धोतराची कास झालो

सुटुन जाता त्रास झालो
धोतराची कास झालो

काल मी संसार होतो
आज कारावास झालो

जाहलो मी भक्ष ऐसा
बायकोला घास झालो

मी परीक्षार्थी असा की
काठ शोधुन पास झालो

'एकता' रक्तात भिनली
मालिकांचा दास झालो

चहुकडे घोंघावणारा
चिकुनगुनीया डास झालो

मी तुझ्या ऒठां भिडाया
यमक झालो, प्रास झालो

कालची एकांकिका मी
तीन अंकी फार्स झालो?

साधनेचा तोल जावा
एवढा मी 'खास' झालो?

प्रेरणा : मानस६ ह्यांची गझल मी फुलांची रास झालो