अवघड जागचे हे दुखणे कठीण झाले

प्रेरणा: स्नेहदर्शन यांची सुरेख गझल तू घाव घातले अन


अवघड जागचे हे दुखणे कठीण झाले
दुखते मला कुठे हे लपणे कठीण झाले


सारेच दोस्त माझे झाले फितूर जेव्हा
वैद्याकडे एकट्याने जाणे कठीण झाले

केले मला त्याने पुरतेच जायबंदी
उठणे कठीण झाले बसणे कठीण झाले

स्वप्नांत ही सरेना हा डोह यातनांचा
आता मला उताणे झोपणे कठीण झाले

विदूषक बनून उरलो दुनियेत फक्त आता
मला बघून हसू आवरणे कठीण झाले

हरवून पार गेला आनंद जिंदगीचा
माझे मला स्वतःचे पुसणे कठीण झाले

लागली खोड मजला "खोडसाळ"अशी
साधे सरळ आता लिहिणे कठीण झाले


करतो विडंबने मी इतकी सुमार येथे
साऱ्या मनोगतींना वाचणे कठीण झाले

  -(वेदनाग्रस्त) अनिरुद्ध अभ्यंकर