चिमुकली शाळा!

या आधी पत्रमैत्रिण १ व २..
शेकोटीच्या साक्षीने वाफाळत्या कॉफीबरोबर रंगणाऱ्या गप्पांमध्ये स्टेफीच्या शाळेचा विषय निघाला.ती तेव्हा एका चर्चच्या प्राथमिक शाळेत शिक्षिकेचे काम करीत होती.तिच्या वर्णनांवरून आमची उत्सुकता वाढायला लागली‌‌. सकाळी आधी शाळा पहायची आणि मग इतर असं ठरवूनच आम्ही झोपलो.
चर्चच्याच आवारात ही शाळा आहे.(पण आवारच केवढे मोठ्ठे आहे!शाळा आणि चर्च यांच्या मध्ये मोठ्ठे पटांगण आहे त्यात ठाण्यामुंबईतली एक शाळा+मैदान(!) सहज मावेल.)चिमणी पाखरे वगैरे पूर्वप्राथमिक शाळा म्हणजे केवळ मोठी पाळणाघरेच आहेत असा विचार या शाळेच्या दाराशीच तरळून गेला.
मेपल्स,पाइन आणि मयुरपंखींच्या कुशीत एक छोटीशी इमारत दडली होती,तीच ही शाळा! आत जाताच दिसतात ती मोठ्या काचेच्या दारावर काढलेली हत्ती, टेडी बेअर,बदक अशा प्राण्यांची रंगीत चित्रे,थोडं पुढे गेलं की दिसते एक मोठे साधारण १.५ ते २ फीट खोलीचे रिंगण,पूर्णपणे रंगीत चेंडूंनी भरलेले!रिंगणभर  रबरी(सॉफ्ट) रंगीबेरंगी चेंडू. मुलांना तिथे उड्या मारायला,खेळायला,लोळायला मुक्त परवानगी.पडलं तरी लागू नये,खरचटू नये यासाठीची ही सोय!त्याच्यापलीकडे झोपाळे,घसरगुंड्या सी-सॉ सारखे खेळ.प्रत्येक ठिकाणी खाली चांगली फूट-दीडफूट वाळू,कारण परत तेच..खरचटू नये,लागू नये!मेप्पनला थंडी फार,हिवाळा कडक!त्यामुळे मुलांना खेळताना लागू नये साठी जास्त काळजी घेतलेली जाणवली.
उजवीकडच्या पॅसेजमध्ये छोट्या,छोट्या बुटक्या मांडण्या,प्रत्येक खणात एकेक खुंटी, त्यावर आपापली पिशवी अडकवायची आणि खणात बागेत खेळायचे बूट ठेवायचे आणि साधे बूट घालून आपापल्या वर्गात जायचे.आपलीच जागा बरोबर कळावी म्हणून प्रत्येक खणावर ससा,माऊ,हत्ती,गुलाब,ट्यूलिप अशी वेगवेगळी चित्रे, हवे ते चित्र निवडायचे आणि मग नेहमी आपल्या वस्तू त्याच ठिकाणी ठेवायच्या. अजून लिहावाचायलाही न शिकलेल्या चिमुरड्यांचा चित्रांच्या माध्यमातून शिकायचा श्रीगणेशा होतो.
दुसऱ्या बाजूच्या पॅसेजमध्ये प्रसाधनगृह. अगदी खालच्या पातळीवर,दोन फूट उंचीवर बांधलेली सुंदर रंगसंगती साधलेली १०,१२ वॉशबेसिन्स आणि त्याशेजारी  तोंड पुसण्यासाठी अडकवलेले रंगीत,आकर्षक नॅपकिन.(लग्नाच्या कार्यालयात असते तशी एकच लांबलचक ओळ नाही!)आतल्या बाजूला अगदी छोट्या मापाची आणि खालच्या पातळीवर बांधलेली कमोड्स.पूर्वप्राथमिक शाळेत 'टॉयलेट ट्रेनिंग' देणे महत्त्वाचे समजले जाते असे स्टेफी सांगत होती आणि डोळे विस्फारून  आम्ही पाहत आणि ऐकत होतो.
वर्गात शिरलो तर बाकडी,फळा,खडू.. काहीच दिसेना!तीन चार चिमुकली गोल,चौकोनी टेबले,त्यांच्याभोवती तशाच  ४,६ खुर्च्या.एका कोपऱ्यात चक्क मिनीकुकिंगरेंज होती.थोड्या मोठ्या म्हणजे २री,३री तल्या मुलांना सँडविच सारखे सोपे पदार्थ करायला शिकवतात,अंडी,बटाटे उकडणे याच्या पुढची पायरी!मुख्य हेतू 'ही शेगडी हाताळायची कशी'? हे शिकणे!एका भिंतीच्या खालच्या भागाला काळा रंग देऊन फळा केला होता आणि त्यावर रंगीत खडूंनी मुलांनी मनसोक्त चित्रे काढली होती. पण काळ्या रंगाच्या बाहेरची भिंत मात्र स्वच्छ होती!'फक्त काळा रंग आहे तेवढ्याच भागात चित्रे काढायची' ही सूचना मुलांना बरोबर समजली होती.आणि एका कोपऱ्यात होतं छोटंसं लाकडी घर, त्यात चिमुकल्या गाद्या घालून ठेवलेल्या,हत्ती,बदक,कोंबडीच्या आकारांच्या मऊ,मऊ उशा; आत सुळसुळीत पडदे सोडलेले,छताला चमचमणाऱ्या चांदण्या आणि चांदोमामा(इथली मुलं पण 'चांदोमामा' म्हणतात का? असा चुकार विचार आलाच मनात!)गोष्टींची,चित्रांची पुस्तकं पण तिथे एका छोट्या मांडणीत रचलेली.. इकडे वर्ग चालू असताना कंटाळा,झोप आली तर त्या घरात जाऊन झोपायचे म्हणे! हेवा वाटला हो क्षणभर त्या बछड्यांचा!
हा वर्ग कसला? हा तर पऱ्यांच्या गोष्टीतला महालच दिसत होता.
एका कोपऱ्यात ७ पायऱ्यांचा दुहेरी जिना‌. सगळ्या पायऱ्यांना एकेक वाराचे नाव दिलेले,कठड्याला वेगवेगळ्या रंगांच्या १ पासून १२ पर्यंत मणी असलेल्या माळा बांधलेल्या!प्रत्येकाने आपापला फोटो ज्या महिन्यात आपला वाढदिवस आहे त्या माळेच्या खाली लावायचा.वार आणि महिने शिकण्याची ही घोकंपट्टीपेक्षा किती छान पद्धत आहे.
"हं ,म्हणा आठवड्याचे वार .. साऽऽत.. सोऽऽमवार,मंगळऽवार.."असं लहानपणीचं दृष्यच आलं एकदम डोळ्यापुढे!अर्थात इथे वर्गात मुलांची संख्या १५ च्या वर झाली की अजून एक सहाय्यक जोडीला देतात आणि २५ च्या वर वर्गाची पटसंख्या करायचीच नाही असा नियम!कमीत कमी ६० आणि जास्तीत जास्त.. असे आपले वर्ग डोळ्यासमोर आले आणि तफावत फारच जाणवली.ते विचार तिथे वर्गातच सोडून आम्ही पुढच्या दालनात गेलो.


आम्ही स्टेफीकडे गेलो तेव्हा नोव्हेंबर महिना होता. नाताळची तयारी दुकानादुकानातून सुरू झालेली होती.इथे नाताळचा खास बाजार असतो. शाळांतून, नदीकिनारी, तळ्याकाठी शनिवार रविवार असे बाजार भरतात,त्यात मुख्यत्वे नाताळच्या सणासाठीच्या गोष्टींची विक्री चालते. आकाशकंदिल, मेणबत्या, फुगे, भेटकार्डे, कलाबतू, सजावटीचे सामान आणि अर्थातच कॉफी, सॉसेज, सॉफ्टड्रींक, बिअर,ग्लुवाइन इ चे स्टॉल असा आनंदबाजार असतो.
 या शाळेतल्या मुलांच्या काही उत्साही  पालकांनी सुद्धा गेली २,३ वर्ष नाताळचा बाजार भरवायला सुरुवात केली आहे.स्वतःच्या पदरचा वेळ,पैसा खर्च करून वस्तू तयार करून विक्रीला ठेवतात आणि पालक  व शिक्षक या दालनात हा नाताळचा बाजार भरवतात आणि मिळालेल्या पैशातून शाळेसाठी उपयुक्त वस्तू घेतात.तो बाजार पाहत,त्यातल्या विक्रेत्या पालकांशी,स्टेफीच्या सहकाऱ्यांशी बोलत कॉफीचा आस्वाद घेतला आणि त्या चिमुकल्यांच्या शाळेतून बाहेर पडलो.