आप्पा कुलकर्णी - एक हजरजबाबी (इरसाल) व चतुरस्र व्यक्तिमत्व

 

आजच मनोगत वाचनांत आप्पा कुलकर्णीचा 'पुणेरी इरसालपणा' वाचनांत आला. पुढे ह्याचे मूळ लेखन लोकप्रभेमध्ये श्री. सुधीर गाडगीळांनी 'वैशाली-रुपाली' या सदरांत केले हे समजले. माझ्या आठवणीत 'आप्पा कुलकर्णी' या व्यक्तिमत्त्वाची ओळख श्री. गाडगीळांनी प्रथम 'मुलखावेगळी माणसं' (किंवा जगावेगळी) या आपल्या दै. सकाळच्या लेखमालिकेतून करून दिली होती. आप्पा या बहुरंगी, बहुढंगी, बहुश्रुत अशा अक्षरशः: चुतुरस्र व्यक्तिमत्त्वाशी माझा प्रत्यक्ष स्नेह आहे. त्यामुळेच 'इरसालपणा'व्यतिरिक्त त्याचे काही रंग मनोगत वाचकांसाठी मांडावेत असे वाटले. अर्थातच श्री. सुधीर गाडगीळ यांनी आपल्या समर्थ खुमासदार शैलीत केलेले त्यांचे व्यक्तिचित्रण वाचलेल्यांसाठी काही गोष्टींची पुनरुक्ती होईल, पण त्यांना 'आप्पा' या व्यक्तिमत्त्वाच्या वाचनाच्या आठवणींना सुखद उजाळाच मिळेल.


एकाच माणसाकडे किती विविध गुण असावेत, व सांसारिक जबाबदाऱ्या व्यवस्थित पेलताना सुद्धा ते कसे जोपासावेत, हे आप्पाकडूनच शिकता येईल. बँकेतली नोकरी ही आजन्म कारकून म्हणूनच करायची, बढतीचे कोणतेही प्रयत्न करायचे नाहीत, हे आप्पाने ठरवूनच टाकले होते. कारण मिळणारे उत्पन्न आपल्या संसारासाठी पुरेसे आहे व नोकरी हे एक उपजीविकेचे साधन आहे, आपल्याला करायचे आहे ते 'वेगळेच' हा स्वच्छ (पुणेरीच बरं का!) विचार. पण म्हणून, चार त्रेपन्न गाठायची आहे, असा 'पाट्या टाकणे' प्रकार मात्र आप्पाने कधीच केला नाही, आणि त्याच्या स्वभावाला ते कधी जमलेच नसते. जे करायचे त्यात झोकून देऊनच, हे बाळकडू.


या आपल्या तमाम बँक आयुष्यातली (हक्काची ठरलेली) किरकोळ रजा बहुधा या माणसाने कोणांना कोणाच्यातरी इहलोकीच्या शेवटच्या प्रवासाला आधार देण्यासाठीच खर्च केली असावी. बऱ्याचवेळी आम्ही मित्रमंडळीत आप्पाला नक्की भेटायचे असेल, तर वैकुंठा कडे दोन चार चकरा माराव्यात, आप्पा हमखास भेटेल अशी चेष्टाही करीत असू. पण काहीही असले तरी, अगदी त्याच्या ह्याचा तो किंवा ती - असे असले तरी आप्पा पुढे. अशा वेळीस पुढाकार घेणारी बरीचशी मंडळी असतात, ह्यांत नवीन ते काय? आप्पाची माणुसकी वा सामाजिक बांधीलकी वगैरे - खरे तर संवेदना इथे संपत नाही....
नरकचतुर्दशीला आपले अभ्यंगस्नान वगैरे आवरले, की आप्पा मेधाला सांगतो, की तू फराळाची तयारी कर मी आलोच - आदल्या दिवशी बांधून ठेवलेल्या पुड्या व पाकिटे  घेऊन आप्पा थेट वैकुंठात पोचतो. तेथील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या फराळाच्या पुड्या व आपल्या ऐपतीनुसार जमेल तसे दिवाळीचे 'पोस्त' देऊन - आप्पा मगच फराळासाठी घरी येतो. अरे, आनंद, तू मला सांग - "त्यांनी कोणाकडे 'दिवाळी' मागायची? त्या दिवशी आलेल्या 'गिऱ्हाईकाकडे'?'' आप्पा हसत मला विचारत होता.. "जोड्याने मारणार नाहीत का?'' खरं सांगायचे, तर हे ऐकताना मलाच कोणीतरी जोडा मारल्याची जाणीव झाली होती. उपजीविकेसाठी म्हणून का होईना, त्या कर्मचाऱ्यांच्या हातून घडणाऱ्या समाजसेवेची, कितीजणांकडे नोंद असते?
अर्थातच, या जाणीवेमुळे आप्पाचे तिथेही घट्ट संबंध आहेत. त्याचा कधी उपयोग होईल हे स्वप्नीही नव्हते. पण हा प्रसंग पाहा;
आमच्या व्यवसाय-निमित्तातून झालेल्या प्रसन्ना नावाच्या मित्राची वृद्ध आजी आजारी होती,  ती एका रात्री आटोपली. कायद्याचे सोपस्कार झाल्यावर, सकाळी लवकरच अंत्यसंस्कारासाठी वैकुंठात तिला नेले.
तिथे कळले, की दुरुस्तीच्या कामामुळे विद्युतदाहिनी बंद आहे. म्हणजे लाकडे रचणे वगैरे प्रकार आले. पण या गोष्टी ऐकलेल्याच. आता पुण्यासारख्या ठिकाणी 'याचा' अनुभव असणारी मंडळी विरळाच आहेत. त्यातून दिवस पावसाळ्याचे.
"साहेब, त्या पलीकडच्या खोलीकडे लाकडं मिळत्यात, हिथं आमची चारच माणसं हायत, आणि हा सगळा कारभार तुम्ही पाहताच आहात, तेव्हा ती ढकलगाडी घ्या व तुमच्याच लोकास्नी लाकडं न्यायला सांगा.''
आता तर 'अनुभवी' माणसाची नितांत गरज. अरे, आप्पा !!
मला सकाळी सकाळी फोन आला -
"अरे, आनंद तुझ्याकडे आप्पाचा फोन नंबर आहे का?''
इतक्या सकाळी आप्पाचा फोन नंबर? ह्या प्रश्नाला अर्थातच माझे उत्तर -
देतो एक मिनिट.. पण कोण गेले?''
प्रसन्नाने वैकुंठा मधूनच मला फोन केला होता. त्याला आप्पाचा फोन नंबर दिला. पण हा फोन ठेवल्यावर समोरच्या कर्मचाऱ्याने त्याला विचारले "अवो, सायेब मगासून तीन फोन केलेत, आणि आप्पाचा नंबर, आप्पाचा नंबर इचारताय - कोण आप्पा?''
"अहो, आम्हाला इथला फारसा अनुभव नाही, त्यातून तुमची ती विद्युतदाहिनी बंद! लाकडाबिकडाची आम्हाला  काहीच माहिती नाही ,  आप्पा कुलकर्णी म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांना ह्याचा बराच अनुभव आहे. म्हणून त्यांचा नंबर मित्रांकडून घेत होतो.''
"कोण म्हणालात अऽप्पा कुळकर्णी व्हय?, तिच्यामारी आधी का नाय बोललात? ए सोम्या, या साबयास्नी तिथली कोरडी लाकडं नेऊन दे रे, आणि रचायचे पण बघ - आपल्या आप्पाची बॉडी हाय.''
"आधी सांगायचं नाय का वो सायब, की आप्पाची बॉडी हाय म्हनून?'' त्या प्रसंगातही प्रसन्नाला हसू आवरताना कठीण झाले. व तो या अनुभवाने अवाकच झाला.
आप्पाशी ओळख झाली, त्या काळांत माझा डी.टी.पी. चा व्यवसाय (खरं तर स्वयंरोजगार म्हणणेच योग्य) होता. तर आप्पाने तेव्हा एक संगणक घेतला, व देवनागरी कामासाठी मी आप्पा पतिपत्नीवर विसंबून राहू लागलो. कारण आप्पाचे मराठीवरचे प्रभुत्व. तर आप्पा रात्री रात्री जागून सुद्धा कामे पूर्ण करी. हे कशासाठी? अतिरिक्त उत्पन्न - छे! असले क्षुद्र विचार आप्पाला कधीच शिवले नाहीत.
"पुढे मागे मला कधीतरी लिखाण करायचे आहे, तेव्हा संगणकामुळे ते मला खूप सोपे जाईल त्याची ही पूर्वतयारी!'' इति आप्पा.
त्या वेळी आप्पा पतिपत्नीनं पुण्यसंचय करण्याची मी संधी दिली, असा माझा दावा आहे. माझ्याकडे एका पाठोपाठ दोन, सुमारे हजार पानांच्या पोथ्यांचे काम आले होते. ज्याचे वाचन त्यांचे (नव)लेखक व  त्यांचे मोजके भक्त या खेरीज  सौ. व श्री. आप्पा यांनाच सक्तीने करावे लागले - त्याचे टंकलेखन करण्याच्या निमित्ताने. या बाबत कधीच कुठलाही त्रागा न करता, उलट "या निमित्ताने कीबोर्डवर हात बसला,'' हे आप्पाचे वक्तव्य.


एके दिवशी संध्याकाळी अशा कामाच्या निमित्ताने त्याच्या घरी गेलो, तर आप्पानेच दार उघडले, डोळ्याला चाळिशीचा चश्मा, हातात सुईदोरा - काय रे!बटणे तुटली का? छे रे, हे काम पूर्ण करतोय, बरेच दिवस रखडले आहे. समोर पसरलेल्या एका साडीवर आप्पाचे चक्क भरतकाम चालले होते. आप्पा तू?
तुला माहीत नव्हते का? दोन मिनिटांत माझ्या समोर सुंदर कशिदा काढलेले, दोन तीन कुर्ते हजर झाले. अचंबित होण्याखेरीज माझ्याकडे काहीच नव्हते.
आप्पाच्या सुरेल शिट्टीचा  उल्लेख 'इरसाल' मध्ये आलेला आहेच. प्रत्येक पार्टी रंगात आल्यावर त्याची फर्माइश होतेच, व मग आढेवेढे न घेता, आप्पा नवीन बसवलेल्या गाण्याने सुरुवात करतो, व मग नेहमीची पसंती, ओ बसंती पवन पागल.., मालवून टाक दीप... वगैरे. रंग वाढतच जातात. पण फक्त तेवढेच नाही, आपले मार्मिक अनुभव प्रसंगानुसार - श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभे करणे ही आप्पाची खासियत! आप्पा कथित एका मार्मिक प्रसंगाचे शब्दांकन करण्याचा प्रयत्न करतो.


आमच्या बँकेत मजा असते. एकदा काय झाले.. आमच्या ब्रँचला शाखाधिकारी म्हणून एका महिलेची निवड झाली. त्या बाईंचेही ते पहिलेच अधिकारग्रहण होते. त्यामुळे पहिल्याच दिवशी, सर्व ज्येष्ठ, कनिष्ठ श्रेणी कर्मचाऱ्यांची सभा घेऊन बाईंनी, आपण कशा कार्यतत्पर व प्रोफेशनल पद्धतीने वागणाऱ्या आहोत ह्या बद्दल लोकांना कल्पना दिली. वर्षानुवर्ष बँकेत मुरलेल्या कर्मचाऱ्यांनी ह्या मीटिंग वगैरे 'आधुनिक मॅनेजमेंट टेक्निक', या कडे पद्धतशीर दुर्लक्ष केले.  
आता आमच्याकडे जे चतुर्थश्रेणी कर्मचारी असतात, ते अत्यंत निर्ढावलेले असतात. (थोडक्यांत चपखल वर्णन करणारे आप्पाचे  शब्द वापरीत नाही...), त्यांना काही फरक पडत नसतो.
''आप्पा ह्ये बाई लई शानपना करते का ओ?''... मी गप्प.. 
"तुमी नाय बोलणार - पण तुम्हाला सांगतो, आप्पा - एकदा दावतोच बघा ..''
बाईंनी थोडेच दिवसांत आपल्या अधिकारांचा योग्य वापर करीत, श्रेणीकक्षा जरा जास्तीच स्पष्ट करण्याचे धोरण राबविले.
तर एक दिवशी बाईंनी एका कर्मचाऱ्याला ऑर्डर दिली "आज डबा आणलेला नाही, माझ्यासाठी दुपारी लंचला सॅन्डविच घेऊन या, जाताना पैसे मागून घ्या.''
"बाई, लंच टाइम होतोय, सॅन्डविच आणायचे आहेत ना?'' बाईंनी शंभराची नोट काढून दिली. (ही गोष्ट 84-85 सालातली असावी, मुद्दाम सांगण्याचे कारण म्हणजे त्या वेळीस -पुण्यांत मारझोरिनचे प्रसिद्ध सॅन्डविचसुद्धां साधारण 6 ते 8 रु. डझन होते.खाल्ले नसल्यास जरुर खाऊन पाहावेत, किमान गेल्या तीन वर्षापूर्वीतरी, मी पहिल्यांदा चाखलेली  म्हणजे साधारण 71 च्या सुमाराचीच चव होती.)
कर्मचारी पैसे घेऊन गेला. लंच टाइम झाला, तरी त्या कर्मचाऱ्याचा पत्ताच नाही.. लंच टाइम संपला व दहा एक मिनिटाने एक मोठे पार्सल हातात घेऊन कर्मचारी हजर.
"अहो, कुठे गेला होतात?''
"बाई तुम्हीच तर सॅन्डविच आणायला पाठविले होते.''
"मग, एवढा वेळ?''
"आता एवढे सॅन्डविच करायचे म्हणजे तेवढा वेळ लागणारच ना? ते थोडेच पुरणपोळीसारखे आधी करून ठेवता येतात.''-
(प्रबोधनाची संधी सोडेल तर तो बँकेचा व त्यांतही महाबँकेचा कर्मचारी कसला..)
"अहो पण एवढे सॅन्डविच आणायला  कोणी सांगितले होते? ''
"बाई, तुम्हीच तर शंभर रु.ची नोट दिलीत व म्हणालात सॅन्डविच घेऊन या.. घेऊन आलो, आपलं काय चुकलं?, हिशेब घ्या. 96 रु.चे सॅन्डविच व 4 रु. रिक्शाचे..''.
- कर्मचारी बाईंचाच दोन बोटातल्या चिमटीत धरून नोट दिलेला आविर्भाव करत उत्तरला.
बाई अर्थातच हतबल. वर -  "बाई कुठे ठेवू हे?''
"वाटून टाका सगळ्या स्टाफला'' - बाई मनातल्या मनांत चडफडत.
मला सॅन्डविचेसची बशी देताना, डोळा घालत तो विचारतो
"अप्पाऽ सांगितलं होत की नाय? घ्या मजा करा, बाईंचा वाढदिवस करा, सॅन्डविच खा! चहा पाजणार ना?''


मागील वर्षी माझ्या आईची पंचाहत्तरी एका वेगळ्या पद्धतीने साजरी करायची ठरवली. योगायोगाने सर्व गोष्टी जुळून आल्या. म्हणजे माझे गुरुजी उ. उस्मानखॉंसाहेब (थांबा, माझ्याबद्दल अपसमज नकोत. मी त्यांच्या पत्रिकेतल्या अनेक अतिरिक्त ग्रहांपैकी एक) यांच्या सतारीने कार्यक्रमास सकाळी लवकर सुरवात करायची, व नंतर श्रीमती कल्पनाताई झोकरकर यांचे गायन,  त्यानंतर आईच्या काळातली लोकप्रिय भावगीते (हौशी कलागुण संपन्न मित्रमैत्रिणींकडून) व नंतर भोजन हे स्वरूप ठरले. तसे मोजकेच शंमर-दीडशे परिवार आमंत्रित असल्याने प्रथम आमंत्रण-कार्यक्रम पत्रिका नकोत असे वाटले होते. पण कार्यक्रमाचे लांब स्वरूप पाहता, लोकांना वेळेची कल्पना असावी म्हणून पत्रिका असावी असे ठरले. तसा छोटा कार्यक्रम असला तरी एवढे श्रेष्ठ कलाकार असल्यामुळे मी थोडा दडपणाखालीच होतो. त्यामुळे पत्रिकेचा मसुदा काही अजिबात डोक्यांत येईना. तेव्हा एकदम आठवण झाली की हो आप्पा!
ताबडतोब मी फोन फिरवला, आता श्री. व सौ. आप्पांनी ऐच्छिक रिटायरमेंट घेतल्याने, मेधा घरी असेलच ही खात्री होती.
"मेधा, मी आनंद ''
"- बोल रे! ''
"अग - असा असा कार्यक्रम ठरविला आहे, त्यासाठी आप्पाकडून पत्रिकेचा मसुदा हवा आहे. तो केव्हा भेटेल?''
"आनंद, सध्यां तू बाहेर असतोस - म्हणजे इथले सगळे विसरलास का? आप्पा रात्री कधीतरी पण नक्कीच घरी येईल, एवढेच मी सांगू शकते.''
"अग, मी ही यामुळे खूप गडबडीत आहे, पण तू आप्पाच्या कानावर घालून ठेव'' -
मी सकाळी उजाडताच आप्पाकडे जाण्याचे ठरवून टाकले.
सकाळी साडेसहा, सातालाच आप्पाचा फोन, ''आनंद! निरोप मिळाला - मसुदा तयार आहे, पण तू नऊ वाजल्यानंतर एक चक्कर टाक, म्हणजे जर काही फेरफार असतील तर करून टाकू या.''
मी पोचल्यावर मसुद्यांत फक्त एका शब्दाचा बदल करावा लागला. तेव्हाच माझा दुसरा विचार आप्पाला बोलून दाखविला की या कार्यक्रमाचे सूत्र संचलन तूच करावेस - अर्थातच आप्पाने ते मान्य केले, व त्यासाठी पुन्हा दोनचार दिवसांत थोडावेळ भेटू या असे ठरले. ते काही झाले नाहीच, त्याला जबाबदार मीच, कारण आप्पाने जबाबदारी स्वीकारल्यावर मी निश्चिंतच होतो. आणि अर्थातच तो विश्वास सार्थकी होता हे त्या दिवशी त्याचे सूत्रसंचालन अनुभवलेलेच सांगू शकतील, शब्दांकन माझ्या कुवतीच्या बाहेरचे आहे. त्यानंतर अर्थातच आप्पाचे आभार मानणे वगैरे औपचारिकपणात मी पडलो असतो, तर तो त्याचा अपमान व त्याही पुढे तो आमच्या मित्रप्रेमाचा वधच ठरला असता, कारण आम्ही पुणेरीच आहोत.


- आप्पा त्या सुरेल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असताना.