सूर्याचे न चालता चालणे - भाग ३ (अंतिम)

सूर्योदयापासून अस्तापर्यंतचे त्याचे पहिल्या प्रकारचे चालणे साध्या डोळ्यांना दिसते यामुळे अनादि कालापासून सर्वसामान्य माणसांनीसुद्धा ते पाहिलेले आहे. दुसऱ्या प्रकारचे बारा राशीमधून त्याने केलेले भ्रमण सुद्धा निदान काही हजार वर्षापासून विद्वानांना माहीत असावे असे पुरातन वाङ्मयातील उल्लेखावरून दिसते. हे दोन्ही प्रकारचे चालणे कशामुळे घडते याचा विचार करून जाणत्या लोकांनी आपापले तर्क व सिद्धान्त वेळोवेळी मांडले असणार. तसेच आकाशाचे नेमके स्वरूप कसे आहे याबद्दल सुद्धा विचार झालाच असेल. आकाश, अवकाश, ग्रह, तारे वगैरेबद्दल मांडल्या गेलेल्या संकल्पनांतून ज्या तत्कालीन किंवा मागून आलेल्या विद्वज्जनांनी मान्य केल्या त्यांचा पुढील पिढीच्या शिक्षणाच्या अभ्यासात समावेश झाला व या प्रकारे ते ज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचले.


"दिसते तसे नसते म्हणून जग फसते" या उक्तीप्रमाणे सूर्याचे हे दोन्ही प्रकारचे चालणे हा निव्वळ दृष्टिभ्रम आहे असे कोपर्निकसने ठामपणे सांगितले. पृथ्वीच्या स्वतःभोवती गिरकी घेण्यामुळे सूर्याचे पहिल्या प्रकारचे चालणे होत असल्याचा भास निर्माण होतो व त्याचेबरोबर चंद्र, ग्रह व तारे सुद्धा आपल्याभोवती फिरताना दिसतात हे त्याने सिद्ध केले.


गुरू, मंगळ वगैरे ग्रह सूर्याभोवती फिरतात तसेच पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती फिरते. यामध्ये मंगळ, गुरू व शनी हे बाह्य ग्रह सूर्याभोवती फिरता फिरता पृथ्वीप्रदक्षिणा सुद्धा करतात तर पृथ्वी सूर्याभोवती फिरताना बुध व शुक्र यांच्याही सभोवती फिरते. या सर्वांच्या कक्षा व गती वेगवेगळ्या असल्यामुळे काही ग्रह कधी कधी वक्री होतात असा भास होतो हे त्याने किचकट गणिताद्वारे दाखवून दिले व पृथ्वीच्या सूर्याभोवती होणाऱ्या भ्रमणामुळेच सूर्याच्या दुसऱ्या प्रकारच्या चालण्याचा भास निर्माण होतो असे त्याने सांगितले. चंद्र मात्र खरोखरीच पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे त्याचे दुसऱ्या प्रकारचे चालणे हा भास नसून ते सत्य आहे.


या सगळ्या गोष्टींचा निरीक्षण व विश्लेषण या द्वारे सखोल अभ्यास करून त्याने आपले सिद्धान्त मांडले होते. तरीसुद्धा तत्कालीन इतर विद्वानांना ते मान्य नव्हते याची कल्पना असल्याने त्याने ते प्रसिद्ध न करता फक्त लिहून ठेवले. तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याच्या काही चाहत्यांनी ते छापून प्रसिद्ध केले. पण त्याच्या मृत्यूनंतर त्यावर मोठे वादळ उठले. त्यानंतर आलेल्या केपलर या शास्त्रज्ञाने मात्र त्याचे विचार उचलून धरले एवढेच नव्हे तर त्यात महत्वाच्या सुधारणा करून त्यामधील काही त्रुटी दूर केल्या. तसेच ग्रहांच्या कक्षा व फिरण्याचा वेग यांची समीकरणे मांडली. गॅलिलिओने दुर्बिणीतून सूक्ष्म निरीक्षणे करून त्याला दुजोरा दिला व त्यानंतर आलेल्या सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचे नियम शोधून काढले व या सिद्धान्तांना भरभक्कम शास्त्रीय आधार दिला. त्यानंतर वैज्ञानिक क्षेत्रात ते सर्वमान्य झाले व सामान्यज्ञानात त्याचा समावेश झाला. हे सर्व घडायला शंभर वर्षापेक्षा अधिक काळ लागला. हा सारा इतिहास मनूद केला गेला व आपल्यापर्यंत पोचला.


आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त व भास्कराचार्य वगैरे भारतीय विद्वानांनी खगोलशास्त्रावर मौलिक संशोधन केले होते व काही सिद्धान्त मांडले असावेत असे दिसते. पण इतर विद्वानांनी ते कितपत मान्य केले होते, जनतेमध्ये त्यांचा किती प्रसार झाला होता, का ते ज्ञान त्यांच्या पुस्तकातच राहिले होते हे समजायला मार्ग नाही. सूर्याचे न चालता चालणे पाश्चिमात्य संशोधकांनी जितक्या स्पष्टपणे समजावून सांगितले तशा प्रकाराने आपल्याकडे सांगितले गेले होते असे दिसत नाही.


सूर्याच्या चालण्याचे याशिवायही काही प्रकार आहेत. कधी तो ढगाआड लपतो किंवा ढगामागून बाहेर येतो असे आपण म्हणतो पण हा प्रकार मुख्यतः ढगांच्या हालचालीमुळे होतो हो आपल्यालाही ठाऊक असते. साहित्यिक क्षेत्रात तो पायी चालतच नाही, सात घोडे जुंपलेल्या रथांत बसून विहार करतो. संपूर्ण विश्व प्रसरण पावत असून सूर्यासह सारे तारे आपापल्या ग्रहमालिकांना बरोबर घेऊन विश्वाच्या केंद्रापासून दूर दूर जात आहेत असे म्हणतात. पण ही प्रत्यक्ष घडत असलेली सूर्याची सफर आपल्याला जाणवत सुद्धा नाही. त्याला कदाचित सूर्याचे "चालता न चालणे" म्हणावे लागेल.


.............समाप्त