मूग डाळीचा हलवा

  • मुगाची डाळ (पिवळी) १ वाटी
  • पाऊण वाटी घरगुती तूप (साजूक तूप)
  • पाऊण वाटी खवा
  • २ वाट्या दूध
  • दीड वाटी साखर (चवीनुसार कमी जास्त)
  • केशर, बेदाणे, बदाम व पिस्त्याचे काप व वेलची पूड
१ तास
४ जण

मुगाची पिवळी डाळ स्वच्छ धुऊन सुमारे ५-६ तास भिजत घालावी. बदाम, पिस्तेही भिजत घालावे.

६ तासांनी मुगाची डाळ उपसून बारीक वाटून घ्यावी व बदाम पिस्त्यांचे साल काढून बारीक काप करावेत. थोडेसे दूध गरम करून त्यात केशर चुरून घालावा.

एका जाड बुडाच्या कढईत तूप गरम करून त्यावर वाटलेली डाळ घालून मंद आंचेवर सतत ढवळावी. डाळीचा रंग बदलून तूप सुटू लागले की त्यात दूध घालून मंद आचेवर डाळ शिजू द्यावी. डाळ शिजत आल्यावर त्यात खवा घालून चांगले परतावे. त्यानंतर साखर घालावी व परतत राहावे. नंतर त्यात बेदाणे, केशर व वेलची पूड टाकून चांगला परतावा. हलवा परतून आपल्याला हवा तेवढा घट्ट करून घ्यावा.

वरून बदाम व पिस्त्याचे काप घालून सजवावा.

१. मूग हलवा गरम गरम खायची पद्धत आहे.

२. मूग हलवा घट्ट करायचा झाल्यास त्याच्या वड्याही पाडता येतात.

३. अमेरिकेत इंडियन स्टोअरमध्ये खवा मिळतो पण जर मिळत नसेल तर रिकोटा चीज घालावे. चव चांगलीच लागते. ते वापरायचे नसेल तर दुधाचे प्रमाण वाढवावे.

 

आई