इडली

  • तांदुळ २ वाट्या (लाँग ग्रेन राइस)
  • उडदाची डाळ १ वाटी
  • चवीपुरते मीठ
३० मिनिटे
४ जण

२ वाट्या तांदुळ व १ वाटी डाळ दोन्ही वेगवेगळ्या पातेल्यात  दुपारी १२ ला भिजत घालणे. रात्री १० ला मिक्सर/ब्लेंडर मधून बारीक वाटून घेणे. वाटून  झालेले पीठ एका पातेल्यात झाकून ठेवणे. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता न्याहरीला किंवा दुपारी १२ वाजता जेवायला इडली करणे. दुसऱ्यादिवशी हे झाकून ठेवलेले पीठ फसफसून वर येते. आंबट होते.

इडली करायच्या वेळेला एका पातेल्यात फसफसलेले पीठ काढून घेऊन त्यात चवीप्रमाणे मीठ घालून व थोडे पाणी घालून डावेने चांगले घोटून घेणे. हे पीठ आपण भज्यांना पीठ भिजवतो इतके पातळ झाले पाहिजे. (पळीवाढे) गंधासारखे एकजीव दिसायला हवे. नंतर इडली स्टँडला तेलाचा हात लावून त्यात हे पीठ घालणे. नंतर कूकरमध्ये थोडे पाणी घालून इडली स्टँड त्यामध्ये ठेवून कूकरची शिटी काढून गॅसवर (मध्यम आचेच्या थोडी वर आच ठेवून) १५ मिनिटे ठेवणे. गॅस बंद केल्यावर १५ मिनिटांनी कूकरचे झाकण काढून सुरीने सर्व इडल्या सोडवून घेणे.

चटणी किंवा सांबारासोबत गरमागरम इडली खाणे.  डोश्याला वरील दिलेलेच डाळ तांदुळाचे प्रमाण वापरणे. वरील मिश्रणात एकदा इडली व एकदा डोसे होतात.

सांबार कृती येथे पहा

रोहिणी

खोलगट डीशमध्ये गरम इडली सांबार घालून त्यावर ओल्या नारळाची पातळ चटणी व बारीक शेव घालून खावयास देणे.

बहीण सौ रंजना जेरे.