सूर्याचे न चालता चालणे - भाग २

आकाशातील लक्षावधी चांदण्या कधीही इतस्ततः भरकटत नाहीत, त्या नेहमी एकमेकापासून ठराविक अंतर ठेवून समान वेगाने चालतात व त्यांचे समूह बनवले तर त्या समूहाचा आकार कधीही बदलत नाही असे त्यांचे निरीक्षण करणाऱ्या विद्वानांना दिसले. त्यांनी आकाशाच्या संपूर्ण गोलाची संत्र्याच्या फोडीच्या आकाराच्या बारा भागात विभागणी करून प्रत्येक भागाला त्या भागात दिसणाऱ्या तारकांपासून बनू शकणाऱ्या आकारांची मेष, वृषभ इत्यादी नांवे दिली. बारा राशींचे हे नामकरण करणाऱ्या विद्वानांची कल्पनाशक्ती अचाट असणार. निदान मला तरी वृश्चिक राशीतील विंचवाची नांगी सोडली तर बकरा, बैल, सिंह वगैरे प्राण्यांचा भास कधी झाला नाही. पण असामान्य कल्पकतेने चांदण्यांच्या समूहांच्या अमूर्त आकारांना मूर्त रूपे देऊन त्याच्या आधाराने त्यांनी आकाशाचा एक नकाशा निर्माण केला व खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी त्याचा उपयोग करून घेतला.


प्रामुख्याने चमकणारे शुक्र, गुरू, मंगळ वगैरे ग्रह मात्र तारकांच्या कुठल्याही समूहात सामील न होता सतत इतर चांदण्यांच्या जवळ किंवा त्यांच्यापासून दूर सरकत असताना दिसतात. जरी अधून मधून मागे पुढे सरकतांना आढळले तरी ते मुख्यतः मेष, वृषभ, मिथुन या क्रमानेच बारा राशीमधून (आकाशाच्या विभागातून)भ्रमण करतात असे बारकाईने निरीक्षण केल्यास दिसते. मीन रास ओलांडल्यानंतर ते पुनः मेष राशीत प्रवेश करून नवे परिभ्रमण सुरू करतात. सूर्य आभाळात असेपर्यंत कोणतेच तारे दिसत नाहीत. पण सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावरील तारे आणि सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावरील तारे पाहिल्यावर त्या दोन्ही वेळी सूर्याच्या आगेमागे कोणत्या राशी आहेत ते समजते व त्यावरून सूर्य कोणत्या राशीत आहे याची कल्पना येते. ते पाहत गेल्यास सूर्यसुध्दा आकाशाच्या मेष, वृषभ या विभागात त्या क्रमानेच पुढे पुढे सरकत असल्याचे समजते.


कोठल्याही क्षणी कोणचा ग्रह आकाशाच्या कोणत्या भागात आहे हे तो अमक्या तमक्या राशीमध्ये आहे अशा शब्दात सांगितले जाते. कुंडली हा एक प्रकारचा नकाशा असतो व त्यात बारा राशींची बारा घरे विशिष्ट क्रमाने मांडलेली असतात व हे ग्रह त्या क्षणी ज्या ठिकाणी असतील तेथील राशीच्या चौकटीत दाखवतात. हा सारा प्रवास संथ गतीने सुरू असतो. मुंबईहून दिल्लीला जाणारी आगगाडी जशी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश वगैरे राज्यांच्या सीमा पार करीत जाते तसे ते एकामागून एक राशी ओलांडत जातात. कोणचाही ग्रह कधी टुणकन उडी मारून एका घरातून दुसऱ्या घरात जात नाही.


रात्रीच्या वेळी जेव्हा आकाशात मेष रास पश्चिम क्षितिजावर टेकलेली दिसते तेव्हा तिच्या मागून वृषभ, मिथुन, कर्क, सिंह व कन्या या राशी पूर्वेकडे क्रमवार पसरलेल्या दिसतात. जसजशा त्या एकामागून एक अस्त पावतात तसतशा तूळ, वृश्चिक वगैरे उरलेल्या राशी पूर्वेला उगवून वर चढतात. याचाच अर्थ त्या राशीचक्रामधून भ्रमण करणारे सूर्य, चंद्र व इतर ग्रह ही यात्रा पश्चिमेकडून पूर्वेकडे या दिशेने करतात. त्यांचे हे दुसऱ्या प्रकारचे विरुद्ध दिशेने चालणे मात्र प्रत्यक्ष डोळ्याला कधीही दिसत नाही, पण राशीचक्राच्या आधाराने त्यांचा वेध घेणाऱ्या निरीक्षकांना निश्चितपणे जाणवते.


  क्रमशः...............