्या आकाशमार्गे तसा प्रवास करीत असणार असेच सर्वसामान्य माणसाला वाटेल. हे झाले पहिल्या प्रकारचे चालणे.


या चालण्यावर परंपरागत पद्धतीने विचार करताना एक गोष्ट समजत नाही. ती म्हणजे पश्चिमेकडे मावळलेले सूर्य,चंद्र व चांदण्या पूर्वेला कसे उगवतात? ते इकडून तिकडे जमिनीखालील एखाद्या बोगद्यातून सरपटत जातात का ? पण तसा बोगदा तर कुठेच दिसत नाही. जमिनीखालील दुसऱ्या एका आभाळातून ते वर्तुळाकार फिरतात का? पण जमिनीखाली तर पाताळलोक आहे. तिथे आभाळ कसे असेल? असल्यास त्यातून जमीन खाली पडणार नाही का? दररोज पूर्व दिशेला क्षितिजाखाली नवनवीन सूर्य चंद्र निर्माण होऊन ते पश्चिमेला क्षितिजाखाली नष्ट होत असतील का ? पण ते तर चिरकाल राहणारे आहेत म्हणून यावच्चंद्रदिवाकरौ असा वाक्प्रचार निर्माण झाला. सूर्यास्तानंतर आभाळभर एकदम दिसू लागणाऱ्या चांदण्या कोठे निर्माण होतात? प्राचीन कालापासून अशा अनंत प्रश्नांनी जगभरातील अनेक विचारवंतांना छळले असेल. पण किती लोकांना त्याचे सयुक्तिक उत्तर मिळाले ?


  क्रमशः................